भूमिका

शतकवीर लेखकाचे रंग-रूप!

शतकवीर लेखकाचे रंग-रूप!
मुलाखतकार

 

रत्नाकर मतकरी यांच्या १०१व्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने २०१२ साली प्रहार वृत्तपत्रामध्ये छापून आलेली ही विशेष मुलाखत. पुस्तकांचं शतक साजरं होऊनही नाबाद असलेले मतकरी या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने विविध टप्प्यांवर एक लेखक म्हणून स्वत:ची वृद्धी कशी झाली आणि सामाजिक भानाचे संदर्भ वेळोवेळी कसे बदलत गेले याविषयी खुलून बोलले. कथा, गूढकथा, कादंबरी हे प्रकार यशस्वीरीत्या हाताळूनही हा लेखक आपल्यातल्या नाटककाराला टिकवून ठेवण्यासाठी आयुष्यभर कसा धडपडला, हे या मुलाखतीतून उलगडतं.

तुमच्या १०१व्या पुस्तकाबद्दल तुमचं अभिनंदन! शंभर पुस्तकं झाल्यानंतर फुलस्टॉप घ्यावा असं वाटणं साहजिक असतं. एक टप्पा झाला, आता थांबू या, असं तुम्हाला वाटलं नाही का ? आता पुढे सांगण्यासारखं उरलं नाही, अशी मानसिकता न जोपासता पुढच्या पुस्तकाची सिद्धता का करावीशी वाटली ?
उ- हे पुस्तक ब-याच दिवसांपासून येण्याचं घाटत होतं. त्यात माझे पूर्वीचे लेख आहेत. जवळ जवळ ५०-५५ वर्षापूर्वी मी बालरंगभूमीविषयी लिहून ठेवलं होतं. त्यावेळची बालरंगभूमीची वाटचाल, नाटक कंपन्यांचे व्यवहार याविषयी मी दिवाळी अंकांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये लिहीत होतो. हे लिखाण इतकं पूर्वीचं असूनही आजच्या काळालाही लागू पडतं. कारण परिस्थिती फारशी बदललेली नाही. व्यावसायिक रंगभूमीवरचे व्यवहार तसेच आहेत. संदर्भ फार बदललेले नाहीत. माझ्या डोक्यात या पुस्तकांचं महत्त्व डॉक्युमेंटेशनच्या दृष्टिकोनातून आहे. लोकांना ती उपलब्ध झाली पाहिजेत. ‘सखाराम बाईंडर’ किंवा हिट अ‍ॅण्ड हॉट नाटकं जेव्हा रंगभूमीवर गाजत होती तेव्हा रंगभूमीने काय वास्तव भूमिका घ्यायला हवी होती; हा विषय घेऊन अजूनही तेंडुलकरांच्या नाटकांवर ही चर्चा होऊ शकते. बालरंगभूमीविषयी काय भूमिका होती, नाटय़ परिषदेला काय काय करता आलं असतं. शाळांना काय करता येईल, आज काय परिस्थिती, त्यावेळी आम्ही नाटक केलं तेव्हा काय परिस्थिती होती. याचं डॉक्युमेंटेशन डोक्यात होतं.
मुळात रंग-रूप आणि रसगंध ही दोन पुस्तकं निघावी, अशी अपेक्षा होती. रसगंध अप्रेशिएटिव्ह रिव्ह्यूसारखं. ‘राहिले दूर घर माझे’, ‘अधांतर’सारखं नाटक त्यात घेतलं आहे. ते पुस्तकही तयार आहे. पण जमवाजमवीत वेळ लागला. ९९ आणि १०० वं पुस्तक असं मिळून ट्विन बुक काढण्याची कल्पना डोक्यात होती. ट्विन बुक ही संकल्पना आपल्याकडे नवीन आहे. एकाच वेळेला दोन पुस्तकं प्रकाशित करायची. अगदी आवळीजावळी. सारख्याच आकाराची आणि मांडणीची. नावंदेखील रंग-रूप आणि रस-गंध अशी. पण पहिल्या पुस्तकाचे फोटो वगैरे जमा करताना वेळ लागला. त्यामुळे दोन्ही पुस्तकं रखडली. दरम्यान ‘कायमचे प्रश्न’ हे शंभरावं पुस्तक ‘मनोविकास’ने काढलं. त्यात माझे राजकीय, सामाजिक सांस्कृतिक असे लेख होते. हे प्रेस्टिज प्रॉडक्टसारखं पुस्तक होतं. मी अमेरिकेत गेलो होतो, तिकडेच अनिल काकोडकरांच्या हस्ते उद्घाटन केलं. अशा तऱ्हेचा समारंभ भारतातही करण्याचं डोक्यात होतं. शंभरावं किंवा पुढचं यापेक्षाही यानिमित्ताने पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेतील प्रकाशकांसह इतरांची कृतज्ञता व्यक्त करण्याचं निमित्त असतं. प्रतिभाने शंभर पुस्तकांची शंभर मुखपृष्ठं सादर करण्याची संकल्पना सादर करण्यामागे चित्रकार आणि इतर अनेकांचं श्रेय मान्य करण्याचं उद्दिष्ट होतं. वसंत सरवटे, श्याम जोशी, सुभाष अवचट, चंद्रमोहन कुलकर्णी, पद्मा सहस्र्बुद्धे, पुंडलिक वझे या सगळ्या चित्रकारांचंही या वाटचालीत योगदान होतं.

एक लेखक स्वत:च्याच लेखांच्या डॉक्युमेंटेशनचा विचार करतो तेव्हा मनात नेमकी काय प्रक्रिया होत असते. मग ‘रंग-रूप’ची घडण करताना वेगळ्या संपादनाची आवश्यकता का भासली ?
उ- चार भागांत हे पुस्तक करावंसं वाटलं. मराठी रंगभूमीविषयी जनरल लेख, त्यानंतर नाटय़तंत्राचा भाग महत्त्वाचा. त्यात वाचन, नाटय़वाचनासारख्या गोष्टींवरचे लेख आहेत. त्या नाटय़लेखनाशी किंवा व्यावसायिक व्यवहाराशी थेट संबंधित नाही, पण नाटकातली भाषा आणि त्या अनुषंगाने माझं लिखाण या भागात आहे. तिसरा भाग बालरंगभूमीवरचा आणि शेवटी काही नाटकांवरती मी वेळोवेळी लिहिलेले लेख आहेत. विविध नियतकालिकांतील सदरांमध्ये आरण्यक, खोल खोल पाणी, दुभंग, लोककथा या नाटकांविषयी लिहिलं होतं. एकूण मराठी नाटकाच्या प्रॉब्लेमविषयीचे लेख यात आहेत. विषयानुरूप लेखांचा क्रम लावणं, त्यातला कालबाह्य भाग काढून टाकणं आवश्यक होतं. म्हणून मुकुंद कुळेंना संपादन करण्यासाठी सांगितलं. बाकी सगळे संदर्भ माझ्याकडेच होते. हल्ली अनेक संस्थांकडे काहीच जुना रेकॉर्ड नसतो. अनेक दुर्मीळ फोटो, लेख आम्ही शिस्तीने जतन करून ठेवले आहेत.

शंभर पुस्तकांच्या वाटचालीत वेगवेगळे टप्पे आले असतील. या टप्प्यांमध्ये एक लेखक म्हणून स्वत:तलं परिवर्तन तुम्ही तोलून बघितलं आहे का ?
उ- थोडा बदल वर्षानुवर्षाच्या वाटचालीतून होतोच. पण थोडं तुमच्यात मुळात असायला लागतं. मुलांची नाटकं जरी मनोरंजनासाठी काढलेली असली तरी त्यावेळचं सामाजिक भानही महत्त्वाचं होतं. कारण मुलांना त्यावेळी स्वस्तात नाटक बघता यायला हवीत, हा आमचा आग्रह होता. त्यावेळी बालनाटय़ मुलांना बघायला जायचं म्हणजे अर्थातच भावंडं, आईवडील यांच्यासह अख्खं कुटुंब जाणं आलंच. एका नाटकामुळे कुटुंबप्रमुखावर ५० रुपयांचा बोजा पडायचा. तो परडवणारा नव्हता. बरं त्याचे पैसे कुणाला मिळणार तर थिएटरवाल्यांना. म्हणून मग त्यावेळी आम्ही शाळांमधून नाटकं करायला सुरुवात केली. मुलांना त्यांच्या खाऊच्या पैशातूनच नाटक बघता येईल, हे आम्ही पाहायचो. तिकीटही आठ आणे किंवा रुपया. पण म्हणून थिएटरमधल्या नाटकाचा परिणामही कमी केला नाही. फक्त सेट कसा लावला पाहिजे, यावर नव्याने विचार केला. नट-नटय़ांना जरी अडचण होत असली तरी ती सोसून मास्किंग करून घ्यायचो. तळाशीलकरांसारखे नेपथ्यकारही छोटय़ा ठिकाणी नाटक करायचं असल्यास मास्किंग करून द्यायचे. स्वस्तात पडलं पाहिजे, पण स्वस्तात केलं असं वाटलं नाही पाहिजे, हे मनात पक्कं होतं. मग ट्रकवर, हॉस्पिटलमध्ये, स्लम एरियामध्ये जिथे जिथे मुलं आहेत तिथे नाटक केलं. हा सोशल विचारच होता.

तुमचे बालनाटय़ाचे प्रयोग सुरू असतानाच त्यावेळी सुधाताई, मोहन आगाशे आणि इतर लोकही बालनाटय़ांचे प्रयोग करत होते. त्या सर्वामध्ये समन्वय करून एकत्रितरीत्या ही चळवळ पुढे जाऊ शकली नाही…
उ- प्रत्येकाच्या चांगल्या कल्पना होत्या. मुलांच्या नाटकाचे विषयही वेगवेगळे. पण कुणालाच बाहेरच्या कुणाची मदत मिळाली नाही. थोडंफार सुधाला साहित्य संघ, नाटय़संपदाचं पाठबळ होतं. आम्हाला कुणाचीच मदत झाली नाही. काँट्रॅक्टर, शाळा इतर संस्था यांची मदत झाली असती तर प्रयोगांची संख्या वाढली असती. विषयही अधिक आले असते. बालमजुरीसारखा विषय आम्ही केला. स्लम्समध्ये काम करताना, पिनॅकियोची गोष्ट ही स्लम्समधल्या मुलाची गोष्ट केली. अगदी करमणुकीसाठी प्रयोग करताना मुलं मोठी होत असताना चांगले नागरिक बना, ही धारणा बिंबवली. स्त्रियांविषयी टिंगलटवाळी नको. चेटकी ही विद्रुप स्त्री आहे, म्हणून नाही तर मुलांनी तिच्या मूर्खपणाला हसले पाहिजे, हे आम्ही कटाक्षाने पाहिलं. बेसिकली न्याय शेवटी कुठल्या कॅरॅक्टरला होणार आहे हे महत्त्वाचं. करमणुकीपेक्षा सोशल अँगल होताच. गूढकथा हा फॉर्म लोकप्रिय असतानाही नाटकांमध्ये गूढता नाही आणली. नाटकात सोशल रिअ‍ॅलिस्टिक गोष्टी मांडल्या. कुष्ठरोग, हुंडाबळी, एड्स असे विषय लेखनातून आवर्जून हाताळले. ‘पानगळीचं झाड’ किंवा ‘जौळ’सारख्या कादंबरीतूनही ते मांडले. दरवेळी पर्याय सुचवलेच नाहीत असं नाही. जिथे शक्य आहे तिथे सुचवले किंवा यावर विचार करावा, असं सांगितलं.

एकशेएकावं पुस्तक झालं म्हणजे तुम्ही आता पुढेही पुस्तक काढणार हे लक्षात आलं. पुढचा प्रोजेक्ट कोणता आहे ?
उ- माझं ‘रंगप्रयोग’ हे पुस्तक येण्यातलं आहे. तीन भाग मौज दिवाळी अंकाने छापले होते. माझ्या प्रायोगिक नाटकांबद्दल तर लिहिलं आहेच, शिवाय दुभंग, घर तिघांचं हवं, चंपा गोवेकर, तुमचे आमचे गाणे या व्यावसायिक नाटकांबद्दलही मी लिहिलं आहे. ही थोडक्यात माझी थिएटरबायोग्राफी आहे.

तुम्ही तुमच्या लेखनातली थिएटरची आयडेंटिटी अधिक एन्जॉय करता..
उ-थिएटर हे सर्वसमावेशक म्युझिकसारखं आहे. ज्याला ज्यात गती आहे, ते त्याला ते मुळातून दिसतं. मला थिएटरची बॅकग्राउंड नाही. पण मी जे पहिलं वाचन केलं ते नाटकांचं होतं. तेव्हा तर मी शाळेतही जायला लागलो नव्हतो. शाळेत मला प्रॅक्टिकली तिसरीतच घातलं. सुरुवातीला मला जे वाचायला मिळालं त्यात नाटकांची पुस्तकं होती. तेव्हा लोक नाटकाची पुस्तकं विकत घ्यायचे. ‘संशयकल्लोळ’, ‘सौभद्र’ ही नाटकं मी तेव्हा वाचली होती. मला कंसातल्या रंगसूचनांबद्दल कुतूहल होतं. एक्झिट, एंट्री, संवाद यात स्वारस्य होतं. पुस्तकांच्या शेवटी नटांचे फोटो असायचे. त्यामुळे मला नट माहीत झाले होते. मागची चित्रं पाहून मी वडिलांना विचारायचो. त्यांनी मला खूप माहिती दिली. त्यांचं वाचन खूप होतं. इंग्रजी, मराठी, संस्कृत नाटकाची आवड होती. पण घर रूढार्थाने नाटकवाल्याचं नव्हतं. पण तेव्हा सगळ्याच बुद्धिजीवींना नाटकांची माहिती होती. खूप लहाणपणीच थिएटर ही कन्सेप्ट माझ्या लक्षात आली. आम्ही दामोदर हॉलला नाटकं बघायला जायचो. त्यात काही नानासाहेब फाटकांचे परफॉर्मन्स बघितल्याचं आठवतंय. मानापमानमधली धैर्यधराची बालगंधर्वाची पुरुष भूमिका मी बघितली होती. हे नाटकाचं वेड माझ्याकडे होतं. मी मागे लागून हे नाटकांचे प्रयोग बघितले होते.
शाळेत मी हुशार होतो. नाटकं पाहण्यात वेळ घालवायचा नाही, हा घरातला खाक्या होता. गणेशोत्सवांना जायचं नाही, अशी बंधनं होती. मी कॉलेजला फर्स्ट ईयरला गेलो तेव्हा पहिली एकांकिका लिहिली. ‘वेडी माणसं’ ही ती एकांकिका १९५५ साली लगेच आकाशवाणीवरही सादर झाली. तेव्हा भारतीय विद्याभवनच्या नाटय़ स्पर्धा व्हायच्या. एकांकिका मिळत नव्हत्या म्हणून नाटकांचेच प्रवेश स्पर्धेत केले जायचे. माझ्या एकांकिकांना तिथे स्थान मिळू लागलं. माझ्या एकांकिका मासिकातही छापून आल्या. त्यासाठी मी विशेष काही प्रयत्न केले असं नाही. तेंडुलकरांनी मागून घेतल्या आणि ‘वसुधा’मध्ये लगेच छापायला सुरुवात झाली. त्यावर काही चर्चा नाही. आक्षेप नाही. ‘सत्यकथे’तही छापून आल्या. त्यांची ख्याती मजकूर बदलून घेण्यासाठी असायची. मला तसा अनुभव नाही आला. त्यावर कुणी काही बोललेलंच नाही. लिहिणं आणि त्यातही नाटक लिहिणं सहजपणे झालं. नाटककार व्हावं, अशी माझी महत्त्वाकांक्षा नव्हती. माझ्याकडून सहज लिहून व्हायचं. पेंटिंग ही शिकण्यासारखी गोष्ट आहे, मात्र लिहिणं ही नैसर्गिक गोष्ट वाटायची. फार कुणाचा प्रभाव होता, असं नाही. नाटकाची पुस्तकं तरी वाचावीशी का वाटली, यालाही काही कारण दिसत नाही.

तुम्ही आत्मचरित्र लिहिण्याचा विचार का नाही करत ?
उ- ‘रंगप्रयोग’मध्ये हा आत्मचरित्रासारखा भाग येईल. पण तो तुकडय़ातुकडय़ात. असं क्रोनोलॉजिकली लिहिण्याऐवजी मुलांची नाटकं, प्रायोगिक, व्यावसायिक अशा अनुषंगाने लिहीन. शिवाय हे मी समांतर पातळीवर केलं. तेव्हा मी बँकेत नोकरीही करत होतो. घरही सांभाळत होतो आणि संस्थाही काढली होती. संस्था काढण्याचा उद्देश एवढाच की, ‘लोककथा ७८’ किंवा ‘आरण्यक’ ही नाटकं नाहीतर कुठल्या प्रोडय़ुसरने केली असती? ती आम्हीच केली.

लिखाणासाठी तुमची विशिष्ट जागा किंवा सवयीचं असं ठिकाण आहे का ?
उ- माझी घरातली आतली खोली हीच माझी जागा आहे. मी ब-याचदा झोपून लिहितो. पण मी लिखाणासाठी ऑफिसप्रमाणे शिस्त लावून घेतली आहे. ऑफिसप्रमाणेच मला सुट्टी मिळत नाही. इतक्या सा-या वर्षामध्ये मुद्दाम विश्रांतीसाठी वेळ काढला नाही. लेखकाची शिस्त पाळली. वेळेचा पूर्ण विनियोग केला. बाहेर फारसा गेलो नाही. प्रत्यक्ष नाटकाला जाणं ब-याच वेळेला टाळतो. मी मुळात इंट्रोव्हर्ट आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणं सहसा टाळतो. त्याचं दुसरंही एक कारण आहे. एखादं नाटक पाहिल्यावर त्याविषयी विचार करणं होतं. नाटक अगदी बेकार असलं तरी ते इतकं का बेकार झालं, याचाही दोन-दोन दिवस विचार करणं होतं. ते व्यर्थ नसतं. म्हणून मी नाटकाला जाणं टाळतो.

लेखकालाही रियाझ करावा लागतो, असं म्हणतात. तुम्ही तुमचा रियाझ कसा करता ?
उ- मुळात विचार असतो. माझ्या बाबतीत पहिल्यापासून मला खूप सुचतं. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून. मला पॅरॅलल वर्ल्ड दिसायचं. सेट, अ‍ॅक्शन ते संवादासकट ते लिहून काढल्याशिवाय गत्यंतरच नसायचं. मी त्यावेळी बारावी-तेरावीत असताना आऊट ऑफ इनर कम्पल्शन लिहायचो. स्पर्धामधून त्या एकांकिका केल्या जायच्या. धो धो सुचायचं आणि सुचण्यामध्ये खूप व्हरायटी असायची. कंटाळा येऊ नये म्हणून मग वेगवेगळ्या पद्धतीने लिहायचो. बेसिकली मला लिहिण्याचा कंटाळा. संवाद सरळ लिहायचा वेगळा प्रयत्न ‘लाल गुलाबाचं बेट’च्या वेळी केला. असं मला अजून सुचतं. इतकं की भीती वाटते. तो एखादा आजार असल्यासारखं वाटतं. त्यामुळे बाकीच्या सगळय़ा गोष्टी मला वंचित आहेत. ‘अश्वमेध’ला पारितोषिक मिळालं आणि समारंभ होता तेव्हा मला ‘खोल खोल पाणी’ सुचत होतं. त्यामुळे समारंभात बक्षीस घ्यायला गेलो नाही. तिकडे जाण्यापेक्षा हे जे डोक्यात येतंय ते पुरं केलं पाहिजे, ही भावना मनात होती.
सुचल्यानंतर ते जागच्या जागी लावणं, हाही शिस्तीचा भाग. मुलांचं नाटक लिहीत होतो त्याच वेळी ‘आरण्यक’ सुचलं. मग मुलांचं नाटक बाजूला ठेवून ते लिहिलं. पण असं क्वचित. वर्षानुर्वष विचार डोक्यात असायचे. कधी ना कधी लिहिलं नाही तर आपल्या डोक्यातून जाईल, अशी भीती वाटायची. त्यामुळे इतर काही गोष्टींमधे वेळ घालवायचा नाही, हे डोक्यात पक्क होतं. मुलांचं नाटक आणि गूढकथा या इतक्या स्पेशलाइज्ड गोष्टी आहेत की, त्यावेळी इतर काही करणं शक्य नसतं. मुलांसाठी नाटक लिहिण्यासाठी त्यावेळी मोठय़ांचा विचार बाजूला ठेवला. गूढकथांच्या बाबतीत त्या डोक्यात असताना बाकी रिअ‍ॅलिस्टिक वाचायचं नाही, हे पथ्य पाळायचो. अगदी इनक्लुडिंग न्यूजपेपर. त्यामुळे डोक्यातून कथा जायला नको. त्रयस्थपणं, इन्व्हॉल्व्हमेंट ठेवून जितकं सुचतं तितकं लिहिण्यासाठी ही शिस्त आवश्यक असते.

तुम्ही लिहिताना लेखनिक किंवा संगणकासारखी आधुनिक साधनं वापरली नाहीत ?
उ- मी हातानेच लिहितो. इतक्या वर्षाची सवय आहे. शिवाय मी त्यात कम्फर्टेबल आहे. माझी फार खाडाखोड होत नाही. पूर्ण विचार केल्यानंतर लिहायला सुरुवात करतो. लिहून झाल्यावर बारीक काही करेक्शन असेल तर तिथे पानावरच करतो. पूर्वी अंकांना पाठवताना झेरॉक्सची सोय नव्हती. लोक कार्बन पेपर ठेवायला सांगायचे. पण तोही मला अडथळा वाटायचा. आताही कम्प्युटरवर लिहायला गेलो तर त्याचे नियम मला पाळावे लागतील. मी लेखनिकही कधी घेतला नाही. लिखाण आणि आपल्यात अडथळा नकोसा वाटायचा. सरळ दुसरी कॉपी लिहून पाठवतो. पहिली माझ्याकडे ठेवतो.

शंभर पुस्तकं लिहिल्यानंतर तुमचा चाहतावर्ग मोठा असेल. चाहत्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देता ? मगाशी तुम्ही म्हणालात तसं सोबतच्या लोकांचं श्रेय मान्य करण्यासाठी किंवा वाचकांच्या प्रेमाच्या ऋणातून उतराई होण्याची संधी तुम्ही कधी साधली आहे का ?
उ- मी इंट्रोव्हर्ट आहे. त्यामुळे माझं सार्वजनिक पातळीवर वावरणं कमी आहे. पण चाहते संपर्क करतात. अमेरिकेत जाऊन आलो तेव्हा तिथेही खूप चाहते भेटले. तुमची नाटकं पाहत वाढलो किंवा गूढकथा वाचत मोठे झालो, असं भेटल्यावर सांगणारे मोठय़ा संख्येने आहेत. माझ्या लेखनावर चांगलं-वाईट काहीच व्यक्त झालं नाही. ते लेखकासाठी आवश्यक असतं. मला क्रिटिसिझम किंवा मार्गदर्शन याबद्दल कधीच कुणी सांगितलं नाही. क्रिटिसिझमही करायला हवं. एका परीने हे नुकसानच झालं. माधव मनोहर माझे सासरे, पण त्यांनीही मला कधी सांगितलं नाही. कुठल्याही माणसाच्या जडणघडणी मागे काही लोक असतातच. लेखकाच्या मागेही संपादक, प्रकाशक असतातच. त्यांनी छापलं नसतं तर लेखक म्हणून माझी इमेज घडत गेली नसती. चांगल्या चित्रकारांनी चित्रं काढली. नाटकाचंही तसंच असतं. चांगला प्रोडय़ुसर आणि चांगले नट मिळणं भाग्याची गोष्ट असते. माझी ४० टक्के तरी नाटकं अप्रकाशित आहेत. कित्येक नाटकांची अजून पुस्तके झाली नाहीत. या शंभर पुस्तकांपैकी ब-याचशा पुस्तकांच्या मागे प्लॅनिंग आणि ते प्रकाशकाच्या गळी उतरण्याचे कष्ट, हेही होतंच.

मुलाखत : रत्नाकर मतकरी
स्त्रोत : प्रहार वृत्तपत्र

Comments

More in भूमिका