घटना

I am happy dead than being alive – रोहिथ वेमुल्ला

I am happy dead than being alive – रोहिथ वेमुल्ला
मुलाखतकार

आणखी एक व्यवस्थेचा बळी, आणखी एका दलिताला आपला जीव संपवण्यास भाग पाडलं ते ह्याच व्यवस्थेने. अजून किती बळी ही व्यवस्था घेणार आहे आणि आपण घेऊ देणार आहोत. या पूर्वीही दलित अत्याचारांविरोधात चळवळी होत्याच, आजही आहेत. पण त्याने खरंच काही होतंय का? या घटनेनंतर एका दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या बातम्या सर्वदूर पसरल्या, निषेध नोंदवले गेले, अनेकांनी ही आत्महत्या नसून ही उघड-उघड खूनाची घटना आहे असं आपले मतंही ठळकपणे मांडले.
रोहिथ वेमुल्लाच्या आत्महत्येनंतर देशभरातून निषेधाचा सूर तीव्र होतो आहे. ही आत्महत्या नसून संस्थात्मक जातीय द्वेषातून घ़डवून आणलेली हत्याच आहे. यावरील काही विशेष मतं खालीलप्रमाणे :

जयंत पवार :-  हा व्यवस्थेचाच बळी आहे. बीजेपी सरकार आल्यापासून आपण पाहतोय कि हिंदुत्ववादी संघटना-आंबेडकरी संघटना-डाव्या संघटना असा हा संघर्ष वाढतोच आहे. ज्याचे प्रमाण दक्षिण भारतात युनिवर्सिटी लेवलला अधिक दिसते आहे. त्यामुळे अशा चळवळींमध्ये अधिक तर स्कॉलर मुलं असतात, ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ही व्यवस्था करत असते. मग यामध्ये डाव्या विचारसरणीच्या मुलांना नक्षलवादी ठरवण्यात येतं तर आंबेडकरी विचारांच्या मुलांवर मानसिक दबाव टाकण्यात येतो. यात सरळ सरळ विरोधी विचारसरणींना दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो, मग त्या विद्यार्थ्यांना आधी ब्लॅक लिस्ट करण्यात येते, त्यांनी त्या विरोधात प्रोटेस्ट केलं कि मग थेट काढूनच टाकण्यात येतं. दलित मुलं गरीब घरातून आलेली असतात, त्यामुळे तसं पाहता आधीच त्यांना पाठिंबा कमी असतो. त्यात तुम्ही असे सतत त्यांना दाबत राहिलात तर ते काय करतील. एकतर त्यांना आधार असतो तो त्यांच्याच सारख्या प्रतिकूल परिस्थितीत जगणा-या समवयीन मुलांचाच, ते तरी एकमेकांना किती दिवस असा आधार देणार….  त्यामुळे या वयातील मुलं या पध्दतीने रिअॅक्ट होतात हे आता शासनाने जाणून घ्यायला हवं नि विद्यापीठाच्या प्रशासनाने वा आपल्या शासनाने आता याकडे मानवी दृष्टिकोनातून पहायला हवं. बीजेपीचं धोरण मात्र हे सगळे आपल्या विरोधातच आहेत असंच असतं. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं कि सर्व प्रकारचे विद्यार्थी आपल्यासमोर घडत असतात. त्यामुळे त्यातील आपल्या विरोधी मतांनाही योग्य ती स्पेस ही मिळायलाच हवी. ते चूकत असतील तर त्यांना शिक्षा ही मिळायलाच हवी, फक्त त्या शिक्षेची पध्दत वा दृष्टिकोन हा मानवी असायला हवा जो आज हरवलेला दिसतो आहे. या संदर्भात आपल्या स्मृती ईरानी म्हणजेच मानव संसाधन विकास मंत्र्यांनी घेतलेली भुमिका म्हणजे त्या शत्रु समजूनच हे करता आहेत असंच वाटत आहे. याचा परिणाम उलटाही होऊ शकतो हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. राहता राहिला प्रश्न ABVP ला बॅन करण्याचा, तर मला तसं काही वाटत नाही. आंबेडकरी चळवळ असो वा  ABVP असो प्रत्येकाला त्यांचं म्हणणं मांडता यायला हवं. आपल्या विरोधी मतांचं दमन करणं हा त्यावरील उपाय नाही. त्यामुळे या आत्महत्येला व्यवस्थाचा १०० टक्के कारणीभूत आहे असं माझं मत आहे, ज्या व्यवस्थेची मनोबल खच्चीकरण करणे ही रणनिती आहे. एखाद्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हा खूनच आहे.

संजय सोनावणी :- आयआय़टी, आयआयएम सारख्या ठिकाणी ब-याचदा दलित-आदिवासी युवकांना वाईट वागणूकच दिली जाते. चार्तुवर्णधिष्ठित अशा या समाजात त्यांना वारंवार अपमान सहन करावा लागतो, त्यांच्याकडे हेतूपुरस्सरपणे दु्र्लक्ष करण्यात येते, आणि हे वर्षानुवर्षे देशभर घडत आहे. त्यामुळे या आत्महत्येला व्यवस्थेने केलेला खुनच म्हणावा लागेल. कारण या आत्महत्येला ही वर्णवादी, वैदिकवादी व्यवस्थाच जबाबदार आहे. तुम्ही पहाल तर, अजूनही जातीनेच गुणवत्ता ठरवली जाते. कारण उच्च वर्णीयांना मान्यच नाही कि उत्तम गुणवत्ता ही दलितांमध्येही असू शकते. दलितांमध्येही प्रतिभा असू शकते हे त्यांंना मान्यच नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक वातावरण निर्माण करून असे मानसिक खून केले जात आहेत. ज्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यात दलितांचं, आदिवास्याचं होणारं नुकसान हे जास्त भयंकर आहे. अशी घटना कळल्यावर तेवढ्यापुरतं आपण फेसबुकवर पोस्ट टाकतो, निषेध करतो, फारफार तर ४-५ दिवस आपण यावर चर्चा करतो, तेवढ्यापुरतं आपण खडबडून जागे होतो, पण नंतर मात्र सगळे हे सर्व काही विसरून पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला लागतात सुद्धा. म्हणूनच आता या बुध्दिवादी तरूणांसमोर आज एक आव्हान आहे ते म्हणजे या परिस्थितीला तोंड देणारी रणनिती तयार करणं, तीच आज काळाची गरज आहे. कारण आपण आधी अन्याय होऊ देतो नि मग जागे होतो. पण आता तसं होऊ न देता, २४ तास चालणारी कायमस्वरूपीची चळवळ उभी करणं आज आवश्यक आहे. कारण या सर्व घटनांना सरकारचा अदृश्य पाठिंबा आहे, यात काही शंकाच नाही. आरएसएस सारख्या संघटना चार्तुवर्ण कसा योग्य आहे हे कुठलेही सरकार असले तरी सातत्याने विष पेरण्याचा प्रयत्न करतच असतात, त्यावर आता कायमस्वरूपी बंदी आणणं आज गरजेचं आहे. म्हणून तुकाराम म्हणतात तसं, रात्रं दिस आम्हा युद्धाचा प्रसंग  ह्या प्रमाणे आपणही आता सतत जागृत राहून या परिस्थितीला तोंड देणं अपेक्षित आहे.

मुग्धा कर्णिक :-  ही जातीय द्वेषातून घ़डवून आणलेली हत्याच आहे, असं मी म्हणणार नाही. प्रत्येक आत्महत्या ही परिस्थितीमुळेच केलेली आत्महत्याच असते. त्या व्यक्तीचे आत्मबळ कुठेतरी कमी पडते म्हणून ती व्यक्ती आपलं आयुष्य संपवते. तसं पाहिलं तर असे कितीतरी तरूण आज आहेत कि जे याच परिस्थितीतून जात आहेत, त्यांनाही त्याच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, पण म्हणून ते काही आत्महत्या करत नाही. तर ते त्या परिस्थितीला तोंड देत लढत राहतात, धडपडतात नि पुन्हा उभे राहतात. वैभव छाया सारखी मुलं असतील, ती सगळी लढतातच आहेत ना या व्यवस्थेविरूद्ध. अर्थात व्यवस्थाही याला जबाबदार आहे, पण हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे, असं मात्र मी म्हणणार नाही. त्याचं कमी पडलेलं आत्मबळ नि व्यवस्था यातून केलेली ही आत्महत्या आहे असंच मी म्हणेन.

गौरव सोमवंशी :-  मी गेल्या महिननाभरापासून या विषयीच्या पोस्ट टाकतोय, पसरवतोय. यातून काढलेला एक निकष मी इथे सांगू इच्छितो कि, दलित मुलांमध्ये वीकनेस असतो असं नेहमी म्हटलं जातं. तर असं अजिबात नाहीये. रोहिथ मध्ये तुमच्या आमच्यापेक्षा खूप आत्मविश्वास होता, पण तरी देखील तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला म्हणजे तुम्हीच विचार करा कि  त्याचा समोरचा जातीयवाद किती भयंकर असेल…. मी यासंदर्भात एवढंच सांगेन कि suicide is still a murder.

संकलन : सुजाता शिरसाठ
स्त्रोत : मुलाखत.कॉम

Comments

More in घटना