कवी

शब्दयात्री समीर सामंत

शब्दयात्री समीर सामंत
मुलाखतकार


‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटाने रसिक प्रेक्षकांना स्वरगंगेत न्हावून निघण्याचा आनंद मिळवून दिला. नुकतेच या चित्रपटाने ५० दिवस पूर्ण केले. कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाचे चित्रपटात रुपांतर करताना त्यात काही बदल करण्यात आले. मूळ नाटकात असलेल्या गाण्यांसोबत आणखी काही गाणी चित्रपटासाठी खास तयार करण्यात आली. यातील दिल की तपिश, यार इलाही ही कव्वाली आणि अरुणी कीरणी  गाण्यांच्या माध्यमातून चित्रपट गीतकार म्हणून पदार्पण करणारे कवी समीर सामंत या शब्दयात्री माणसाची कहाणी उन्ही की जुबानी, खास मुलाखत. कॉमच्या वाचकांसाठी .

कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाच्या यशासाठी तुमचं अभिनंदन. तुम्ही लिहलेली गाणी विशेष गाजलीयेत. पदार्पणातच अनेक मान्यवरांकडून शाबासकीची थाप मिळाली. काय भावना आहेत ?
उ-
गाणी गाजण्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा या प्रोजेक्टचा आहे. कट्यार काळजात घुसली हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला. तीन पिढ्यांनी हा चित्रपट बघितला. त्यामुळे कौतुकाची थाप, कौतुकाचे बोबडे बोल आणि आशिर्वाद या तिन्ही गोष्टी या चित्रपटाला मिळाल्या. याचा आनंद आहे.

कट्यारचा योग नेमका कसा जुळून आला ?
उ- दोन वर्षापूर्वी म्हणजे ३१ डिसेंबर २०१३ ला मला माझा मित्र मंदार चोळकर याचा फोन आला आणि त्यानं विचारलं की, एका पिक्चरसाठी गाणी लिहणार का ? मी सरळ नाही सांगून टाकलं. कारण कविता लिहणं आणि चित्रपट गीत लिहणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग तो पुढे म्हणाला की तुला दोन गोष्टी सांगतो. पहिली ही की, चित्रपट कट्यार काळजात घुसली हा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंकर एहसान लॉय या चित्रपटाचे संगीतकार आहेत. मी त्याला प्रतिप्रश्न केला की तु मला हे सांगतोयस की घाबरवतोयस ? मग वैभव चिंचाळकरने सांगितलं की, एक अशी कव्वाली लिहायची आहे जी स्टोरी लाईनच्या बाहेर आहे. कोणत्या सिच्युएशनला कव्वाली आहे ते सांगण्यात  आलं. मग पंधरा मिनिटांत तीन पान भरून कव्वाली लिहून काढली.  शंकरजींनी ओके केल्यावर मग त्या गाण्यावर पुढची प्रक्रिया सुरु झाली.
मूळ ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकात ‘या भवनातील गीत पुराणे’ हे गाणे ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी एक गाणे हवे होते. मूळ नाटकातले गाणे चित्रपटात घेणे शक्य नव्हते कारण चित्रपटातला खाँसाहेब उर्दू, हिंदी बोलताना दाखवला आहे. त्यामुळे तो मराठी गाणे गातोय हे दाखवणे चुकीचे ठरले असते. मग सुरसे सजी संगिनी गाण्याची निर्मिती झाली.
चित्रपटात कविराज म्हणत असलेले काही छंदही मी लिहले आहेत. विशेषतः सुरवातीला येणारे ‘भारत के हृदय में नगरी विश्रामपूर’ तो छंद मी लिहिला आहे. बरेचसे छंद नंतर चित्रपटात नाही आले. पण डीव्हीडीमध्ये असतील.
‘दिल की तपीश’ या किरवाणी गाण्याचा रफ ट्रॅक अगोदर तयार होता.  त्याचे बोल नंतर लिहले.
एखादी व्यक्ती, त्याची मानसिकता, त्याची भाषाशैली समजून डायलॉग लिहले जातात. माझी गाणी लिहण्याची प्रोसेससुद्धा अशीच आहे. मी गाणी लिहताना या सगळ्या गोष्टी समजून घेवून मग  गाणी लिहिली आहेत.

 समीर सामंत हे नाव weचार च्या माध्यमातून बहुश्रुत होतंच. We-चार च्या मागे नेमका काय थॉट होता ?

Sameer1
उ- शब्दांमध्ये वेगळी ताकद असते. अगदी दोन शब्दांमधील पॉजलाही अर्थ असतो. काही कविता वाचताना मजा येणाऱ्या असतात. आणि काही ऐकताना मजा येते. we –चार हा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे शब्द हेच शस्त्र आणि शास्त्र आहे. आमचा काव्यांजली नावाचा ऑर्कूट ग्रुप होता. ज्यात आम्ही कविता शेअर करायचो. मग कविता वाचणं सुरु झालं. मैफिली रात्रभर रंगू लागल्या. मग इ वरले अक्षर हा कवितांचा कार्यक्रम केला. नवरस रंग स्पर्धेत कविता सादर केल्यावर नायगावकरांनी त्याला दाद दिली. मग ठाण्याच्या साहित्य संमेलनात कवितांचा प्रयोग केला. तिथे We- चारच्या निर्मितीचं बीज रुजलं.  २०११ मध्ये हा कार्यक्रम मी, मंदार चोळकर, प्राजक्त देशमुख, मकरंद सावंत अशा चौघांनी हा पोएटिक पफॉर्मन्स करायचं ठरवलं. यात नंतर आणखी काही जण जोडले गेले. एखाद्या शोची ऑफर आली की जे चौघे उपलब्ध असतील त्यांनी मग तो कार्यक्रम करायचा असं ठरवण्यात आलं. पण कार्यक्रमाचा दर्जा आम्ही तोच ठेवला आहे.  आतापर्यंत याचे ५२ प्रयोग झाले आहेत.

 ‘We-चार’ ते ‘कट्यार’ या प्रवासाबद्दल काय सांगाल ?
उ- We –चार अजूनही चालूच आहेच. पण कट्यार काळजात घुसली हा आमच्यासाठी माईलस्टोन ठरला आहे. चित्रपट गीत आणि कविता यात फरक आहे. चित्रपटाची एक वेगळी भाषा असते. ती समजून काम करावं लागतं. उदाहरण सांगायचं तर, ‘अरुणी किरणी’ लिहिताना माझ्या डोक्यात गुरुशिष्याचं नातं होतं. म्हणून त्यात असे बोल आहेत की –
अरुणी किरणी धरणी गगन चमके               Sameer4
भ्रमीत भ्रमर करी गुंजन हलके
अधीर मन मम जणू सरीत जल करीत स्वर झरझर…
धीम तनन धीम तन उदतन धेरेना …
हो… बरसत बरसतबरसे बरसे दिव्यभान स्वर्ग देस बरसे

तरसत तरसत तरसे तरसे मन तृषार्थ तव कृपेस तरसे
मम अंतरात मन मंदिरात स्वर ताल साज आज घुमतो
मन धुंद आज तव गुंजनात गुरुराज आज तुजसि दास स्मरतो ………………
या फिल्मसाठी काम करता करता कट्यार काळजात घुसलीच्या टीमशी एक नातं निर्माण झाले आहे. मला संपूर्ण प्रक्रिया अनुभवता आली. माझ लिखाणाचं काम संपल्यानंतरही शुटींग, डबिंग, एडीटिंग, ग्राफिक्स सगळ्या प्रक्रिया करताना मी त्या त्या ठिकाणी जायचो. चित्रपटाच्या एकूण प्रक्रियेत मला केव्हाही कुठेही जायला मनाई नव्हती. कट्यारसाठी तयार केलेला व्हॉट्स अप ग्रुप आम्ही अजूनही बंद केला नाही. आम्ही सगळे अजूनही संपर्कात असतो. मला या चित्रपटामुळे खूप चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभला.


चांगलं लिहिण्यासाठी चांगलं वाचावं लागतं
. कवी म्हणून घडत असताना नेमका कोणाचा प्रभाव तुमच्यावर अधिक राहिलायया सर्वात तुमची वाचनाची प्रोसेस नेमकी कशी होती 
?
उ- माझ्या आजोबांमुळे मला वाचनाची आवड लागली. लायब्ररीत जाऊन मी लहानपणी खूप पुस्तक वाचली आहेत. पण माझं गद्य वाचन जास्त होतं. जुन्या हिंदी चित्रपटातली गाणी, गझल ऐकणं आणि वाचणं व्हायचं. ते आवडायचं. त्यामुळे जुन्या- नव्या अशा सगळ्या गझलकारांचा  माझ्यावर प्रभाव आहे. माझं मराठी वाचन त्यामानाने कमी होतं. अर्थात मराठीच्या दिग्गज लेखकांचं लेखन मी आवर्जून वाचलं आहे. मला असं वाटतं की, लिखाण करण्यासाठी वाचनापेक्षा विचार महत्वाचा आहे. आणि आपल्या विचारांना खाद्य देणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला रोज घडत असतात. माझ्या मते, लेखन म्हणजे परचित्त प्रवेश असतो. लेखक आजूबाजूची परिस्थिती अनुभवून लिहतो आणि अनेक घटना कागदावर उतरवतो.

तुम्ही बीएनपी परीबास बँकेत काम करता आणि कवीगीतकार म्हणूनही काम करत आहात. दोन्ही अर्थाने अर्थाशी निगडीत या कामांचा समतोल कसा सांभाळता ?
उ- मी या क्षेत्रात ठरवून आलो नाही. ‘आय वॉन्ट आर्टीस्टिक हार्ट, कमर्शियल ब्रेन अॅन्ड सायंटिफिक व्हिजन’ असं मी घरच्यांना सांगायचो. आणि म्हणायचो आता तुम्ही ठरवा मी कुठे जायचं ते- आर्ट्स, कॉमर्स की सायन्स.पण डेबिट – क्रेडीट मध्ये काम सुरु झालं. माझा या बँकेतलं काम बॅंक ऑफिसचं आहे. बीएनपी परीबास ही फ्रेंच बॅंक आहे. यात एशिया रिजनमधलं लोन्स आणि डीपॉझिटचं काम माझ्याकडे असतं. बँकेतलं काम सांभाळून मी लिखाण आणि We –चारच्या कविता सादरीकरणाचे कार्यक्रम करत असतो.

लहानपणापासून आपल्याला लिखाणाची आवड होती का ती कशी निर्माण झाली ?
उ- मला लहानपणी लिखाणापेक्षा स्टेजवर  जाऊन आपली कला सादर करण्याची खूप आवड होती. पण शाळेत असतानाच मी कविता लिहायला लागलो. पहिलं प्रेम, प्रेमभंग होण्याचं ते वय. या वयातला हा टप्पा कुरवाळतानाच लिहायला लागलो. माझ्यावर पु. ल. देशपांडेंचा खूप प्रभाव होता. म्हणजे एक माणूस म्हणून आणि त्यांच्या विचारांच्या बाबतीत मी त्यांना मानतो. पु. लं.ची पर्सनल आणि पब्लिक इमेज सेम होती. हे खूप आवडायचं. त्यांचं लिखाण वाचायचो. नंतर मग महाविद्यालयीन जीवनात नाटकाच्या स्पर्धांसाठी नाटकाची  संहिता लिहण्यासाठी मित्र मला गाठू लागले. मग मराठीत, गुजरातीत छोटी- मोठी नाटकेही लिहू लागलो.

उर्दूमराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषात मुसाफिरी करणे कसं शक्य झालं ?
उ- आपले विचार स्वतः माध्यम निवडत असतात. त्यांचा मार्ग ते निवडतात. लिहताना थॉट जसा डेव्हलप होत जातो, तसा मी लिहत जातो. काहीवेळा ठरवून एका भाषेत लिहलं जातं. पण अदरवाईज विचार आपोआप एखाद्या भाषेत मांडला जातो.

कट्यार काळजात घुसली हा संगीत नाटकावर बेतलेला सिनेमा आणि त्यासाठी तुम्ही लिहलेलं अरुणी किरणी हे गाण शास्त्रीय संगीतातील गाणे वाटते त्यात दम सांस आहे. हे गाण कसं सुचलं तुम्हाला शास्त्रीय संगीताची जाणआवड किंवा तुम्ही हे शिकला आहेत असं काही आहे का ?
उ- अरुणी किरणी या गाण्यात दम सांस आहे. ते गाणं त्रिताल तराणा आहे असं मला एकाने सांगितलं. मला जर माहित असतं की त्रिताल तराणा लिहायचा आहे तर कदाचित हे लिहलं नसतं. मी शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही. मी शास्त्रीय संगीतावर आधारित जुनी गाणी ऐकली. हे गाणं लिहताना माझ्या डोक्यात बैजू बावरामधल्या ‘मन तरपत आज…’ गाण्यातील ‘बिन गुरु ग्यान कहा से पाऊँ,देजो दान हरी गुण गाऊँ…..’ त्या सगळ्या लाईन्स होत्या. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की कट्यार काळजात घुसली नाटकातलं सदाशिवने गायलेलं तुमचं आवडतं गाणं कोणतं ? असं विचारल्यावर लोक अरुणी किरणी सांगतात. नव्याने बनवलेल्या या नाटकाच्या संचात महेश सदाशिवची भूमिका करतो. मी महेश काळेला गमतीने म्हणतो की एक दिवस लोक नाटकात हे गाणं घ्यायला लावतील. चित्रपटात महेशने हे गाणं खूप सुंदररित्या गायलं आहे. आणि शंकर एहसान लॉय यांनी संपूर्ण चित्रपटासाठी उत्तम संगीत दिलं आहे. म्हणून ते इतकं छान झालं आहे.

शंकर महादेवन आणि सुबोध भावे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

12193640_1071750366177894_60191264661695803_n
उ- 
शंकरजी व्हर्साटाईल माणूस आहे. एकीकडे त्यांचं कट्यारचं काम चालू होत. मध्येच कुठेतरी साउथ इंडियन गाणं रेकॉर्ड करून यायचे. मग मध्येच बॉलीवूडचं एखादं गाणं करून यायचे. पण सगळी काम करताना कमालीची एनर्जी. एकदा एका गाण्याचं काम करायला बसले की ते संपवूनचं मग उठायचे. त्यांची काम करण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे. त्यांचं काम हसत-खेळत चालू असतं. ते जेव्हा तेजोनिधी लोहगोल गात होते तेव्हा त्यांच्या मुलाने विचारलं की हेच गाणं तुम्ही पूर्वी रियाज करताना म्हणायचात ना ? त्यावर ते म्हणाले की, ‘हो, याच गाण्यांचा रियाज करून तर आम्ही मोठे झाले आहोत’.
सुबोध भावे यांच्याबद्दल बोलायचं तर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. त्यांना नेमकं काय हवं आहे या बाबतीत ते अगदी क्लिअर असतात. त्यांच्या मनात एक आराखडा तयार असतो. या चित्रपटाच्या तयारीच्या आधीपासून ते दिवसरात्र भीमसेन जोशींची आणि इतर गायकांची शास्त्रीय गाणी ऐकायचे. त्यांच्या गाडीतही कायम हीच गाणी लावलेली असायची. त्या जुन्या गाण्यांमध्ये मध्येच वाहवा अशी दाद असायची किंवा टाळ्या असायच्या. तसाच इफेक्ट त्यांना चित्रपटातही हवा होता. त्यामुळे लोकांना खरंच एखाद्या मैफिलीत बसल्यासारखा  फील येतो. दाद दिली जाते. त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात घेतली की चांगला कलाकार हा चांगला रसिक असतो. सदाशिवचा रोल करताना त्यांनी शेवटच्या सीनमध्ये सतार वाजवणाऱ्याला दाद दिली आहे. ती कौतुकाची दाद आहे.

तुमच्या घरी कुणी लेखन क्षेत्रात आहे का एकूण लेखन क्षेत्राविषयी आपल्या घरच्यांचा दृष्टीकोन कसा होता आता कसा आहे ? त्यांचा सपोर्ट कशा स्वरूपाचा होता ?
उ- माझे आजोबा नाटक लिहायचे आणि दिग्दर्शनसुद्धा करायचे. माझी आई डायरीत थोडं थोडं लिहून ठेवायची. त्या गोष्टीही सुंदर असायच्या. घरच्यांनी कधीच कोणत्या गोष्टीसाठी डिस्करेज केलं नाही. छोट्यात छोट्या गोष्टीचंही कौतुक केलं. त्यांनी कायम प्रत्येक गोष्टीसाठी पाठींबा दिला. we-चार कायम चालू रहावं, असा त्यांचा सगळ्यांचा दृष्टीकोन आहे. आणि एक गोष्ट मी कायम पाळत आलो आहे की, माझ्या लिखाणामुळे वाईट सामाजिक परिणाम होणार नाहीत, मी टीकेचा धनी होणार नाही ही खबरदारी मी घेतो. कसं आहे की तलवार चालवणाऱ्याला ती म्यानही करता आली पाहिजे.

सध्या काय लिखाण सुरु आहे चित्रपटासाठी गीते लिहण्याचा विचार आहे का ?
उ- मी झिपऱ्या कादंबरीवर आधारित केदार वैद्य यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहतोय. त्यासाठी ट्रॉय अॅरीफ संगीत दिग्दर्शन करणार आहेत. त्या चित्रपटात बूटपॉलिश करणाऱ्या मुलाच्या भाषेत एक गाणं लिहलं आहे. पुष्कर श्रोत्रीचा एक चित्रपट येतो आहे. ज्याला कौशल इनामदारचं संगीत असणार आहे. त्यासाठी लिहतो आहे. मी चित्रपट गीत लिहताना आधी परीस्थिती, पात्राची भाषा समजून एक-दोन ओळी लिहून काढतो. चित्रपट करणाऱ्यांकडून मी योग्य ट्रॅकवर आहे का हे तपासण्यासाठी त्यांना त्या ओळी दाखवतो.  मग पुढे जातो.

चित्रकथी मालिकेचे शीर्षकगीत आपण लिहलं आहे या अनुभवाविषयी थोडक्यात सांगा.
उ- कोणतेही गीत लिहताना मी ते गीत जिथे वापरायचे आहे तो कॅनव्हास समजून घेतो. शीर्षकगीत लिहतानाही मी असंच केलं आहे. तो खूप चांगला अनुभव होता.

 वंदे मातरम नाटक , गझल अल्बम या  टप्प्यांचा अनुभव कसा होता ?
उ- वंदे मातरम १८५७ ते १९४७ हा एक प्रायोगिक प्रयोग होता.वसंत पोतदारांच्या संहितेचे मकरंद सावंत आणि मी नाट्यरुपांतर केले होते. सशस्त्र क्रांतीकारकांची ९०वर्षांच्या लढ्याची कहाणी आम्ही यातून मांडायचा प्रयत्न केला आहे. सगळ्या गोष्टींची जुळणी झाल्यावर हे नाटकसुद्धा पुन्हा लोकांसमोर येईल.
‘दरमियाँ’ हा गझल अल्बम गेल्या वर्षी आम्ही निफाडकरांच्या हस्ते रिलीज केला. यात काही गझल्स मी आधी लिहलेल्या होत्या. काही नवीन आहेत. तो आम्ही मित्रांनी मिळून केलेला अल्बम आहे. मैत्रीमध्ये अशा खूप चांगल्या गोष्टी घडतात. ‘इसक बागीयॉं’ हे गाणंसुद्धा जयदीप, खलील आणि मी, असं मित्रा- मित्रांनी मिळून केलेलं गाणं आहे. प्रेमाच्या बंडाविषयी हे गाणं आहे.

आयुष्यात काय ध्येय ठेवून तुम्ही चालत आहात ?
उ- मी असं ध्येय वगैरे काही ठरवलं नाही. पण एक माणूस म्हणून चांगलं रहावं ही गोष्ट नक्की पाळतो. जे समोर येईल त्याला मी सामोरा जातो. काही गोष्टी आपल्या डेस्टिनीमध्ये असतात. जसा कट्यार चित्रपट होता.

कट्यार काळजात घुसली चित्रपटासाठी काम करतानाच्या काही स्पेशल आठवणी आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तुमच्या गाण्यांना एखाद्याने लक्षात राहील अशी दिलेली दाद आठवतेय का ?

12063601_10154090397049769_1243688018909150492_n
उ- लोकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. शेवटच्या अरुणी किरणी गाण्याला तर लोकांनी थिएटरमध्ये स्टँडिंग ओव्हेशन देवून दाद दिली आहे. महेशच्या गायनाला मिळालेली ही मोठी दाद आहे. जगभरात लोक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिकेत ३०पेक्षा जास्त ठिकाणी हा चित्रपट लोकांना पाहता आला. कतार, दुबईमधले शोसुद्धा खूप गाजले. यू.के. मध्ये आता हा चित्रपट लोकांना पहायला मिळणार आहे.

लेखन क्षेत्रात पदार्पण करत असणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता ?
उ- चांगलं वाईट, छोटं- मोठं पण लिहत रहा इतकचं मी सांगेन. आपण प्रत्येक गोष्टीवर व्यक्त झालं पाहिजे. तुमच्या संवेदना जाग्या ठेवा. विचार आणि अभिव्यक्तीची माध्यम वापरून व्यक्त व्हा. लिखते रहो.
Sameer2

 मुलाखत : समीर सामंत
मुुलाखतकार :  साधना राजवाडकर
स्त्रोत : मुलाखत.कॉम

Comments

More in कवी