भूमिका

संवेदनशीलतेशिवाय माणूसपण अशक्यच – प्रज्ञा माने

संवेदनशीलतेशिवाय माणूसपण अशक्यच – प्रज्ञा माने
मुलाखतकार

“हा कवडसा आपल्याला तिमिरातून तेजाकडे नेणारा आहे असं मी म्हणेन. आजूबाजूला कितीही काळोख असला तरी ह्या कवडस्यामुळे एक आशेचा किरण आपल्याला मिळेल. हा कवडसा काळोखातील,अंधा-या खोलीतील लोकांना बाहेरचं प्रकाशमय जग दाखवेलंच पण त्याचबरोबर ती अंधारी खोलीदेखील प्रकाशमय करेल. “

ही मुलाखत आहे मानसशास्त्रज्ञ लेखिका प्रज्ञा दिलीप दिपाली माने यांची. 12 डिसेंबर 2015 रोजी होणा-या त्यांच्या ‘कवडसा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून त्या संदर्भात त्यांच्याशी केलेल्या ह्या खास गप्पा फक्त मुलाखत. कॉमच्या वाचकांसाठी. एक मानसशास्त्रज्ञ नि एक सर्व सामान्य व्यक्ती म्हणून आपल्याला रोज येणारे अनुभव टिपून ते लेखांच्या रूपाने त्या वेगवेगळ्या साप्ताहिकांच्या- मासिकांच्या रूपाने वाचकांसमोेर मांडत होत्याच. वाचकांचा प्रतिसाद ही दांडगा होता. आता तर खास वाचकांसाठी त्यांच्या काही निवडक लेखांचा संग्रह ‘कवडसा’ या पुस्तकांच्या रूपाने प्रकाशित होत आहे. त्यामुळे एक मानसशास्त्रज्ञ लेखिकेच्या नजरेतून कवडसा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया प्रज्ञा माने यांच्या मुलाखतीतून…

‘कवडसा’ बद्दल काय सांगाल ?
उ- कवडसा हे पुस्तक म्हणजे माझ्या काही निवडक लेखांचा संग्रह आहे. जे माझ्या अनुभवावर आधारित लेख आहेत. ज्यांचा बेस मानसशास्त्रीय आहे. यामध्ये माझ्या काही केसेसही आहेत. त्यापैकी काही सक्सेस स्टोरीज आहेत आणि काही इतर अनुभव. आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात ज्यांचा आपल्यावरही काही अंशी परिणाम होत असतो. तसेच मी पाहिलेल्या काही घटना ज्यात मला काहीतरी वेगळेपण आढळलं, काही शिकायला मिळालं, कुठल्यातरी कारणामुळे एखादी घटना लक्षात राहिलीये अशा घटनांविषयी मी लिहिलंय. मी हाताळत असलेल्या पेशंट्सचे विषय, त्यापैकी काही जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत, ते विषय मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात एकूण 33 लेख आहेत. यातील काही लेख हे यापूर्वी काही ठिकाणी छापूनही आले आहेत आणि काही नवे लेखही आहेत.

कवडसा प्रकाशित करण्याची संकल्पना कशी सुचली नि ती सुचल्यापासून आता ते प्रकाशित होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?
उ-  माझ्या डोक्यात तर असं काही आलं नव्हतं. माझा एक लेख आहे, ‘युद्धस्य कथा रम्या’ जो माझ्या एका मैत्रिणीवर आधारित आहे. तो माझ्या प्रकाशक मित्राने वाचला होता. तो वाचून तो मला म्हणाला कि, तू तुझ्या लेखांचं पुस्तक का नाही करत. जर एखादा प्रकाशकच हे सुचवत असेल तर मला काही हरकतच नव्हती. मग मात्र हा प्रकाशनाचा विषय निघाल्यावर त्या लेखांकडे मी डोळसपणे पाहिलं. काही लेख नव्याने सुचले. काही जुन्या लेखांची भाषा सायकोलॉजीकल होती, त्यात नंतर बदल केले. काही अनुभव मनात होते, त्यासाठी डायरी चाळली नि नव्याने लेख लिहिले.

पुस्तक प्रकाशनासंदर्भात आलेल्या अनुभवांविषयी काय सांगाल?
उ- खरंतर ब-याच नवोदित लेखक-लेखिकांना त्यांच्या लिखाणाचे प्रकाशन करताना सर्व साधारण ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं, तशा कुठल्याच अडचणी मला आल्या नाहीत. प्रकाशकाने स्वतःहूनच ही संधी उपलब्ध करून दिली. आजवर माझा जो ठराविक वाचकवर्ग होता त्याही पलीकडे जाऊन आता अधिकांपर्यंत माझं हे लिखाण पोहचणार आहे. लोकांना ह्या पुस्तकाविषयी आता ब-यापैकी कळतंय. यामुळे लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे नि हेच मी आता अनुभवतीये. आजवर जे मला केवळ एक सतत हसणारी नि खेळकर प्रज्ञा म्हणून ओळखत होते त्या माझ्या स्नेहींसाठी तर हे पुस्तक म्हणजे सुखद धक्काच आहे. पण यामुळे माझी जबाबदारी देखील तितकीच वाढली आहे, पण प्रेशर नाहीये. मला पुस्तकांचा खप होणार कि नाही याचं अजिबात टेंशन नाहीये. कारण मला नेहमी हलकं-फुलकं राहायला आवडतं. त्यांमुळे या पुस्तकातून मी किती नफा मिळवेन हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीये. I’m happy with whatever i have written माझी ती गरज आहे. आणि त्यासाठी समोरून प्रकाशनाची संधी मिळत असेल तर त्याचा आनदं आहेच.

कवडसा हे या पुस्तकाचं नाव देण्यामागील कारण काय ?
उ- या पुस्तकातील सर्व लेखांचा विचार केला तर यातील काही लेख हे सकारात्मक तर काही नकारात्मक आहेत. हे लेख म्हणजे माझ्या विचारप्रक्रियेतील भाग आहेत, असं मी म्हणेन. मला या नावातून हेच सांगायचं आहे की नकारात्मकतेतून सकारात्मक विचार शोधणं किती गरजेचं आहे. ज्यामुळे आपण संवेदनशील व्हायला मदत होईल. आज आपण आजूबाजूला घडणा-या घटना पाहाल तर त्यापैकी अनेक घटना या नकारात्क असतात. सकाळी न्यूज पेपर घेतला तर त्यातही दलितांवरील अत्याचार, आंतरजातीय विवाहामुळे तरूण जोडप्याची हत्या, शेतक-यांच्या आत्महत्या, स्त्रियांवरील अत्याचार अशा निगेटिव्ह बातम्याच वाचायला मिळतील. त्यामुळे यातून काहीतरी सकारात्मक बाब आपण शोधायला हवी असं मला वाटतं. मी एका अनाथाश्रमातदेखील काम करते. तसेच मानसशास्त्रज्ञ म्हणून दिवसभर खूप वेगवेगळ्या पेशंट्स माझ्या संपर्कात येतात. या सर्व गोष्टी खूप निगेटिव्ह आहेत. त्यामुळे स्वतःसाठी मला सकारात्मक अशा गोष्टींची खूप गरज असते. त्यासाठी मी स्वतःसाठीच ‘100 days challenge’ ठेवलंय. ज्यात मी रोज न चुकता दिवसभरच्या घटनांमधून काय शिकले, त्या घटनांमध्ये सकारात्मक बाब काय होती, हे सर्व रोज लिहिते.
मला असं वाटतं की हे केल्याने आपण स्थिर होतो. त्यामुळे आजूबाजूला घडणा-य़ा घटनांचा आपल्यावर चुकीचा परिणाम होत नाही तर याउलट त्या नकारात्मक घटनेतही आपल्याला सकारात्मक बाब मिळते. जे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे.
त्यामुळे हा कवडसा आपल्याला तिमिरातून तेजाकडे नेणारा आहे असं मी म्हणेन. आजूबाजूला कितीही काळोख असला तरी ह्या कवडस्यामुळे एक आशेचा किरण आपल्याला मिळेल. हा कवडसा काळोखातील,अंधा-या खोलीतील लोकांना बाहेरचं प्रकाशमय जग दाखवेलंच पण त्याचबरोबर ती अंधारी खोलीदेखील प्रकाशमय करेल.

मानसशास्त्रज्ञ असूनही तुम्ही लिखाणाकडे वळलात, याचं खास कारण काय ?
उ- माझ्या मते हे एकमेव शास्त्र आहे जिथे 90 टक्क्यांच्या आसपास लिहिणारे आढळतील. मी आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंट्सना भेटत असतो. ज्यांचा आमच्यावरही खूप परिणाम होतो. ह्याचा काही वेळेस त्रासही होतो. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटतं. त्यासाठी मी हे लिखाणाचं माध्यम निवडलं. दिवसभराचे चांगले-वाईट अनुभव स्वतःला मोकळं करण्यासाठी कुठेतरी मांडणं खूप गरजेचं असतं. हे लिखाण म्हणजे ओकणं असतं, सगळं मनातलं काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा नव्याने नव्या दिवसासाठी उभं राहायचं. या लिखाणात ब-याच गोष्टी नेगिटिव्ह असतात. मी जे स्वतःसाठी ‘100 टेस्ट चॅलेंज’  ठेवलंय त्याचा मला यात नक्कीच खूप फायदा होतो. तसं पाहता मला लहानपणापासूनच लिहायची सवय आहे.

तुमचं वाचन कशाप्रकारचं आहे ?
उ- माझं वाचन फारसं फॅन्टसीकडे झुकणारं नाही म्हणून मला ऑटोबायोग्राफी वाचायला फार आवडतात. माझा ओढा माणसांना समजण्याकडे फार असतो, त्यामुळेच मला आत्मचरित्र वाचायला फार आवडतात.

तुमचं सध्या काय लिखाण चालू आहे ?
उ- माझं सध्या ड्रीम सायकॉलॉजीवर लिखाण सुरू आहे. आपल्याला जी स्वप्न पडतात त्यामागील कारणं काय असतात , आपल्याला स्वप्नात ज्या काही विशिष्ट घटना दिसतात त्यांचं कारण काय अशा अनेक शंकाचं निरसन करण्यासाठीचं हे लिखाण आहे. परदेशात यावर बरंच लिहिलं जातं आहे. संशोधन होत आहे. पण आपल्याकडे त्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे माझ्याचं क्षेत्रातील एका विषयाशी निगडित हे लिखाण चालू आहे. त्याचबरोबर एका कादंबरीचा विषय देखील डोक्यात आहे. लवकरच त्यावर देखील लिखाण सुरू करेन.

तुम्ही मानसशास्त्रज्ञ म्हणून समाजाकडे कसे पाहता ? या जातीच्या आणि धर्माच्या गर्तेत अडकलेल्या समाजालादेखील या मानसोपचाराची गरज आहे का ?
उ- हो नक्कीच आहे. दलितांवरचे- स्त्रियांवरचे अत्याचार, भारतातील दादरी प्रकरण, पॅरिसमधील हल्ले हे एक प्रकारचं वाढतं अॅग्रेशन आहे. ते नसावं असं मी म्हणणार नाही. पण त्याचं विकृतीकरण होता कामा नये असं माझं वैयक्तीक मत आहे. कारण तेच समाजाला मारक ठरणार आहे. याला मी ऍन्टी सोशल डिसऑर्डर म्हणेन, ज्याला मानसोपचाराची खरंच गरज आहे. दिवसेंदिवस संवेदनशील माणसांची संख्या कमी होताना दिसते. त्यांना आता आव्हान देण्याची वेळ आली आहे. खरं तर या बदलासाठी अजुन एक-दोन पिढ्या जाव्या लागतील. कारण आत्ताचा समाज अनेक गटांमध्ये विभागला गेला आहे. कुणी हिंदू म्हणून, कुणी मुसलमान म्हणून, कुणी स्त्री तर कुणी पुरूष म्ङणून जगतोय. त्यामुळे माणूस म्हणून आपण खूप कमी जगतोय. आणि जो पर्यंत आपण संवेदनशील होणार नाही तोपर्यंत आपण माणूस म्हणून ख-या अर्थाने जगू शकणार नाही.

तुम्ही स्त्रीवादी आहात का ?
उ- होय, नक्कीच आहे. प्रत्येकाने असायलाच हवं असं मला वाटतं. कारण ती सध्या काळाची गरज आहे. निसर्गाने जे आपल्याला बहाल केलंय त्याचा आपण आदर करायला हवा असं मला वाटतं. मी स्त्रीवादी नक्की आहे, पण म्हणून मी पुरूषांना नाकारत नाही. मला समता पटते.

तुमच्या कॉलेजमध्ये म्हणेजच रूपारेल मध्ये तु्मच्याच ज्युनियर्स कडून तुमची १० डिसेंबरला खास मुलाखत होत आहे, काय फिलींग्स आहेत ?
उ- माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर कोणता काळ असेल तर तो म्हणजे रूपारेल मधील माझी ५ वर्ष.  तेव्हा मी ही काही दिग्गजांच्या मुलाखती केल्या असतील, कधी प्रेक्षक म्हणून तेथे असेल पण आज exactly on the opposite site मी असणार आहे. हेच खूप वेगळं आहे माझ्यासाठी. त्याचा मोठा इम्पॅक्ट माझ्या मनावर पडणार आहे. म्हणजे ज्या वास्तूने मी काहीच नसताना मी कशी घडले हे पाहीलं. त्या वास्तूत माझी मुलाखत होत आहे हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे.  माझे सायकॉन मागे ठेवून रूपारेल मधून तिथले सायकॉन घेऊन मी पुढे गेले. त्यामुळे खूपच भावनिक झालीये. ते दिवस पुन्हा आठवले. feeling so emostional…

kavdasa

मुलाखत :   प्रज्ञा माने
मुलाखतकार :  सुजाता शिरसाठ 

Comments

More in भूमिका