भूमिका

माझं नातं सांस्कृतिक संघर्षात आतड्याने गुंतलेल्या सगळ्याच लेखक-लेखिकांशी – प्रज्ञा पवार

माझं नातं सांस्कृतिक संघर्षात आतड्याने गुंतलेल्या सगळ्याच लेखक-लेखिकांशी – प्रज्ञा पवार
मुलाखतकार

‘प्रज्ञा दया पवार’ भारतीय साहित्य क्षेत्रातील एक आदराचं पान. फारच कमी साहित्यिक असे आहेत जे व्यवस्थेने आखून दिलेल्या चौकटी मोडून आपल्यासमोर नवीन चौकटी मांडण्याचा प्रयत्न करत असतात. प्रज्ञा पवार हे नाव त्यापैकीच एक. पुरूषप्रधान संस्कृतीत जगत असताना जेथे स्त्रीला माणूस म्हणूनच नाकारण्यात आलंय अशा या बुरसटलेल्या समाजात अपारंपरिक लेखन करून स्त्रीची दुसरी बाजू मांडू पाहणारी ही एक धाडसी, निर्भिड लेखिका. स्त्री-पुरूष संबंधामधून व्यक्त होणारी स्त्रीची व्यथा, तिचं गुदमरत जगणं, तिचं स्वतःशीच चाललेलं मानसिक नि शारीरिक पातळीवरील युदध् हे त्यांच्या कथांमध्ये, कवितांमध्ये आपल्याला प्रकर्षाने आढळून येतं. आपली भूमिका ठामपणे मांडणा-या या लेखिकेने भारतात सध्या घडणा-या असहिष्णु घटनांच्या विरोधात निषेध म्हणून शासनाचे पुरस्कार, मानधन शासनाला परत केलं. त्यानंतर प्रतिगाम्यांकडून त्यांच्यावर चहूबाजूंनी टिकेची झोड उठवण्यात आली. पण तरीही नेहमीप्रमाणे आपली भूमिका त्यांनी सर्वांसमोर स्पष्ट करत आपला निषेध कायम ठेवला. याच संदर्भात त्यांच्या एकूण लेखन प्रवासाचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडणारी ही विशेष मुलाखत खास मुलाखत.कॉमच्या वाचकांसाठी…

“माझ्या लेखनात स्त्रीचं एकसत्त्वीकरण मी कटाक्षानं टाळलं आहे आणि पुरूषाच्याही अपरिमित परी असतातच. कदाचित म्हणूनच वेगळा विचार करणारे आजचे तरूण-तरूणी माझ्या लेखनाशी लगेच रिलेट होत असावेत. मग तो ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ सारखा कथासंग्रह असो की ‘धादांत खैरलांजी’ सारखं नाटक.” – प्रज्ञा पवार

दया पवारांमुळे तुमचा लिखाणाशी संबंध आला, त्यामुळे तुमच्यावर कोणाचा अधिक प्रभाव होता, दया पवारांचाच की आणखी  कोणाचा ?
उ-
दया पवारांसारख्या कार्यकर्त्या-लेखकाच्या आणि हिरा पवारांसारख्या अतिशय खमक्या आणि शिस्तप्रिय आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला. हा एक जैविक योगायोगाचा भाग खरा पण काही योगायोग आपल्या आयुष्याचा सुकाणू एका विशिष्ट दिशेने वळवत नेत असतात हेही खरंच आहे. मी लेखक झाले त्याला माझं घरातलं वातावरण नक्कीच कारणीभूत ठरलं. 10313381_10201948446455036_3981288705368625353_nकिंबहुना मी तर म्हणेन की, माझ्या लेखनाची भूमी लहानपणाच्या काळातच नांगरली गेली. खूप समृध्द काळ जगले मी. वस्तुत: जगण्यात भौतिक अभाव चिक्कार होते, स्थावर-जंगम मालमत्तेचा भरभक्कम असा वारसा नाहीये माझ्याजवळ, पण चळवळीचा, वैचारिकतेचा, अभ्यासाचा, शिस्तीचा आणि हो, निर्भीडपणाचाही. ही मात्र माझ्या घराची विरासत आहे. माझ्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी जी केंद्रं आहेत, त्यात अग्रक्रमाने नाव घ्यायचं तर माझे वडील दया पवार यांचा उल्लेख आधी करावा लागेल. त्यांचा स्वभाव, जगण्याची त्यांची शैली, प्रांजळपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ठायी असलेली एम्पथी. त्यांच्या या वैशिष्ट्यांचा माझ्यावर अमिट असा ठसा उमटला आहे. दुसरे म्हणजे, माझे नामदेवकाका- माझ्या आयुष्यातली सर्वाधिक प्रभावशाली व्यक्ती म्हणता येईल ते नामदेव ढसाळ आणि तिसरी म्हणजे चळवळ. फुले-आंबेडकरी, विशेषत: दलित पॅंथरची चळवळ, त्या अनुषंगाने आणि एकूणच झालेलं चौफेर वाचन, शिवाय जागतिक सिनेमा-नाटक-संगीत यांनीही माझ्या जाणिवा ब-यापैकी प्रशस्त केल्या आणि एकारलेल्या होण्यापासून बचावल्या. माझ्या उण्यापु-या ४९ वर्षांच्या आजवरच्या आयुष्यात खूप थोर थोर माणसं मी पुस्तकांच्या बरोबरीनेच जवळून पाहिली आहेत, अनुभवली आहेत. तीही मला ज्ञानाची जिवंत केंद्रेच वाटतात.

तुमच्या लेखनात स्त्री- पुरूष संबंधांवरील भाष्य हे कायम केंद्रस्थानी असतं…
उ- मला वाटतं माझ्या सर्व लेखनात राजकीयतेचं सूत्रच प्रधान आहे. स्त्री-पुरूष संबंध हे त्याचं एक प्रतिरूप म्हणून ठळकपणेँ लेखनात उपस्थित असतं. मुळात राजकारण हेच सर्वव्यापी आहे. ते खाजगी आणि सार्वजनिक अवकाशात तर आहेच. शिवाय खाजगी आणि सार्वजनिक अशी पाचर प्रस्थापित वर्चस्ववादी राजकारणाने मारली आहे त्याचीच ती एक परिणिती आहे. मग हे राजकारण काय आहे ? त्याचे आंतरिक फोर्सेस कोणते आहेत ? ते कुठकुठवर पोहचलेलं आहे ? जातवास्तव, वर्गवास्तव, लिंगभेदजन्य वास्तव, नवभांडवली अर्थव्यवस्थेचा विक्राळपणा आणि जोडीला जागतिकीकरणोत्तर बदललेले आयाम हे सगळं माझ्या लेखनाच्या मुळाशी आहे, असं मला वाटतं. शिवाय मार्केट न् मीडिया नावाची एक मोठी वस्तुस्थिती आहेच. या सगळ्या गुंतागुंतीत माणसाचं, त्यातही वंचित समूहातल्या माणसांचं, विशेषतः स्त्रियांचं नेमकं काय होत असतं जगताना ते मांडण्याचा, पकडण्याचा प्रयत्न लेखनात असतो. उदाहरणार्थ, ‘अंतःस्थ’ या माझ्या पहिल्या कवितासंग्रहापासून ते अलीकडच्या ‘दृश्यांच्या ढोबळ समुद्र’पर्यंत एक प्रवास दिसतो आणि नक्कीच तो एकरेषीय नाही.

स्त्री असं जरी आपण म्हटलं, तरी ती कोणती स्त्री, इथपासून बदलतं सगळं. कारण माझ्या लेखनात स्त्रीचं एकसत्त्वीकरण मी कटाक्षानं टाळलं आहे आणि पुरूषाच्याही अपरिमित परी असतातच. कदाचित म्हणूनच वेगळा विचार करणारे आजचे तरूण-तरूणी माझ्या लेखनाशी लगेच रिलेट होत असावेत. मग तो ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ सारखा कथासंग्रह असो की ‘धादांत खैरलांजी’ सारखं नाटक. मुळात मला कंठाळी लेखन आवडत नाही आणि लिहिता तर त्याहूनही येत नाही. कितीही प्रयत्न केला ठरवून लिहायचं तरी मी घोषवाक्यांनी भरलेले रकाने नाही लिहू शकत. साधं स्त्री-पुरूष नातं घ्या, त्यातही किती किती नं काय काय असतं, आणि ते फक्त स्त्री-पुरुष नातं असं म्हणून चालत नाही तर हे नातं ज्या व्यवस्थात्मक घडणीत घडत गेलेलं असतं, एका ऐतिहासिक विकासक्रमाच्या टप्प्यातून, तर माझ्या कथेतल्या निवेदकाला त्याचं भान सोडता येत नाही आणि ते स्वाभाविकही आहे. कारण मी बाबुराव बागूल, दया पवार, नामदेव ढसाळ यांच्यानंतरच्या काळात लिहिणारी लेखिका आहे. तेव्हा ते सगळं पचवून जर मी उभी असेन तर ढोबळ सांकेतिकतेच्या कितीतरी पाय-या फोडूनच मला आत घुसावं लागेल. मुळात कुठल्याही माणसांचं जगणं ही काही सोप्पी गोष्ट नाहीचेय. सोप्पं तर काहीच नसतं. माझ्या जगण्यातूनही मी हे शिकले आहे. थपडा खात खात आणि ब-यापैकी अपमान गिळून, बरीच मोठी किंमत माझ्या लिहिण्यातली धग आणि उर्मी जिवंत ठेवण्यासाठी मी चुकवली आहे. कधी कधी तर असंही झालेलं आहे की, माझी कविता माझ्या जगण्याच्याही पुढे जाऊन उभी राहिली आहे न् मला वाकुल्या दाखवत म्हणते आहे, अब क्या करोगी, मै तो निकल पडी !

शारीरतेचा मुद्दा जरी घेतला तरी माझं एक निरीक्षण असं आहे की, शरीराकडे निव्वळ शरीर म्हणून पाहिलंच जात नाही आपल्याकडे. शरीर कायमच नैतिकतेच्या, परंपरेच्या, सामाजिकतेच्या बेड्यात अडकलेलं असतं. वस्तुतः माणूस आणि त्याचं अवघं अस्तित्व, शरीर हे अत्यंत सर्जक आणि अंगभूतपणे समतादायी असतं आणि म्हणूनच भांडवलशाही, पुरूषशाही, ब्राम्हणशाही या सर्व व्यवस्था मानवी शरीराला यंत्रवत गुलाम बनवण्यात अग्रेसर असतात. आणि भारतासारख्या देशात जेव्हा या तीनही व्यवस्था एकत्रितपणे नांदत असतात तेव्हा शारीरतेचं, लैंगिकतेचं, मानवी नातेसंबंधांचं पूर्णपणे विकृतीकरण होतं. ज्या गोष्टीत प्रस्थापित व्यवस्थेला मुळातून धक्का लावण्याचं सामर्थ्य असतं तिचं सैतानीकरण करणं ही नेहमीचीच बाब असते. मानवी शरीरात अशा सर्व व्यवस्थांचं उल्लंघन करण्याची अंगभूत क्षमता असते, किंबहुना ही क्षमता ज्ञात असल्यानेच शरीराला (त्यातही बाईच्या शरीराला) अधिकाधिक बद्ध  केलं गेलं आहे. शरीराचा प्रमाथी जिवंतपणा हा कोणत्याही विषमतावादी व्यवस्थेला न पेलवणारीच बाब असते. माझ्या अनेक कथांमधून या संरचना आढळतात, ज्याला चारदोन तथाकथित आंबेडकरवाद्यांनी अनैतिक, अश्लील वगैरे ठरवत माझं चारित्र्यहनन करत बदनामीची पद्धतशीर मोहीम राबविली पण ती अयशस्वी ठरली.

धादांत खैरलांजी या नाटकाच्या अनुभवाविषयी काय सांगाल ?
उ-
खैरलांजी हत्याकांडाने एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती सगळ्याच आंबेडकरी समाजात. खोलवर दुखावले गेले होते सगळेच या नृशंस जातीय हत्याकांडामुळे. प्रियांका, रोशन, सुधीर, सुरेखा यांना ज्या भयावह रीतीने संपवलं गेलं त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या मार्गावरून चालतानाही दलितांच्या वाट्याला पुन्हा पुन्हा ही शोकांतिका का यावी, असा एक मुदलातलाच प्रश्न उभा राहिला. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच कुणाच्याही नेतृत्वाशिवाय अख्खा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला. यामध्ये नोकरदार वर्गाचादेखील समावेश होता. मी स्वतः त्या काळात घडणा-या अनेक घटनाप्रसंगांची मूक साक्षीदार नव्हते तर सक्रिय होते. त्याच दरम्यान एक दीर्घ कविताही लिहिली गेली माझ्या हातून,  ‘लव्ह इन द टाईम ऑफ खैरलांजी’ या शीर्षकाची. वानगीदाखल त्यातल्या काही ओळी सांगते,

आत्ता कुठे गळून पडू लागली होती,155748_1472474814115_183608_n
अभावाची खपली.
आत्ता कुठे उलगडू लागलं होतं,
अंधाराचं प्राचीन कोडं.

आत्ता कुठे येऊ लागला होता,
शांततेला
शांत आवाज.

वाटलं होतं
भूतकाळानेही आता टाकलीये गड्या
जीर्ण शीर्ण कात,
नि हा जुना हुंदका
कितीतरी युगांचा
गिळून टाकला आम्ही
विषाचा प्याला समजून.

…तरी पडतच राहिलं
भ्रमनिरासाचं भयंकर स्वप्न

पुन्हा कितव्यांदा तरी.
दिवसाढवळ्या,
रात्री-अपरात्री,
कुठल्याही हंगामात,
कुठल्याही ऋतूत.

कॅलेंडर फडफडत राहिलं-
फक्त
मागे- पुढे- पुढे- मागे

मराठीतले ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त यांना खैरलांजीवर एक मराठी चित्रपट करायचा होता. त्यांनी मला त्या सिंनेमाची पटकथा आणि संवाद लिहिण्याची ऑफर दिली. त्यानिमित्ताने आमच्या काही भेटी झाल्या. नंतर काही कारणांमुळे म्हणा वा माझ्या अन्य कामांच्या अग्रक्रमामुळे म्हणा, मी त्यांना नम्रपणे नकार कळवला. पण ते बीज मनात राहिलंच. अशा अनेक संदर्भातून हे नाटक लिहिलं गेलं.

अर्थात मला खैरलांजीत जे घडलं ते जसंच्या तसं नाटकात दाखवायचं नव्हतंच. खैरलांजी काही ‘दूर कुठेतरी’, ‘गावखेड्यात’, एका पोकळीत घडत नव्हतं. हा एकूणच भारतीय समाजाच्या घटनात्मक मूल्यांची अवहेलना करणारा व्यवस्थात्मक पेचप्रसंग होता. याचबरोबर मी आंबेडकरी चळवळीचा लेखाजोखाही त्यातून मांडू पाहत होते, आंबेडकरी समाजाअंतर्गत स्तरीकरणाची प्रक्रियाही कुठेतरी डोक्यात होती. हे सगळंच मला एकवटून मांडायचं होतं. ते मी माझ्या पध्दतीने केलंही. नाटकाची अनेक ठिकाणी वाचनं झाली. पृथ्वी थिएटर तसेच विद्यापीठातील कार्यक्रमांमध्ये नाट्यवाचन व चर्चाही झडल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद- कर्जत (जि.रायगड) शाखेच्या वतीने हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी झालं.

कुणीतरी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणेल याची वाट पाहण्यात मधली तब्बल पाचसहा वर्ष गेली. ब-याच दिग्दर्शक-निर्मात्यांना मी या संदर्भात भेटलेही. पण खैरलांजीमध्ये आता कुणालाच फारसा रस राहिला नव्हता. मग मीच ठरवलं आपणच निर्माते होऊयात. ‘लोकायत क्रिएशन्स’ या आमच्या संस्थेद्वारे ते आम्ही रंगभूमीवर आणलं. व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक आणणं म्हणजे माझं एक धाडसंच म्हणता येईल. कारण मला त्याचा कुठलाही अनुभव नव्हता, त्यातल्या कसल्याही खाचाखोचा माहीत नव्हत्या. पण शिकले मात्र या नाटकातून बक्कळ. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये- मुंबई, ठाणे, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र, प्रयोग झाले त्याचे. नाटक संपल्यावर प्रेक्षकांशी थेट बोलता आलं कारण प्रयोग संपल्यावर हमखास अनेक प्रश्न यायचे त्यांच्यातून. एकूणच हा अनुभव मला खूप शिकवून आणि समृध्द करून गेला. मुळात नाटक ही एक सामूहिक गोष्ट आहे आणि त्यातलं यश-अपयश हेही सामूहिक असतं. मला पूर्ण माहीत होतं की, हे नाटक काही धो धो चालणारं नाही. पण तरी आर्थिक झळ सोसून एक राजकीय निकड म्हणून मी हे नाटक केलं.
आजवरच्या लिखाण प्रवासातील एखादा अविस्मरणीय क्षण कोणता आणि तुमच्या लिखाणातील तुमच्या सर्वात जवळचं लिखाण कोणतं नि का ?
उ-
लेखनात एखादा साहित्यप्रकार अधिक जवळचा न् एखादा दूरचा असं काही मला वाटत नाही. मी हाताळलेले सर्वच साहित्यप्रकार मला तितकेच जवळचे वाटतात. प्रत्येक साहित्यप्रकाराच्या ताकदीच्या जागा ओळखाव्या लागतात, मर्मस्थानं अभ्यासावी लागतात, पुरेसा वेळ द्यावा लागतो. रियाज तर लागतोच. पण मला कविता, सदर लेखन, नाटक, कथा, समीक्षा सगळंच लिहिताना आनंद वाटलेला आहे आणि आव्हानही. कदाचित कविता दीर्घ काळ लिहित असल्याने ती जवळची वाटते असं म्हणता येईल. पण कविता लिहिणं मला सर्वाधिक अवघड बाब वाटते, कारण ती तुम्हाला खूप शोषून घेत असते. माझा एकही कवितासंग्रह प्रसिद्ध झाला नव्हता तेव्हाची आठवण आहे ही. मी शिकत होते आणि थोडं फार लिहितही होते. माझ्या कविता ‘अनुष्टुभ’, ‘अस्मितादर्श’, आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकातून नुकत्याच छापून येऊ लागल्या होत्या. दुर्गा भागवत यांनी माझी ‘तृष्णा’ नावाची कविता वाचून मला एक पत्र लिहिलं होतं. तो माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण म्हणता येईल. ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ हा कथासंग्रह मी मराठीतील एक अत्यंत सशक्त कथाकार कमल देसाई व ‘आयदान’कार उर्मिला पवार यांना अर्पण केला आहे. कथासंग्रह वाचून कमलताईंनी फोन केला होता, आणि माझं प्रचंड कौतुक करून त्या म्हणाल्या होत्या, मला माझ्या पद्धतीने तुझे लाड करायचेत. तर तुला काय काय आवडतं खायला ते सांग. ते मी स्वतःच्या हाताने रांधून तुला जेवू घालणार आहे. ऐकताना माझे डोळे भरून आले होते. अर्थात हे झालं नाहीच. त्या गेल्याच दरम्यानच्या काळात. मनात कायमचीच ही एक रूखरूख मात्र राहिली आहे.

कुठल्या लेखिका वा लेखकाचं लिखाण फार जवळचं वाटतं ?
उ- मी मघाशी म्हणाले तसं, मला माझ्या घरातून सामाजिक शोषणाची जशी जाणीव झाली तशीच त्या शोषणाला भिडता येतं, त्यातही लेखणीनं भिडता येतं हेही जाणवलं. घरात पुस्तकांच्याच असलेल्या भिंती! गजानन माधव मुक्तिबोध, राजकमल चौधरी, अज्ञेय, इस्मत चुगताई, हरिशंकर परसाई, मंटो, विनोदकुमार शुक्ल, कमलेश्वर, महाश्वेता देवी, धूमिल, कुर्रतुल ऐन हैदर, प्रेमचंद, श्रीकांत वर्मा, विष्णू खरे, साहिर लुधियानवी, जॉं निसार अख्तर, फैज, पाश, अमृता प्रीतम, सुकांत भट्टाचार्य, मायकोव्हस्की, बर्टोल्ट ब्रेख्त, हो चि मिन्ह, ऑक्टोव्हियो पाझ, पाब्लो नेरूदा यांनी माझ्या जाणिवांना व्यापकत्व दिलं आहे.

मी ज्या मराठी काव्यपरंपरेत लिहिते त्याच्याशी माझं निश्चितच नातं आहे असं मी मानते. मराठी साहित्याशी होड घेऊ पाहणा-या दलित साहित्याने, दलित कवितेच्या सशक्त प्रवाहाने व्यक्तीलक्ष्यी, समूहलक्ष्यी, सौंदर्यलक्ष्यी या विभाजनाला मुळातूनच काही प्रश्न विचारले ते मला महत्त्वाचे वाटले. विचारप्रधानता आणि भावसंपृक्तता यांचा एकात्म संयोग, ‘मी’ हा नेहमी ‘आम्ही’मध्ये विलीन होणं, सामूहिकतेचं भक्कम अधिष्ठान, नवी सामाजिक- सांस्कृतिक अन्वेषणदृष्टी, विचारप्रणालीशी असलेलं अभिन्नत्त्व आणि मानव्य, समता यावर आधारित नातेसंबंधांचं स्वप्न पाहणं आणि त्याचा आग्रह धरणं अशा कितीतरी सुंदर गोष्टी मला दलित कवितेनेच दिल्या. अतिशय ग्लोरीयस असा हा भूतकाळ आहे. दलित साहित्याच्या परंपरेचं वर्णन समाजशास्त्रीयदृष्टया विवेचक, राजकीयदृष्टया स्फोटक आणि सौंदर्यशास्त्रीयदृष्टया रोचक अशा शब्दात केलं गेलं. दलित आत्मकथन, विशेषतः त्यातील स्त्रियांची आत्मकथनं ही मला विशेष महत्त्वाची वाटतात, कारण त्यातून बेबी कांबळे, शांताबाई कांबळे यांच्यापासून ते उर्मिला पवार, हिरा पवार यांनी आम्हीही इतिहास घडवला ही  दलित स्त्रीवादी जाणीव अधोरेखित केली. माझ्याही कवितेला स्त्रीवादी, दलित स्त्रीवादी, दलित बहुजन स्त्रीवादी अशी अनेक बिरूदे लागलेली आहेत आणि ती मला अजिबात त्रासदायक वाटत नाहीत.

डावीकडून प्रा. पुष्पा भावे, मंगला गोडबोले, प्रज्ञा पवार, विद्या बाळ, गौरी साळवी, गौरी देशपांडे आणि नीरजा - हैदराबाद येथे झालेल्या एका चर्चासत्रात... (१९९७)

डावीकडून प्रा. पुष्पा भावे, मंगला गोडबोले, प्रज्ञा पवार, विद्या बाळ, गौरी साळवी, गौरी देशपांडे आणि नीरजा – हैदराबाद येथे झालेल्या एका चर्चासत्रात… (१९९७)

ज्या काळात दलित कविता अवतरली त्याच्या काही काळ आधीपासूनच बा. सी. मर्ढेकर, पु. शि. रेगे आणि शरच्चंद्र मुक्तिबोध या तीन मुख्य कवींच्या छायेत तत्कालीन मराठी कविता लिहिली जात होती. –हासशील रोमॅंटिक कवितेचे संकेत मोडून मर्ढेकरांनी मराठी कविता ख-या अर्थाने आधुनिक केली. मुक्तिबोधदेखील आधीच्या रोमॅंटिक परंपरेला शह देऊन सामाजिक बांधिलकीची राजकीय कविता लिहू पाहात होते. तर पु. शि. रेगे यांनी रोमॅंटिक कवितेच्या परंपरेचे सशक्तपणे पुनरूज्जीवन केलेले दिसते. विंदा करंदीकर आणि विशेषतः नारायण सुर्व्यांच्या मार्क्सवादी धारणेने हा आधुनिकतेचा प्रवाह अधिकच बळकट झाला आणि याच आधुनिकतावादी भूमिकेतून मला अरूण कोलटकर, दि. पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके, तुळशी परब, प्रकाश जाधव, सतीश काळसेकर, मनोहर ओक, चंद्रकांत पाटील, अरूणचंद्र गवळी महत्त्वाचे वाटतात. तर स्त्री कवयित्रींमध्ये संत कवयित्री जनाबाई, सोयराबाई ते पुढच्या काळात बहिणाबाई चौधरी आणि ज्यांनी ख-या अर्थाने स्त्री-जाणिवेची  कविता आधुनिकतेला नेऊन भिडवली त्या प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, रजनी परूळेकर, हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार आणि मलिका अमर शेख यांची कविता मला जवळची वाटते. एका अर्थाने माझं नातं सांस्कृतिक संघर्षात आतड्याने गुंतलेल्या सगळ्याच लेखक-लेखिकांशी आहे. ते सगळेच मला माझे सख्खे नातेवाईक वाटतात आणि बळ पुरवतात.

तरूण लेखिका वा लेखकाच्या लिखाणाविषयी काय सांगाल ?
उ- मी ब-याच जणांचं आवर्जुन वाचत असते. कुणा एका लेखक-लेखिकेचं नाव मी घेत बसत नाही, पण अलीकडे लिहिणारे बव्हंशी तरूण लेखक, कवी, कवयित्री मला प्रॉमिसिंग वाटतात. ते अतिशय गंभीर आहेत, सजग आणि सतर्क आहेत. सामाजिकतेचं, एकूण व्यवस्थेबद्दलचं त्यांचं आकलन चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्याजवळ एक अंतर्मुखता आहे. पण या अंतर्मुखतेला बर्हिमुख सोशल मीडियाची इन्स्टंट जोड असल्याने ही अभिव्यक्ती बव्हंशी पृष्ठस्तरावरची राहते. हा धोका त्यांनी ओळखला पाहिजे.

सध्या कोणतं नवीन लिखाण चालू आहे?
मी माझ्या थिसिसच्या कामात गेली दोन-तीन वर्ष व्यग्र होते. त्यांमुळे लेखनाचे सगळे प्रकल्प बाजूला ठेवले होते या काळात. पण आता बरंच काही डोक्यात आहे. बघूया कसं काय उतरेल. आता तरी मलाच माहीत नाही माझ्या या प्रवासाविषयी. पण माझं एक पुस्तक येऊ घातलं आहे. अक्षर प्रकाशनाकडून. मी मध्यंतरी काही ठिकाणी सदरलेखन करत होते. त्याचं पुस्तक येतंय ‘टेहलटिकोरी’ या नावाने. हे पुस्तक यायला माझ्याकडून विलंब झालाय खरा, पण येईल लवकर. माझ्या सर्व वाचकांना ते नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो.  

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खुन सनातन्यांनी पचवलेच आहेत.  लेखिका म्हणून सध्याच्या सामाजिक परिस्थिती बद्दल काय वक्तव्य कराल ?  पुरस्कार परत करण्यामागील तुमची नेमकी भूमिका काय आहे ?
उ-  एका अघोषित अशा आणीबाणीच्या पर्वातून आपण सध्या जात आहोत. १९७५ मधल्या आणीबाणीपेक्षाही सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. याचं कारण तेव्हा जनसामान्यांवर फक्त शासनाचीच करडी नजर होती. आता मात्र शासनासहित अगदी आपण जिथे राहतो, वावरतो, नोकरी-व्यवसाय करतो तिथपर्यंत आपल्यावर लक्ष ठेवणारे सत्ताधा-यांचे पक्षसेवक दिसतात. शिक्षण, विज्ञान, कला,-साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात अपरिमित अशी दंडेलशाही सुरू आहे. अतिशय बीभत्स, ओंगळवाणं असं आजचं सार्वजनिक चर्चाविश्व झालेलं आहे.

दादरीमध्ये घडलेली मोहम्मद अखलाकची जमावाने केलेली क्रूर हत्या, गुजरातमधील मुस्लिम युवकांना गरबा-बंदी, महाराष्ट्रात सातत्याने होणा-या दलितांच्या अमानुष हत्या, लव्हजिहाद, घरवापसीच्या मोहिमा सुरू आहेत. विवेकाच्या आवाजाला प्रत्युत्तर देता येत नसेल तर विवेकी व्यक्तींना दिवसाढवळ्या गोळ्या घालून संपवण्यापर्यंत परिस्थिती बिघडलेली आहे. भालचंद्र नेमाडे यांना पोलीस संरक्षण पुरवलं गेलं आहे. काल परवा गिरीश कार्नाड यांना जिवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या, कोणताही वेगळा विचार खपवून घेतला जाणार नाही, हे स्पष्ट करणा-या आहेत. मुद्दा केवळ लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्यांच्या जीविताच्या सन्मानपूर्ण रक्षणाचा नाही. तो तर आहेच, पण मी ज्या महाराष्ट्रात- भारतात राहते तिथली सर्वसामान्य माणसंही जीव मुठीत धरून कसंबसं जगत आहेत. जमातवादाचं विष जाणीवपूर्वक देशभर पसरवलं जात आहे.

काय खावं, प्यावं, कसं जगावं, प्रेम कुणावर करावं, कुणावर करू नये, कोणता वेष परिधान करावा, व्यक्त कसं व्हावं इथपासून भयाचं एक अनामिक सावट घेऊन जगणारी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत. लेखक-कलावंतांच्या मूलभूत अधिकाराचा मुद्दा अधोरेखित करत असताना आपल्याला हे विसरून चालणार नाही की, सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या अधिकारावरच शासनव्यवस्थेकडून घाला घातला जात आहे.

आजच्या स्थितीची मुळं १९९२ च्या बाबरी मशिदी उद्ध्वस्तीकरणामध्ये आहेत. अडवाणींच्या रथयात्रेने देशाची धार्मिक आधारावर फाळणी केली होती. आता जेव्हा त्यांना पूर्ण सत्ता मिळालेली आहे, तेव्हाही सत्ताधीशांकडे देश चालवण्यासाठी आवश्यक असणारा विवेक दिसत नाही. सत्तारचनेच्या वरिष्ठ स्थानावर असणारे लोक अत्यंत बेतालपणे समाजविघातक वक्तव्ये करत आहेत. तर अन्य हिंदुत्ववादी संघटना-विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र समिती, सनातन संस्था, त्यांच्याही पुढे जात प्रत्यक्ष हिंसक कृती करत आहेत, कायदे धाब्यावर बसवत आहेत. त्यांची मनगटशाही सुरू आहे. आमचे आदेश पाळले नाहीत, तर तुम्हाला ताबडतोब शिक्षा करण्याचा आम्हाला हक्क आहे, कारण सरकार आमच्या विचारांचे आहे, असा त्यांचा पवित्रा आहे. यामुळे समांतर शासकीय यंत्रणा निर्माण होतात, आणि शासन बघ्याची भूमिका स्वीकारते. नेहमीप्रमाणे, कृती करणारे बहुजन आणि त्यांचा रिमोट मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या हातात अशी स्थिती आहे. अर्थात, अशा घटकांची मदत घेऊनच सरकार सत्तास्थानी आलंय हे उघड आहे. भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच घाव घालण्याचा हा जो चौफेर प्रयत्न आज सुरू आहे, त्याचा निषेध म्हणून मी मला मिळालेले सर्व शासकीय पुरस्कार, पुरस्काराच्या रक्कमेसह परत करण्याचा निर्णय घेतला.  

पुरस्कार परत केल्यानंतर जाणवलेला बदल? यावर आलेल्या प्रतिक्रिया कशा स्वरूपाच्या होत्या? यापुढे या आंदोलनाची दिशा काय असेल ?
उ- मी पुरस्कार परत केला आणि लगोलग अनेक मराठी लेखकांनी आपले पुरस्कार परत केले. या घडीला त्यांची संख्या खूपच जास्त आहे. आम्ही एकत्रितपणे मंत्रालयात जाऊन पुरस्कार परत दिले. याचा अर्थ स्पष्ट आहे, प्रत्येकाच्याच मनात विद्यमान परिस्थितीविषयीची अस्वस्थता, रोष खदखदत होता. कुणीतरी सुरूवात करून देण्याची गरज होती. खरं तर मी स्वतःही महाराष्ट्रातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांकडून पुरस्कारवापसीची घोषणा होण्याची वाट पाहात होते. पुरस्कारवापसी जरी नाही तरी किमान देशभर चाललेल्या या मोहिमेची बाजू तरी मराठी साहित्यविश्वातून लढवली जाईल असं मला वाटलं होतं. पण तसं तर काहीच घडत नव्हतं. पुरस्कार परत दिल्यापासून आम्ही प्रचंड टीकेचे, टिंगलटवाळीचे धनी झालेलो आहोत. आम्ही कॉंग्रेसी, फुर्रोगामी, सिक्युलर असल्याचे बोलले जात आहे.

अनेक जण म्हणतात, तुम्ही परिस्थितीचे अतिरंजित वर्णन करता आहात. कॉंग्रेस शासनाच्या काळात असहिष्णु गोष्टी घडल्या नाहीत का ? पण आज ज्या रितीने राज्यघटनेतील मुल्यव्यवस्थेववर चौफेर हल्ला सुरू आहे तसा पूर्वी नव्हता. काय लिहायचं, खाजगी अवकाशात काय करायचं, काय नाही याबाबत काही हस्तक्षेप नव्हता. पेरूमल मुरूगन यांची साहित्यिक आत्महत्या, कॅलिकतमधील ज्येष्ठ लेखक आणि रामायणाचे अभ्यासक एम. एम. बशीर यांनी रामायणासंबंधी लिखाण न करण्याचा निर्णय घेणं, गोहत्या बंदी कायद्यावर टीका करणा-या चेतना थिर्थहल्ली या कन्नड लेखिकेला तुझ्यावर बलात्कार करू अशी धमकी देणं यासारख्या घटनांमुळे लेखकांवरची दडपणं प्रचंड वाढताना आपण पाहतो आहोत. हिंदू धर्माची चिकित्सा होऊ दिली जाणार नाही, आम्ही म्हणू तोच धर्म अशी आक्रमक भूमिका घेतली जात आहे. कर्नाटकमधल्याच हुचंगीप्रसाद नावाच्या एका दलित लेखकाने जातिव्यवस्थेविरोधी लिखाण केल्याने हिंदू धर्माचा अवमान होतो, म्हणून त्याला पळवून नेऊन मारहाण तर केली गेलीच, शिवाय जर पुन्हा असं केलंस तर तुझी बोटचं छाटून शासन करू असं त्याला धमकावलं गेलं आहे. अशा वेळी स्पष्टपणे भूमिका घेऊन या दहशतवादाला विरोध करणं ही लेखक म्हणून माझी जबाबदारी आहे, असं मी मानते.

ज्या लेखकांनी पुरस्कार परत दिले त्यांच्यावर शासनाच्या वतीने टीकेचा भडीमार झाला. ते अप्रामाणिक आहेत, ते काँग्रेसी आहेत, शासकीय निवासस्थानात राहात आहेत, वगैरे वगैरे. माझं हे जाहीर आव्हान आहे की, माझं कुठलंही लिखाण काढून पाहा… त्यात जर कॉंग्रेस पक्षाची भलामण असेल तर दाखवा. आमच्यावर सुरू असलेला हा हल्ला हेच दर्शवतो की, पुरस्कार परत करण्याचा आमचा निर्णय त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. आमच्याविषयी नको ते मुद्दे उपस्थित करून ते मुख्य मुद्दयांवरून लक्ष हटवू पाहात आहेत. सामान्य माणसाला सतत दहशतीत ठेवू पाहाल, तर एक न एक दिवस तो तुम्हाला सत्तेतून बाहेर फेकून देऊ शकतो हे विसरता कामा नये. जनतेने हा धडा इंदिरा गांधींना शिकवला होता आणि आता बिहारच्या जनतेने नरेंद्र मोदींनाही शिकवला आहे. मी तर सामान्य माणसांचीच प्रतिनिधी आहे आणि मी मुळीच निराशावादी नाही. म्हणूनच भारताच्या लोकशाहीवरचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी सर्वांनीच एकत्र येऊन ताकद उभी करण्याची गरज आहे, असं मला वाटतं.

पुरस्कार परत करणं ही एक छोटीशी सुरूवात आहे. यानंतर लेखक-कलावंतांनी सामूहिकपणे आवाज उठवण्याची गरज आहे आणि याची सुरूवात झाली आहे. गुजरात, गोवा व महाराष्ट्रातील पुरस्कार परत करणा-या तसेच पुरस्कारवापसीचे समर्थन करणा-या लेखकांनी ‘दक्षिणायन’ या नावाने एक उपक्रम आयोजित केला आहे. लेखकांचा हा  जथ्था पुणे, कोल्हापूर ते धारवाड या तीन शहरांमध्ये जाहीर कार्यक्रम घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. लेखक हा तसा काही फार शक्तिमान गट नव्हे. आपल्या सुरक्षिततेसाठी भाडोत्री संरक्षक ठेवणं हे तसंही त्याला/तिला परवडणारं नाही, त्याहूनही मानवणारं तर खचितच नाही. त्याच्या/तिच्या हातातली लेखणी आणि वाणी हेच त्यांचं व्यक्त होण्याचं साधन आहे. या सर्व साधनांनिशी लढण्याचा संकल्प करणं ही काळाची गरज आहे.  

मुलाखत : प्रज्ञा दया पवार
मुलाखतकार : सुजाता शिरसाठ

Comments

More in भूमिका