मनोरंजन

‘देवा’घरची नायिका

‘देवा’घरची नायिका
मुलाखतकार

घरंदाज सौंदर्य आणि आपल्या लाघवी अभिनयाने सीमा देव यांनी प्रेक्षकांना थोडीथोडकी नव्हे तर मराठी पंन्नासेक वर्ष भुरळ घातली. कलाकार म्हणून बॅले नृत्यांपासून सुरू, चालू झालेला त्यांचा प्रवास, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, नाटकं अशी वळणं घेत समृद्ध झाला. आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. त्यांच्या अनेक भूमिकांचं कौतुक झालं. मात्र यशाची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही. आपलं शालीन व्यक्तिमत्त्व त्यांनी काय जपलं. रमेश देव यांच्याबरोबरच्या त्यांच्या एकोणपन्नास वर्षाच्या संसाराचं वर्णन तर एक दाम्पत्यजीवन असंच करावं लागेल. आज त्या अभिनयाच्या क्षेत्रातून निवृत्त झाल्यात. मुलं, सुना, नातवंड यांच्यात रमल्यात. परंतु आपलं सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व त्यांनी जसंच्या तसं जपलंय. आज वयाच्या सत्तरीत असलेल्या सीमाताईंना आयुष्याकडे मागे वळून पाहताना काय वाटतं, ते सांगणारी त्याची ही मुलाखत.

तुमच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली ?
सीमा देव : आम्ही गिरगावात राहत होतो. मी सगळ्यात लहान. वडील गोल्डन टोबॅकोमध्ये कामाला होते. दहा बाय चौदाच्या लहानशा खोलीत आमचं जवळजवळ आठ-दहा माणसांचं कुटुंब राहत असे. माझ्या अगोदरच्या तीन बहिणी व एक भाऊ यांच्यापैकी आज कुणीही हयात नाही. पुढे माझ्या वडिलांना दारूचं व्यसन लागलं. त्यातच त्यांची नोकरी गेली. त्यामुळे साहजिकच कुटुंब चालवण्याची जबाबदारी माझ्या आईवर पडली. आई तेव्हाची चौथी शिकलेली होती. ती फार धीराची होती. आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे, या विचाराने तिने पेडणेकर यांच्या भरतकामाच्या मशिन बनवण्याच्या दुकानात नोकरी धरली. आम्ही कारवारी असल्याने, ब-याचशा कला आमच्यात आपसूक होत्या. या दुकानातून मशिन घेऊन जाणा-यांना ती चालवायची कशी, ते शिकवण्याचं काम आई करत होती. तेव्हा तिला पगार होता शंभर रुपये. घरात खाणारी तोंडं अधिक असल्यामुळे तो पगारही कमीच पडत होता. पण जेव्हा थोडं आर्थिक स्थैर्य आलं तेव्हा तिने मला नृत्य शिकायला पाठवलं. मी कथ्थक शिकायला सुरुवात केली. मात्र नृत्य शिकण्यासाठी बराच स्टॅमिना लागतो आणि त्यासाठी तसा खुराक घ्यावा लागतो. आमच्या घरात तो कुठे मिळणार? मी नृत्य करून आले की, घरात जे काही असेल ते खात असे. त्यामुळे माझे पाय प्रचंड दुखत. पुढे मी कथ्थक शिकायचा विचार सोडून दिला. मात्र नऊ वर्षाची असताना मी एका बॅलेमध्ये गेले. आमच्या शेजारी राव म्हणून फॅमिली होती. त्यांनी मला भारती विद्या भवनमध्ये होणा-या या बॅलेबद्दल सांगितलं. त्यात मी काम करू लागले. ‘राम’नावाच्या बॅलेमध्ये कनक रेळे सीतेचं काम करत. ‘गीत गोविंद’ आणि ‘नुरजहाँ’, हे आणखी दोन बॅले होते. विरेंद्र देसाई यांनी हे बॅले बसवले होते. मी ‘नुरजहाँ’ या बॅलेत काम करायचे. आपल्याला नृत्य करायला मिळतंय, यातच मी आनंदी होते. या बॅलेच्या एका शोचे वीस रुपये मिळत होते. दर महिन्याच्या शनिवार-रविवारी त्या बॅलेत काम केल्यावर ऐंशी रुपये मिळायचे. घरासाठी ते खूप होते. इब्राहिम नाडियादवाला एकदा हा बॅले पाहायला आले. या बॅलेत आशा पारेख नुरजहाँची भूमिका करत असे तर मी धोबिणीची भूमिका करायचे. त्यांनी आशा आणि मला चित्रपटात काम करणार का, असं विचारलं. चित्रपटात काम करण्याबाबत माझी हरकत नव्हती, पण आजोबांची भीती होती. मात्र आशाच्या आईने आम्हाला तयार केलं. आम्ही नाडियादवाला यांच्या स्टुडिओत पोहोचलो. चित्रपटाचं नाव होतं ‘अयोध्यापती’. उषा किरण, अचला सचदेवही त्यात होत्या. या चित्रपटात मी लक्ष्मणाच्या पत्नीची म्हणजे ऊर्मिलाची भूमिका केली होती. आम्हा दोघींचं शूटिंग झालं, मात्र आम्हाला अजिबात संवाद नव्हते. आम्ही दररोज सजूनधजून सेटवर बसून राहत असू. मात्र त्या कामाचे मला त्या काळात पाचशे रुपये मिळाले होते. तो काळ होता १९५७चा. नंतर मात्र माझ्या परीक्षा वगैरे असल्यामुळे मी घरीच होते.

या खंडानंतर परत काम करायला कधी सुरुवात केलीत ?
सीमा देव : त्यानंतर जवळजवळ दोन वर्ष मी काहीच केलं नाही. तेव्हा आठवीतून नववीत आल्याने अभ्यासही वाढला होता. एकदा निवेदिता जोशी म्हणजे आताच्या निवेदिता सराफचे वडील गजन जोशी आमच्या घरी आले. त्यांनी त्यावेळी रंगभूमीवर प्रयोग सुरू असलेल्या ‘अंमलदार’ या नाटकात काम करण्याबद्दल विचारलं. प्रभाकर पणशीकर या नाटकात भूमिका करत होते. त्यातली कुंदाची भूमिका करण्यासाठी त्यांनी मला विचारलं. एका प्रयोगाचे तीस रुपये मिळणार होते. मात्र त्यावेळी मला नाटकाची भीती वाटायची. एकतर मी कधीही संवाद म्हटले नव्हते. त्यामुळे पाठांतर करून संवाद म्हणायची भीती वाटायची. मात्र पणशीकरांनी मला सांगितलं की, ‘नाटकात प्रॉम्प्टर असतो.’ पण मी घाबरून माझे सगळे संवाद अगदी चोख पाठ केले. प्रॉम्प्टरची गरज लागली नाही. या नाटकाचे प्रयोग सुरू असतानाच त्या वेळच्या ‘लोकमान्य’ या वर्तमानपत्रात माझ्या कामाचं कौतुक छापून आलं होतं.

पुन्हा मग चित्रपटाकडे कधी वळलात ?

सीमा देव : हे नाटक सुरू असतानाच मला कुणीतरी सांगितलं की, फिल्मिस्तान मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. तुम्ही फिल्मिस्तानला जाऊन भेटा, तेव्हा मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी गोरेगावला जाण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. शेवटी आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणा-या रमा कामत यांच्याकडे आईने पैसे मागितले. त्यांच्याकडेही तेव्हा पैसे नव्हते. मात्र कारवारी लोक देवासाठी म्हणून काही पैसे वेगळे काढतात, त्याला ‘ओकलास’ असं म्हणतात. त्यातला दीड रुपया त्यांनी आम्हाला दिला. आम्ही रेल्वेने गोरेगावला जायला निघालो. पुढच्याच स्टेशनवर म्हणजे ग्रॅण्ट रोडवर आमच्या डब्यात एक तरुण चढला. तो चित्रपटात काम करणाराच होता. त्याच्या सिनेमाचं पोस्टर आम्ही पाहिलं होतं. तो नेमका आमच्या समोरच येऊन बसला. ते रमेश देव होते. मात्र त्यावेळी एका चित्रपटात त्यांची खलनायकी भूमिका गाजली असल्याने आम्ही जरा सावरूनच बसलो. तोही फिल्मिस्तानलाच निघाला होता. जालान त्यावेळी फिल्मिस्तानचे मालक होते. त्यांनी माझी स्क्रीन टेस्ट घेतली. दत्ता धर्माधिकारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. चित्रपटाचं नाव होतं ‘आलिया भोगासी’. यात जयश्री गडकर या प्रमुख भूमिकेत होत्या. त्या माझ्या शाळेतल्याच होत्या. माझा पगार महिना चारशे रुपये ठरला. काही दिवसांच्या कामानंतर मला जालान यांनी बोलावून घेत सांगितलं, ‘आम्ही तुला चारशे रुपये देणार होतो. मात्र ही नवीन मुलगी आहे, हिला चारशे कशाला, असं तुमच्याच लोकांनी सांगितल्याने आम्ही तुला फक्त दोनशे रुपयेच पगार देणार आहोत.’ मला वाईट वाटलं, पण आलिया भोगासी म्हणून मी ते स्वीकारलं. मी एकूण तीन चित्रपटांत लहानसहान भूमिका केल्या. तेव्हा मी माझं नाव बदललं होतं. कारण त्यावेळी चित्रपटसृष्टीत तीन नलिनी होत्या. एका ज्योतिषांनी माझ्या आईला हिचं नाव ‘स’वरून ठेवा, असं सांगितलं होतं. मला साधना हे नाव आवडत होतं, मात्र त्याच सुमारास चित्रपटसृष्टीत साधनाचा प्रवेश झाला होता. मॅजेस्टिकमध्ये तेव्हा एक चित्रपट लागला होता, त्यातल्या नायिकेचं नाव सीमा होतं, म्हणून माझ्या भावाने, तुझं नाव आपण सीमा ठेवूया, असं सुचवलं. पुढे मी रमेश देवबरोबरही एका चित्रपटात काम केलं. त्यात तो खलनायक होता. या चित्रपटातल्या एका प्रसंगात मला रमेशच्या मुस्कटात मारायची होती. पण मला काही जमेना. शेवटी धर्माधिकारी माझ्यावर चिडले. त्यानंतर मी अशी काही मुस्कटात मारली की तो शॉट ओके झाला, पण मला हे समजून चुकलं की, फिल्मिस्तानमध्ये आपलं काही भवितव्य नाही. म्हणून मग मी फिल्मिस्तान सोडलं.
त्यानंतर आमच्याकडे जयकर नावाचे एक गृहस्थ आले. व्ही. शांताराम यांचे कनिष्ठ बंधू व्ही. अवधूत ‘ग्यानबा तुकाराम’ या सिनेमाची जुळवाजुळव करत होते. मी त्यांच्यासमोर गेले तर ते म्हणाले, ‘अरे, ही मुलगी तर शहरी आहे. मला माझ्या चित्रपटासाठी ग्रामीण मुलगी हवीय.’ मी म्हणाले, ‘तुम्ही मेकअप तर करून बघा.’ त्यांच्याकडे शांताराम विचारे नावाचे एक मेकअपमन होते, त्यांनी माझा मेकअप केला. त्यानंतर अवधूत यांचं मत एकदम बदलून गेलं. तो चित्रपट मला मिळाला. त्या चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूरजवळच्या बडिंग नावाच्या गावात होतं. चित्रपटात मोटेचं पाणी खेचण्याचा सीन होता. ते कोल्हापुरी बैल एकदम तगडे असल्याने मला ते ओढताच येईनात. अवधूत म्हणाले, ‘तुला जर हा सीन करता आला नाही तर गणपत पाटील यांनी एक मुलगी आणली आहे. आम्ही तिला या चित्रपटात घेऊ.’ अशा पद्धतीने चित्रपटातून काढून टाकणं माझ्यासाठी अपमानास्पद होतं. त्यामुळे कसंही करून हा शॉट आपण ओके करायचाच, असं मी ठरवलं. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. शेवटी मी त्या शेतक-याला विचारलं, त्याने मला एक ट्रीक सांगितली व त्यानुसार मी ते बैल ओढू शकले.

या काळातच तुमची रमेशजींशी ओळख वाढली का ?23s6
सीमा देव :
खरं सांगायचं तर याच चित्रपटाच्या काळात आमचं प्रेम जमलं, म्हणजे आजच्या भाषेत तुम्ही प्रपोज का काय म्हणता, ते याच सिनेमाच्या वेळेस रमेशने मला केलं. या चित्रपटात आम्ही एका बैलगाडीवर ठेवलेल्या गवतात बसलेलो आहोत, असा सीन होता. बैलगाडी दूरवर नेण्यात आली. अवधूत मेगाफोनवरून आम्हाला सूचना देत होते. शॉट घेणार तेवढ्यात एक ढग आला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की, तिथेच बसून राहा. आम्ही तिथे बसलो असतानाच रमेशने मला विचारलं, ‘माझ्याशी लग्न करशील का?’ मला पहिल्यांदा काही समजलंच नाही. मला वाटलं की, हा सिनेमातला डायलॉग आहे. मी म्हणाले, ‘यावर माझा डायलॉग काय आहे?’ तर ते म्हणाले, ‘तू नुसतं हो म्हणायचं’, त्यानुसार मी ‘हो’ म्हटलं. थोड्याच वेळात शॉट ओके झाला. मी दिग्दर्शकांना विचारलं, ‘अहो, गाडीवर आमचे संवाद होते, हे तुम्ही मला का नाही सांगितलं?’ त्यावर ते म्हणाले, ‘तुम्हाला संवाद नव्हते. तुला कुणी सांगितलं?’ मी म्हटलं, ‘रमेशने’, ते म्हणाले, ‘काय म्हणाला तो?’ मी त्यांना ते डायलॉग सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘अगं, हा काही सिनेमातला संवाद नाही. तर तो रमेशने आपल्या मनातून आणलेला संवाद आहे.’ त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढल्या. मला लहानपणापासून एकटीने राहायची सवय होती. त्यामुळे ही भावना मला हवीहवीशी वाटली. पुढे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तुमचं लग्न त्या काळातलं एक सेलिब्रिटी मॅरेजच होतं का ?
सीमा देव : हो, आम्ही १६ जून १९६५ या दिवशी विवाहबद्ध झालो. रमेशच्या सगळ्या नातेवाइकांनी त्यापूर्वीच मला पाहून घेतलं होतं. आमचं लग्न कोल्हापूरला आताच्या राजाराम थिएटरमध्ये झालं. त्या हॉलला जुन्या राजवाड्याप्रमाणे एक सज्जा होता. आम्ही लग्न करून बाहेर पडलो, तर हजारो लोकांचा जमाव आम्हाला पाहण्यासाठी जमला होता. मग आम्ही त्या थिएटरच्या त्या सज्जात जाऊन लोकांना अभिवादन केलं. ते लग्न एकप्रकारे शाही विवाहच होता.

‘जगाच्या पाठीवर’ हा तुमचा चित्रपट खूप चालला. तो तुम्हाला कसा मिळाला ?0b9e45057eff43d1ab86b440d2710f5e_pt_xl
सीमा देव :
राजा ठाकूर यांचा ‘राजमान्य राजश्री’ हा सिनेमा मी केला होता. त्यावेळी राजा परांजपे यांच्या चित्रपटांची कीर्ती मी ऐकून होते. एकदा ‘रसरंग’ मासिकातून राजा परांजपे हे एका सिनेमासाठी मद्रासला गेल्याचं कळलं. काही काळाने ते मुंबईत परतल्याची व ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटाची तयारी करत असल्याची बातमी आली. हा चित्रपट आपल्याला मिळायला हवा, असं माझ्या मनात आलं. मात्र नायिकेच्या भूमिकेसाठी मोठमोठी नावं चर्चेत असल्याचं बातमीत म्हटलं होतं. त्यामुळे मी विचार सोडून दिला. एकदा भाऊबीजेच्या दिवशी मी खरेदीसाठी गेले होते. घरी परतले तर घरात राजा परांजपे बसलेले होते. मी त्यांना वाकून नमस्कार केला. ते घरी आले आहेत, याचा मला अतीव आनंद झाला होता. मी ‘जगाच्या पाठी’वरचा विषय काढला. त्यावर ते म्हणाले, ‘त्याच चित्रपटासाठी तर मी तुला विचारायला आलो आहे, असं सांगितलं तर तू या कॉटवरून उडी तर मारणार नाहीस ना?’ मी म्हणाले, ‘मी उडीबिडी मारणार नाही, पण मला खूप आनंद होईल, एवढं खरं.’ चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी सेटवर पोहोचले. मी चित्रपटाची नायिका असल्याने मेकअपदादांनी माझा मेकअप केला. त्यानंतर मला कपडे देण्यात आले. तेवढय़ात राजाभाऊ तिथे पोहोचले आणि मला पाहून संतापले. मेकअपदादांना म्हणाले, ‘हिचा मेकअप कुणी केला? हिची भूमिका भिकारिणीची आहे.’ त्यानंतर माझा सगळा मेकअप पुसून काढण्यात आला. केस अस्ताव्यस्त केले आणि शूटिंगला सुरुवात केली. या चित्रपटाचं चित्रीकरण लोणावळ्यात सुरू होतं. एके दिवशी आम्ही गाण्याचं शूटिंग करत होतो. प्रेक्षक म्हणून आमच्याच युनिटमधल्या लोकांना उभं केलं होतं. मात्र त्यात काही गावकरी लोकही होते. त्यात एक स्थानिक दादा होता. तो दारू पिऊन आला होता. शूटिंग सुरू असतानाच तो अचानक राजाभाऊंच्या अंगावर धावून आला आणि त्यांना म्हणाला, ‘अरे म्हाता-या, तुला काय वाटतं की नाही? पैशांसाठी भर उन्हात या मुलीला नाचवतोस?’ मोठा गोंधळ उडाला. सगळयांनी राजाभाऊंना त्याच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर राजाभाऊ म्हणाले, ‘त्या माणसाने गोंधल घातला असला तरी त्याने आपल्याला किती मोठी दाद दिली आहे बघा.’ हा चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाला. एक अभिनेत्री म्हणून मला या चित्रपटांतून खूप शिकायला मिळालं. जे पुढे मला आयुष्यभर उपयोगी ठरलं. या चित्रपटानंतर मी एकापाठोपाठ एक चित्रपट करत राहिले. ‘पाहू किती रे वाट’, हा माझा चित्रपटही बराच चालला. पानशेतचं धरणं फुटलं नसतं तर हाही चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाला असता. तो पुण्यात पंधराव्या आठवड्यात असताना पानशेतचं धरण फुटलं.

हिंदी चित्रपटांकडे कशा काय वळलात ?
सीमा देव : एकदा महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओमध्ये जोगळेकरांच्या एका चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना मला बिमल रॉय प्रॉडक्शनमधून फोन आला. मला त्यांनी तातडीने मोहन स्टुडिओत यायला सांगितलं. मी हो म्हणाले. जोगळेकरांना सांगितल्याबरोबर त्यांनी मला त्यांची गाडी देऊन तिथं पाठवलं. तेव्हाच माझी शशी कपूर यांच्याबरोबर पहिली भेट झाली. तो माझ्या गाडीभोवती उगाचच शायनिंग मारत होता. गंमत म्हणजे, नंतर आम्ही त्या चित्रपटात एकत्र काम केलं. मी राजा परांजपेंच्या चित्रपटात काम केलं आहे, हे जेव्हा मी बिमल राय यांना सांगितलं तेव्हा ते उठून उभे राहिले होते. या चित्रपटानंतर इतरही काही हिंदी चित्रपटांमध्ये मी काम केलं. ‘अनुपम चित्र’बरोबर तर मी पाच वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. मात्र त्यांचा पहिलाच चित्रपट पडल्यामुळे मी त्यांच्या जाचक करारातून आपोआपच मुक्त झाले. कारण त्यांच्या करारानुसार मला दुसरीकडे काम करता येणार नव्हतं आणि जर केलंच तर त्याचं मानधन ते ठरवणार होते. त्यात त्यांचा शेअर असणार होता. पण त्यांनी माझी प्राइज इतकी वाढवून ठेवली की, त्यामुळे एक-दोन चित्रपट माझ्या हातून गेले. ‘अपराध’ हा मराठी चित्रपट मी त्याच काळात केला. तो लोकांना तर आवडलाच, पण चित्रपट पाहून प्रभाकर पेंढारकर यांनी मला खास पत्र पाठवून माझं अभिनंदन केलं होतं.

‘आनंद’मधल्या तुमच्या भूमिकेचं कौतुक झालं. हा चित्रपट कसा मिळाला ?anandfamily1
सीमा देव :
‘आनंद’साठी रमेशचं कास्टिंग अगोदरच झालं होतं. एकदा ऋषिदांनी रमेशला विचारलं, ‘सीमा कैसी है?’ तेव्हा अभिनय एक वर्षाचा होता. त्यांनी सांगितलं, ‘थोडा वजन बढ गया है,अब दो बच्चोंकी माँ है लेकीन वैसेही दिखती है.’ ऋषिदांना ‘आनंद’मधल्या भूमिकेसाठी तशीच अभिनेत्री पाहिजे होती. त्यांनी सांगितलं,‘कल उसको बुलालो.’ मी त्यांना भेटायला गेले. पहिला शॉट आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचाच होता. राजेश खन्नाबरोबर भेटण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. सकाळी नऊची शिफ्ट होती. राजेश खन्ना दीड वाजता आला. मला पाहिल्याबरोबर म्हणाला, ‘अरे, आपण तर गिरगाववाले आहोत.’ मी त्याला विचारलं, ‘तुम्हाला मराठी येतं का?’ यावर तो म्हणाला, ‘अजिबात येत नाही, पण एक-दोन वाक्य पाठ करून ठेवलीत.’ राजेश खन्नाचा अभिनय एवढा अस्सल असे की, या चित्रपटात एक प्रसिद्ध संवाद आहे की, क्या करु बहन तुम्हे ये भी नही कह सकता की मेरी उमर तुझे लग जाये. त्याचं शूटिंग होत असताना मी फ्रेमच्या बाहेर असूनही मला रडू फुटलं होतं. राजेश आणि माझे संबंध पुढे कायम भावाबहिणीसारखे राहिले. त्याच्या ‘जय जय शिवशंकर’ या चित्रपटातही मी काम केलं होतं. अमिताभशीही याच चित्रपटाच्या वेळी ओळख झाली. मी हळूच रमेशच्या कानात म्हटलं होतं, ‘अरे, याला हिरो कोण करणार? मात्र पुढे त्याने जे करून दाखवलं ते जबरदस्त होतं.

अमिताभबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता ?09sld8
सीमा देव :
राजेश खन्नाने जी गोष्ट कधीच पाळली नाही ती अमिताभने पाळली. म्हणजे तो प्रचंड वक्तशीर होता. ‘मर्द’मध्ये मी त्याच्या आईची भूमिका केली होती. मी गडकरीला नाटकाचा प्रयोग करत होते. त्या वेळी मनमोहन देसाई यांच्या ऑफिसमधून फोन आला की, आपको कल सुबह म्हैसूर जाना है. सुबह की फ्लाईट है. तेव्हा माझ्यासोबत जायलाही कुणी नव्हतं. अभिनय तेव्हा तीन वर्षाचा होता. त्यालाच बरोबर घेऊन गेले. म्हैसूरला उतरून मी थेट सेटवर पोहोचले. अमिताभ तेव्हा माझी वाटच पाहत होता. मला नमस्कार करून म्हणाला, ‘अरे, आपने हमे बचा लिया. तेव्हा कळलं की, ही भूमिका आधी दुसरी अभिनेत्री करणार होती. पण अमिताभबरोबर काम करण्याचा अनुभव नेहमी चांगला असे. तो एक जबरदस्त अभिनेता आहे.

या चित्रपटांनंतर इंडस्ट्रीपासून तुम्ही काही काळ दूर राहिला होतात ?
सीमा देव : हो ना, तब्बल दहा वर्ष मी काम करत नव्हते. मी ‘रूप की रानी, चोरों का राजा’ या चित्रपटात काम केलं होतं. तो तब्बल चार वर्ष रखडला. त्यानंतर श्रीदेवीच्या एका गाण्यासाठी आमचे बरेच सीन कापण्यात आले. वास्तविक डबिंग करताना मला अनिल कपूर म्हणाला होता, ‘हम माँ-बेटे के सीन बहुत बढिया हुए है.’ पण ते सीन कापून टाकण्यात आले. मी केवळ तीन फ्रेममध्ये दिसले. त्यावेळी मनाशी ठरवलं की, आता चित्रपट करायचा नाही. तो निर्धार दहा वर्ष राहिला.

या काळात तुमचा संसार कसा चालू होता ?
सीमा देव : आम्ही काही काळ कोल्हापूरला होतो. तेव्हा रमेशच्या मेहुण्यांनी त्यांना सांगितलं, ‘तिला घरी कशाला बसवतोस? तिला काम करू दे.’ रजपुतांमध्ये बहिणीच्या नव-याचा शब्द फार महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे काम करण्यासाठी आम्ही पुन्हा मुंबई गाठली. तेव्हा मी खारला घर घेतलं होतं. ते माझ्यासाठी फार लकी ठरलं. या घरातच माझी कारकीर्द बहरली. अजिंक्यचा आणि नंतर अभिनयचा जन्म झाला. दोघेही शाळेत असताना मी एक गोष्ट ठरवली होती की, त्यांना शाळेत जाण्यासाठी गाडी द्यायची नाही. त्यामुळे इतर मुलांसारखेच ते शाळेत जात. अजिंक्यने दहावी झाल्यानंतर पार्ले कॉलेजला प्रवेळ घेतला. कम्प्युटर सायन्स करून अमेरिकेला जायचं होतं, पण त्याच दरम्यान त्याला मद्रासवरून ‘संसार’ या चित्रपटासाठी बोलावणं आलं. पुढे बाबासाहेबांनी त्याला पाहून सांगितलं, ‘अरे, सर्जाची भूमिका करायला दुस-या कुणाला कशाला बोलावता? तोच ही भूमिका करेल.’ शेवटी रमेशच्या इच्छेनुसार तो याच क्षेत्रात आला. अभिनयने आर्किटेक्चर केलं, पण त्याला ते आवडेना, मग तो जाहिरात क्षेत्रात आला. त्यापूर्वी आमच्या एका मालिकेचे दोन भाग त्याने दिग्दर्शित केले होते. त्याचा त्याला उपयोग झाला. एकूण आजवरचं सगळं आयुष्य सुखा-समाधानात गेलं आहे. जे जे हवं होतं ते ते सगळं मिळालं. खरं तर मला फार काही मिळावं, अशी इच्छा नव्हतीच. त्यामुळे जे मिळालं ते भरपूर आहे. आईची साथ मिळाली आणि पतीचा चांगला आधार मिळाला. रमेशचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते सतत कामात असतात. जेव्हा शूटिंग करत नसतात तेव्हा घरातल्या घरात तरी काही तरी काम काढून बसतात. अजिंक्य व अभिनय आता आमचंच प्रॉडक्शन हाऊस सांभाळताहेत. दोघांचं चांगलं नाव झालं आहे. एक सुखी-समाधानी आयुष्य जगल्याची कृतार्थ भावना आज माझ्या मनात आहे.

मुलाखत : सीमा देव
मुलाखतकार : राजेश शिरभाते
स्त्रोत : प्रहार

 

Comments

More in मनोरंजन