घटना

नॉन इश्य़ू.. आणि साहित्य संमेलन

नॉन इश्य़ू.. आणि साहित्य संमेलन
मुलाखतकार

आपल्याकडे ज्या गोष्टींकडे खरं तर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे त्याकडे सहज कानाडोळा करत नको त्या विषयांना चघळत बसण्याचा एक नवा ट्रेंड आलाय. जसं या आधी आमिर खान सर्वांच्या चर्चेचा नि टिकेचा विषय होता, तसंच आता श्रीपाल सबनीसांच्या बाबतीत तंतोतंत घडताना दिसतंय. एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशाच्या पंतप्रधानांविषयी एकेरी भाषेत विधान करणं कितपत योग्य आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांचं म्हणणं पटलं नाही म्हणून त्यांचे पुतळे जाळून त्यांचा निषेध करणं, त्यांना जिवे मारण्याची धमकी देणं ही भाजप कार्यकर्त्याकडून होणारी दडपशाही किती योग्य आहे या संदर्भातील काही विशेष मतं जाणून घेऊयात…. 

संजय सोनावणी : खरं तर आपण एका जबाबदारीच्या पदावर असताना असं देशाच्या पंतप्रधानांविषयी एकेरी शब्दात वक्तव्य करणं चुकिचंच आहे. त्यांनी अशी एकेरी भाषा  वापरायला नको होती. त्यांचं तिथेच चुकलं. नि त्यांना विरोध करणा-या भाजपचंही चुकलंच. आणि आता भाजपकडून ह्या प्रकरणाला राजकीय रंग दिला जातोय. सबनीसांवर टिका करण्याअगोदर विरोधकांनी हे समजून घ्यायला हवंय कि  सबनीस हे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे साहित्यिक वा राजकारणाचे अभ्यासक नाहिये. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला तिथेच सोडून देणं योग्य ठरलं असतं. पण मॉर्निंग वॉकला जात चला, अशाप्रकारे धमकी देणं हे अतिशय चुकीची बाब आहे. आपण कुणाच्याच अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर अशी गदा आणू शकत नाही. त्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा आपण प्रत्येकाने आदर हा करायलाच हवा. या अशा धमक्या देणं म्हणजे ते हुकुमशाहीचं लक्षण आहे, जे खूप गंभीर आहे. राहिला प्रश्न सबनीसांचा तर आजही साहित्यिकांमध्ये काही ठराविक साहित्यिक सोडले तर बाकिचे लोकांना माहितही नाहित. त्यात सबनीसांची कोणतीच एक भुमिका नाहिये, तिसरीच भुमिका त्यांची नेहमी पाहायला मिळते. ते फुलेवाद, आंबेडकरवाद मांडतात पण त्यांची भुमिका मात्र तशी नसते. एखाद्याची पुस्तके झाली म्हणजे कुणी साहित्यिक होत नाही. तसं पाहिलं तर सदानंद मोरेंचे योगदान त्याच्याहून किती तरी अधिक आहे. सबनीस त्यांच्या भाषणात असंही म्हणाले होते कि साहित्याचा मराठी पाया असेल तर त्याचे डोके हे इंग्रजी असायला हवे, मला असं वाटतं पंतप्रधानांविषयी ते काय म्हणाले याहीपेक्षा त्याचे हे विधान मला अधिक गंभीर वाटते. मी तर म्हणेन कि गच्चाळपणाचं विधान आहे. आणि आता त्यांच्या राजीनाम्याविषयी जी काही चर्चा होत आहे, त्याविषयी मी असं सांगेन कि एकदा निवडून आल्यानंतर राजीनामा देण्याची काहीच सोय नसते. आणि त्याला काही अर्थ पण नाही. मला वाटतं यादवांच्या बाबतीत जे काही झालं ते यांच्या बाबतीत तरी होऊ नये. नि राजीनामा द्यायचा असेल देणार कोणाला? कारण त्यांंनी इतरांनी निवडून दिलेलं आहे, तर मी त्यांना हेच सांगेन कि त्यांनी राजीनामा देण्यापेक्षा भाषणबाजी करणं थांबवावं. आणि त्यांना विरोध करणा-या विरोधकांविषयी सांगायचं म्हणजे देशातील महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा असा धुराळा उडवला जातोय. असा विरोध करण्यापेक्षा, धमक्या देण्यापेक्षा तुम्ही तुमचे तात्त्विक विचार वा तुमचे मतभेद तर नोंदवू शकता ना. तर आपणच आपली प्रतिष्ठा जपायला हवी असं माझं मत आहे.

सतीश तांबे : मी फार काही सांगू शकणार नाही, पण त्यांचं असं पंतप्रधानांबाबत एकेरी बोलणं हे आक्षेपार्ह आहेच. मला तर फार काही त्यांच्या विषयी माहितीही नाही, कदाचित माझंच वाचन कमी पडत असेन. पण ते जे बोलले ते नक्कीच चुकीचं आहे. आणि त्यांनी राजीनामा द्यावा कि देऊ नये हे तेच ठरवतील. त्यांनी समितीच्या सदस्यांनी अधिकृतरीत्या निवडून दिलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेणार कोण? हे असं पुन्हा होऊ द्यायचं नसेल तर समितीचे सदस्यच बदलायला हवेत असं मला वाटतं. खरं तर मला हे जे काही चाललंय ते सगळंच मजेशीर वाटतंय.  

संभाजी भगत : भाजप आणि संघ परिवार परंपरा ही धर्मांध आहे. त्यांची भुमिका ही हिंदू राष्ट्र घडवण्याची आहे, त्यामुळे अभिव्यक्ति स्वातंत्र्याची कोणी कल्पना न केलेलीच बरी. सध्यातरी ते म्हणतील तीच पूर्व दिशा मानावी लागेल, अशीच परिस्थिती आहे. कारण निवडणुका सोडल्या तर त्यांना इतरांशी काहीच घेणंदेणं नाहीये. सबनीसांविषयी सांगायचं तर ते फार ग्रेट वा पुरोगामी नाहीत. ते मोदींच्या बाबतीत जे काही बोलले, नंतर त्यांनी पुन्हा आपण तसं म्हणालोच नाही, तसं आपल्याला म्हणायचं नव्हतं असंही ते म्हणाले, ते त्यांच्याच मतावर स्थिर नाहीयेत. त्यांनाही गरिबांचं काही पडलेलं नाही. खरं तर त्यांनीच चुकीच्या गोष्टीचा इश्यु बनवला. त्यांचे जे काही फंडे असतील कदाचित ते बाजूला पडल्याने ते चिडले त्यांनी असे वक्तव्य केले असावे असं मला वाटतं. मला असं वाटतं किं ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांकडून आपल्याला गृहित धरलं जातं. पण तसं असलं तरी एक माणूस म्हणून आपण सबनीसांचा डेमोक्रॅटिक राईट हिरावून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांच्याशी सहमत होण्याची काही गरज नाही. माझ्या असं ऐकिवात पण आहे कि त्यांनी बाबासाहेब नि फुलेंच्याही विरोधात या आधी लिहिलेलं आहे, तर त्यांचं असं धरसोड चालूच असतं. आपल्याकडे जे आहे ते वापरून आपली पोळी भाजायचं काम ते करत असतात. परंतु त्यामुळे त्यांचा मत मांडण्याचा अधिकार आपण हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला त्याचं म्हणणं पटत नसेल तुम्ही कोर्टात त्यासाठी लढाई करावी, पुतळे जाळणं हा त्यासाठी योग्य पर्याय नाही. पण संघ परिवाराचा त्यांना बहुमत मिळाल्यामुळे त्यांचा आवाज वाढलाय इतकंच. संघ परिवार असेल वा दुसरं कुणी सगळेच लोकशाहीचा अनेक प्रकारे वापर करून घेताना दिसतात. वसंत ऋतूत कोकिळा कशी गाते तसं संघ परिवाराचं, भाजपचं झालं आहे, त्यांना बहूमत मिळाल्यामुळे ही ५ वर्ष त्यांच्यासाठी वसंत ऋतू असेल पण फक्त ही ५ वर्षच हे त्यांनी समजून घ्यावं नि वागावं. सबनीसांविषयी बोलायचं तर, त्यांना कोणतीच आयडॉलॉजी नाही असं मला वाटतं. आणि ही अशी साहित्य संमेलनं म्हणजे हिंदूत्व वाद्यांचा, ब्राम्हणांचा उत्सव असतो, हिंदूत्ववादाला सपोर्ट करणारा हा उत्सव असतो. असे संमेलन भरवण्यापेक्षा संविधानाच्या बाजूला उभं राहून ते वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न करायला हवं. आणि भाजपच्या या विरोधाविषयी सांगायचं तर कोणत्या पक्षांनं काय राजकारण करावं तो त्यांचा प्रश्न आहे. आपण ज्यांना जनतेचे पालनहार मानतो खरं तर ते पालनहार नाहीतच हे आपण मान्य करायला हवं. व्यापा-यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी ते तिथे आहेत, त्यामुळे ते आपल्यासाठी तिथे आहेत असा समज करणं चुकीचं आहे. त्यामुळे आपण आपले वेगळे प्रयत्न करायला हवेत, त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नये. त्यामुळे या एकूण प्रकरणाविषयी सांगायचं तर, नंबर एक म्हणजे सबनीसांवरील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील दडपशाहीचा मी निषेध करतो नि दुसरं म्हणजे त्यांनी पंतप्रधानांविषयी जी एकेरी भाषा वापरली, मते मांडली नंतर पुन्हा फिरवली तर त्याच्याशी मी सहमत नाही.  

संकलन : सुजाता शिरसाठ
स्त्रोत : मुलाखत.कॉम

Comments

More in घटना

  • जातिय भेदभावाचा बळी रोहिथ

    रोहिथच्या जातीने अन्यायकारक शिक्षेला सोप्प केलं- दत्तात्रय आणि ईराणी यासाठी जबाबदार आहेत - रामजी

  • I am happy dead than being alive – रोहिथ वेमुल्ला

    रोहिथ वेमुल्लाच्या आत्महत्येनंतर देशभरातून निषेधाचा सूर तीव्र होतो आहे. ही आत्महत्या नसून संस्थानिक जातीय द्वेषातून घ़डवून आणलेली...

  • बातचीत मेघना गुलजारशी……..

    बॉलिवूड हंगामा तर्फे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तलवार चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्याशी केलेली ही खास बातचीत.