भूमिका

माझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर

माझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर
मुलाखतकार

“ही चळवळ ईष्ट आहे, योग्य आहे, रास्त आहे, ती य़शस्वी व्हायला पाहिजे. तर निदान तीन भुमिका तरी घेण्याची गरज आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या देशातल्या शिक्षण क्षेत्राने हा विचार पोहचवला पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या प्रसार माध्यमांनी याबद्दल आग्रही भुमिका घेतली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या राज्यकर्त्यांनी काही इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. तसं जर दाखवलं तर आजच्यापेक्षा अधिक परिणामकारकरित्या आम्ही लोकांपर्यंत पोहचू शकू.”- नरेंद्र दाभोळकर

प्रसिध्द मुलाखतकार राजू परूळेकर यांनी ईटीव्हीच्या संवाद या कार्यक्रमात अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र शाखेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकरांची घेतलेली ही विशेष मुलाखत. आज दाभोळकर जरी दृश्य स्वरूपात ह्यात नसले तरी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून त्यांचं अस्तित्त्व आहे. काय होता त्यांचा विचार, अंधश्रध्दा म्हणजे नेमकं काय, ते स्वतः देवाची काय व्याख्या करायचे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी ही एक विशेष मुलाखत. राजू परूळेकरांनी त्यांच्या अनोख्या अंदाजात या मुलाखतीला खास करत सर्वसामान्यांच्या नजरेतून बारीक-सारीक किचकट प्रश्नांचा उलगडा केलेला आहे, त्यावर दाभोळकरांनी दिलेली उत्तरे आणि सांगितलेले अनुभव हे फारच रंजक आहेत. त्यासाठी  हि मुलाखत नक्की पहा.  

राजू परूळेकर : नमस्कार आज संवाद कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत, श्री.नरेंद्र दाभोळकर.
नरेंद्र दाभोळकर : नमस्कार.
राजू परूळेकर : नरेंद्र दाभोळकर हे साधना मासिकाचे संपादक आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र शाखेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष आहेत. ते व्यसनमुक्तीचं काम सुध्दा साता-यात चालवतात. आणि समाजवादी आणि इतर सामाजिक चळवळींशी त्यांचा घनिष्ट संबंध आहे. आज आपण त्यांना इथे मुख्यत्वेकरून अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामाच्या निमित्ताने बोलावलं आहे. दाभोळकर साहेब मी तुम्हाला विचारू इच्छितो कि अंधश्रध्दा म्हणजे नेमकं काय ?
नरेंद्र दाभोळकर : अंधश्रध्दा म्हणजे ज्या गोष्टीला कुठलाही पुरावा नाही, त्याच्यावर ठेवलेला विश्वास. आणि त्याच्या प्रमाणात स्वतःच्या जीवनातील कृती निर्धारित करणे. इतकं सोप्प आहे ते. पुरावा तपासण्याची आपल्याला सवय नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपली जी गोष्ट आहे ती श्रध्दा आहे कि अंधश्रध्दा आहे ते समजत नाही.
राजू परूळेकर : पण आपण विश्वास ठेवतो त्यावेळी प्रत्येकवेळी आपण पुरावा लक्षात घेतोच असं नाही.
नरेंद्र दाभोळकर : विश्वासाला जर तुम्ही पुरावा गृहित धरला नाही, तर मग आपण असं म्हणू कि, त्याला विश्वास हा शब्द वापरणं बरोबर नाही. म्हणजे आपण असं करा कि, मी जर असं म्हटलं, कि माझ्या घड्याळावर माझी श्रध्दा आहे, कि ते मला अचूक वेळ दाखवेन, या वीजेच्या दिव्यावर माझी श्रध्दा आहे कि तो मला प्रकाश देईल, तर तुम्ही मला असं म्हणाल कि अहो हे वाक्य बरोबर नाही. तुमची कितीही विजेच्या दिव्यावर श्रध्दा असली आणि जर इथला हॉलचा विद्युत पुरवठा खंडित झाला, आणि जर इथे जनरेटरची सोय नसली, तर तो मला देणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी कार्यकारण भाव वादातीतपणे सिध्द झालेला असतो त्याला आपण विश्वास म्हणतो. आणि ज्या ठिकाणी कार्यकारण भाव वादातीतपणे मूर्खपणाचा असतो, त्याला आपण अंधश्रध्दा म्हणतो.
राजू परूळेकर : म्हणजे देवावरची माणसांची श्रध्दा आहे ती अंधश्रध्दा आहे का ?
नरेंद्र दाभोळकर : देवावरची माणसांची जी श्रध्दा आहे ती या देशातील घटनेने त्यांना दिलेल्या बिलिफ सिस्टिमचा भाग आहे. पण तो देव चमत्कार करतो हि निश्चितपणे अंधश्रध्दा आहे. तो देव नवसाला पावतो हि गोष्ट निश्चितपणे अंधश्रध्दा आहे. पण माझ्या मनाला एखाद्या गोष्टीमुळे आधार वाटत असेल तर तो मी घेणं ही जी उपासना पध्दती आहे हा या देशातल्या घटनेने त्याला धर्मस्वातंत्र्य दिलेला भाग आहे.
राजू परूळेकर : पण आपण घटनेचं बाजूला ठेवू. तुम्ही नरेंद्र दाभोळकर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून देवावरची श्रध्दा हि अंधश्रध्दा मानता कि श्रध्दा मानता.
नरेंद्र दाभोळकर : हा प्रश्न तर मला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सतत विचारला जातो. आणि मी त्यांना असा नेहमी प्रतिप्रश्न विचारतो जो मी आता तुम्हालाही विचारतो कि, लोक असं म्हणतात कि देव मानता कि नाही एका शब्दात बोला. होय तरी म्हणा किंवा नाही तरी म्हणा. मी त्यांना असं म्हणतो कि या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही याचं कारण मला ते देता येत नाही असं नाही. याचं कारण असं कि हा प्रश्न अपुरा आहे कारण त्याच्यामध्ये देवं या शब्दाची व्याख्या केली गेलेली नाही. तुम्ही मला देव म्हणजे तुमची व्याख्या सांगा कि मी लगेच उत्तर देतो. तुम्ही जर असं म्हणालात कि माझा देव नवसाला पावतो आणि चमत्कार करतो तर मी असं म्हणेन कि ते मला अमान्य आहे. तुम्ही जर मला म्हणलात कि, माझा देव हा गाडगेबाबांच्या सारखा आहे आणि तो ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ असा आहे, तर मी असं म्हणेन कि त्याच्याशी माझं काही दुमत नाहीये.
राजू परूळेकर : पण मग मी तुमच्या ह्या मुद्द्याला धरून एक प्रश्न विचारू इच्छितो कि आता सध्या बाब-बुवांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात पेव फुटलेलं आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतातच ते पेव फुटलेले आहेत. त्यातले बरेच बाब-बुवा आपण काहीच चमत्कार करत नाही असं सांगून त्यांच्यावर विश्वास ठेवणा-या भक्तांच्या बाबतीत असं काहीतरी करतात कि त्या भक्तांना मात्र वाटतं कि हे बाबा काहीतरी चमत्कार करताहेत. आता तिथे प्रश्न असा आहे कि बाबाच सांगतात कि, मी चमत्कार करत नाही, माझा चमत्कारावर विश्वास नाही, चमत्कार खोटे आहेत, चमत्कार करणारे खोटे आहेत. भक्त लाखोंच्या संख्येने तिथे जातात आणि म्हणतात कि बाबा चमत्कार करतात पण बाबा नम्र आहेत, म्हणून ते म्हणतात कि ते चमत्कार करत नाही. मग हा पेच कसा सोडवणार ?
नरेंद्र दाभोळकर : एक आहे कि पेच आपल्याला दोन बाजूंनी सोडवता येतो. पहिली गोष्ट अशी कि जे चमत्कार करतात त्यांच्याबद्दल तर अगदी सोप्प आहे, कि जे चमत्कार करतात ते करतात कि करत नाही हे सरळपणे आपल्याला तपासता येतं, आणि जर तो बाबा असं म्हणत असेल कि, मी चमत्कार करत नाही तर भक्तांना असं म्हणण्याची अजिबातच गरज नाही कि तो चमत्कार करतो म्हणून. प्रश्न जो तुमचा भाग आहे ज्याच्यावर माझं आता पुस्तक येतंय बुवाबाजी म्हणून २००-२५० पानांचं. जे बाबा स्वतः असं म्हणतात कि मी चमत्कार करत नाही, आणि त्यांचे भक्तही असं म्हणतात कि बाबा चमत्कार करत नाहीत तरी फार मोठ्यासंख्येने तुम्ही म्हणालात तसं लोक त्यांच्याकडे जातात. हे लोक त्यांच्याकडे का जातात असं जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते असं म्हणतील कि, आम्हाला आनंद वाटतो. त्यांना तुम्ही विचारलं कि तुम्हाला कसला आनंद वाटतो, ते असं म्हणतील कि आम्हाला समाधान वाटतं. त्यांना तुम्ही असं विचारलं कि समाधान म्हणजे काय ते असं म्हणतील कि, याच्यामुळे आमचं अध्यात्मिक कल्याण होतं. मग जर तुम्ही असं विचारलत कि त्या बाबांकडे जाऊन तुमचं अध्यात्मिक कल्याण होतं याचा पुरावा काय, तर मग ते पुढे हसून उलट प्रश्न आपल्यालाच असा विचारतात कि याचा पुरावा मागायचा नसतो. तुम्ही पुरावा मागता कि आई-वडिलांवर तुमची श्रध्दा असते त्याचा पुरावा मागता, गुरूनी तुम्हाला शिकवलं त्याचा पुरावा मागता, आईस्टाईन सापेक्षतेचा सिध्दांत तुम्हाला कळलाय का त्याचा पुरावा मागता. बुवाबाजीच्या प्रक्रियेमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे, कि पुरावा मागायचा नाही आणि माझं कल्याण आहे असं मंडळी त्यामध्ये गृहीत धरत असतात. आणि याठिकाणी एका मानसिक गुलामगिरीची सुरूवात होते. जो अंधश्रध्देमधला सगळ्यात घातक भाग आहे.
राजू परूळेकर : पण भारतीय विशेषकरून हिंदू शास्त्राचा जो भाग आहे तो आहे भक्तियोग. त्याच्यामध्ये अशाप्रकारचं पुरावा न मागता श्रध्दा ठेवण्याला मोठं बळ दिलेलं आहे. तर ह्या भक्तियोगाच्या संकल्पनेला जर त्या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील इतर धर्मावर आपण येऊच. पण या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील तर त्याच्यावर तुम्ही काय उत्तर देता त्यांना ? 
नरेंद्र दाभोळकर : त्याच्यावरचं माझं उत्तर अगदी सोप्प आहे. कि भक्ती योगाला मानणारे लोक हे एखाद्या बाबाच्याकडे जातात. एका कॉलेजमध्ये भाषण देताना मला एक बाई असं म्हणाल्या कि सकाळी उठल्यानंतर मी अर्धा तास देवाच्या समोर हात जोडून बसते नि मला खूप बरं वाटतं तर याबद्दल तुमचं काही म्हणणं आहे का… मी म्हटलं याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मला सकाळी योगासनं केल्यावर बरं वाटतं तुम्हाला सकाळी फिरायला गेल्यावर बरं वाटतं आणखी कोणाला सकाळी गाणं म्हटल्यावर बरं वाटतं, तर तुम्हाला हात जोडल्यावर बरं वाटतं. हा एक भाग. पण जरी ह्या देशाच्या भक्तिपरंपरेमध्ये हे असेल तर मग या देशाच्या घटनेमध्ये जाणीवपूर्वक काय घातलंय तेही बघायला पाहिजे. या देशाच्या घटनेमध्ये जसे नागरिकांचे हक्क घातले, तसे आवर्जून घटना दुरूस्ती करून नागरिकांची कर्तव्य घातलीत. त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य असं आहे कि, ‘इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायिन्टिफिक टेम्परामेंट्स, स्पिरिट ऑफ इनक्वायरी अॅन्ड ह्युमनिझम’. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुध्दी, मानवतावाद याचा विचारप्रसार आणि अंगिकार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं घटनादत्त कर्तव्य आहे नंबर एक. नंबर दोन जे नवं शैक्षणिक धोरण जे १९८७ साली आलं, त्या शैक्षणिक धोरणातला महत्त्वाचा गाभा घटक वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती आहे. आत्ता महाराष्ट्रात युतीने जे मूल्यशिक्षण चालू केलं नि या सरकारने ठेवलंय त्या मूल्यशिक्षणातील महत्त्वाचं मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणजे या देशामध्ये एका बाजूला एक परंपरेने भक्तिभावाची कल्पना आहे आणि या देशामध्ये दुस-या बाजूला घटना-शैक्षणिक धोरण- मूल्यशिक्षण याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे. म्हणून तर आमची चळवळ गरजेची आहे आणि अवघड आहे. म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी घटना दिली या देशाला त्यावेळी असं म्हटले होते कि, ‘मी या देशाला घटना देतोय पण आजपासून हा देश एका अंतरविरोधात प्रवेश करतोय कि मी पुस्काच्या पानावर समता लिहिलीये, वास्तवात आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे’. जसं या देशाच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन लिहिलाय आणि या देशाच्या परंपरेमध्ये भक्तिभावाने पाया पडणं लिहिलंय.
राजू परूळेकर : ह्याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला विचारू इच्छितो कि असंही म्हणणारे लोक आहे नि मोठ्या प्रमाणावर उपासकआहेत कि विज्ञान हे सुध्दा सर्व गोष्टींचे पुरावे देत नाही अन तेही अपुरं आहे आणि ते ही अयशस्वी ठरतं ?
नरेंद्र दाभोळकर : तुम्ही जे म्हणालात कि नाही, कि विज्ञान सर्व गोष्टींचा पुरावा देत नाही, तर लक्षात घ्या याचं कारणंच असंय कि वैज्ञानिक दृष्टिकोन घटनेत मूल्य असूनही तुम्ही मला हा प्रश्न विचारताय. मला माफ करा पण तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे त्याचा मुलभूत आशय माहित नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूल्यात्मक आशय असा आहे कि, विज्ञानाचं एक महत्त्वाचं मूल्य नम्रता हे आहे. मला सगळं कळलेलं आहे, मला आता कळायंच काहीही शिल्लक राहिलेलं नाही, मला कसलाही प्रश्न विचारू नका, सर्व प्रश्नांची उत्तरं मला माहित आहेत, मी जी उत्तर देतो तेच तुम्ही माना, हा सतत सगळ्या धर्मांनी केलेला दावा आहे, विज्ञान असं म्हणतं आज मला एवढं कळलेलं आहे. ह्याच्यापेक्षा वेगळा पुरावा जर उद्या पुढे आला तर मी तो वेगळा पुरावा मानीन. विज्ञान कधीही अंतिम सत्याची भाषा करत नाही. विज्ञान सत्याच्या सातत्याची भाषा करतं. त्याच्यामुळे विज्ञान हे मूलतःचं चुकण्याच्या तयारीनं उभं आहे आणि चुकण्याच्या तयारीनं उभे असलेल्या विज्ञान्याने एका विशिष्ट पध्दतीनं डोळसपणाने जेवढी मानवजातीची ४०० वर्षात प्रगती केली तेवढी काय त्याच्या आधीच्या धर्माच्या ५००० वा १०,००० वर्षात केलेली नाही. त्यामुळे ही गोष्ट उघड आहे कि विज्ञान जीवनाची अधिक समर्थ आणि चांगली उत्तरं देऊ शकतं.
राजू परूळेकर : पण त्याच्यात तुम्ही गृहित म्हणून घटना हा आधार मानलात त्याच्यात मला एकच विचारायचंय कि घटनेने प्रत्येक माणसाला आपल्या घरात आपला धर्म फॉलो करण्याचा, त्याच्या मागून जाण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे.
नरेंद्र दाभोळकर : अगदी बरोबर आहे.
राजू परूळेकर : नेमका पेच असा आहे कि, जो घरात धार्मिक श्रध्दा मानणारा मनुष्य आहे, तो घराबाहेर पडल्यावर अचानक रॅडिकल किंवा तो विज्ञान निष्ठ आणि जी धर्मातील चुकीची मूल्य आहेत ती अमान्य करून फिरणारा असं होऊ शकत नाही. एकतर तो धार्मिक असेल किंवा पूर्णपणे विज्ञान निष्ठ असेल.
नरेंद्र दाभोळकर : नाही,नाही. म्हणून काय आहे कि माणूस पूर्णपणे धार्मिक असेल किंवा पूर्णपणे विज्ञान निष्ठ असेल असं म्हणणं म्हणजे माणसाच्या एकूण आपण असं म्हणू कि, माणसाचं म्हणून जे काही व्यक्तिमत्त्व आहे त्याची ही अपुरी समज आहे. माणूस या दोन्ही पध्दतीनं घडलेला असणार. आपल्या दृष्टीने प्रश्न काय आहे, कि असा जो धार्मिक माणूस आहे परंपरेने घडलेला तो कुठलाही असो, तो हिंदू असो वा मुसलमान असो. तुमच्या मते, ज्यावेळी तो बाहेर पडतो आपल्या घराच्या, त्यावेळेला तो तोच माणूस असतो, तो सगळं घेऊन बाहेर पडतो. आणि मग तुम्ही बाहेरच्या जीवनामध्ये त्याला काही वेगळं सांगता. तुम्ही जर घटना समितीमध्ये याच्या झालेल्या चर्चा वाचल्या तर याच्यामध्ये पार चांगलं उत्तर दिलेलं आहे. जे मी तुम्हाला अतिशय थोडक्या स्वरूपात सागंतो. तुम्हाला तुमचं उपासनेचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण तुमचं हे सगळं उपासनेचं स्वातंत्र्य खालील गोष्टींच्यासाठी मर्यादित केलं जाईल, सार्वजनिक नीतिमत्ता-सार्वजनिक आरोग्य-कायदा-सुव्यवस्था- राष्ट्रीय एकात्मता- इतर दिलेले लोकशाही अधिकार या गोष्टी आणि तुमचं धार्मिक स्वातंत्र्य याचा ज्यावेळेला टकराव येईल त्यावेळी तुमचं धार्मिक स्वातंत्र्य मर्यादित केलं जाईल. तुम्हाला नमाज पढण्याचा नि आर्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण तुम्ही जर रस्यावर नमाज किंवा महाआर्ती करायला लागलात आणि तुमचा धर्म तर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्यामध्ये आणलात तर मग तुमच्या धर्माच्या संकोच केला जाईल. कायदा-सुव्यवस्थेचं पालन केलं जाईल. इतकी स्वच्छ भूमिका या देशातल्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊन आपल्या देशाच्या चौकटीत सामावलेली आहे त्याचं पालन झालं तरी पुरेसं आहे.
राजू परूळेकर : धर्माबद्दल आणि घटनेबद्दल हे विविक्षित मुद्दे आहेत. ज्योतिषशास्त्राबद्दल तर घटनेने काही म्हटलेलं नाही. आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणारे मोठ्या नेत्यापासून, डॉक्टर, वैज्ञानिक वा विज्ञान हाच ज्यांचा शैक्षणिक जीवनाचा पाया आहे असेही लोकं आहेत. तर ज्योतिषशास्त्रालाही तुम्ही कडाडून विरोध केलेला आहे. आणि ज्योतिषशास्त्र हे मानवाची हानी करतं अशी तुमची मान्यता आहे, असं तुम्ही मानता ?
नरेंद्र दाभोळकर : अगदी बरोबर आहे.
राजू परूळेकर : मला असं वाटतं कि ज्योतिषाने जर माणसाला जगण्याची आशा मिळत असेल तर काय वाईट आहे ज्योतिषात. त्याच्यात बाबा नाही, बुवा नाही,कुणासमोर गुलामगिरी नाही, लाचारी नाही.
नरेंद्र दाभोळकर : नाही,नाही. पहिली गोष्ट अशीये बरं का कि भ्रमाच्या आधारे माणसाने स्वतःचं आयुष्य उभं करावं का इतका तो साधा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं कि ज्योतिषाने आशा दिली म्हणजे काय, कि एक लग्न ठरत होतं, माहित होतं कि नवरा मुलगा दारूडा आहे, माहित होतं कि त्याा जुगार खेळायचं व्यसन आहे, आणखी काही माहित होतं कि त्यांच्या घराला कर्ज आहे, पण ज्योतिष असे म्हणाले कि इतके उत्तम ग्रहयोग आहेत दोघांच्या कुंडलीमधले कि लग्न करा. आणि लग्न केलं आणि सगळा संसार फिस्कटला. तुम्ही निर्णय कशाच्या आधारे घेणार, तुम्ही भ्रमाच्या आधारे निर्णय घेणार कि वास्तवाच्या आधारे निर्णय घेणार. तेव्हा माणसाने जीवनामध्ये सातत्याने डोळसपणे वास्तवाच्या आधारे निर्णय घेतले पाहिजेत. तुम्ही ज्यावेळेला असं मानता कि मला बरं वाटतं म्हणून मी हे करतो. त्यावेळेला तुम्हाला बरं वाटतं म्हणून तुम्ही ते करता याचा अर्थ ते बरोबर आहे असं होत नाही, माणसाला आधार लागतो तो आधार तो घेतो. ते क्षम्य आहे पण ते योग्य नाही. म्हणून आम्ही नेहमी असं अंधश्रध्दा निर्मूलनामध्ये सांगतो कार्यकर्त्यांना, कि अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यामध्ये क्रोधापेक्षा करूणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची जास्त गरज आहे.
राजू परूळेकर : इथे मला एक विचारायचंय कि आता आपण जे ज्योतिषशास्त्र आणि बुवा नि बाबांबद्दल जे बोललो, आज समाजात बुवाबाबांचं प्रचंड पेव फुटलेलं आहे आणि सर्वत्र ते दिसतात, तर अशा प्रकारची माणसं ज्यांच्यावर हजारो-लाखो लोक श्रध्दा ठेवतात, त्यांच्या विरूध्द किंवा त्यांना खोटं पाडण्याकरता तुम्ही सरळ-सरळ सामना करता तेव्हा कशारितीने सामोरं जाता ?
नरेंद्र दाभोळकर : मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो. त्यापैकी एक उदाहरण असं कि माधू मोरे नावाचा सांगलीचा एक माणूस तो असं म्हणाला, कि मी भूत दाखवू शकतो, भूतं माझ्या आजूबाजूला असतात. आणि ती भूतं अमुक-अमुक या पध्दतीची दिसतात, त्यांचं डोकं असं मोठं असतं त्यांचे पाय उलटे असतात, वगैरै,वगैरे. आणि असं ठरलं आव्हान झालं, सगळं पेपरमध्ये आलं कि त्या खंजी-या मळ्यामध्ये माधू मोरे भूत दाखवणार आहे. मी साता-याहून त्यासाठी मुद्दामहून गेलो. आणि मी साधारणपणे काहीतरी ९-९.३० वाजता पोहचलो, तो कार्यक्रम ९ च्या दरम्यान होता. जयसिंगपूरपासनं मी त्या खंजि-या मळ्यापर्यंत गेलो, आणि मी तिथे गेलो तर मला धक्काच बसला, कि जवळ जवळ तिथे १०-१२ हजार माणसं आलेली होती. एवढी माणसं येतील याची आम्हाला कल्पनाच नव्हती, त्याला तर नव्हतीच त्याचं एक छप्पर होतं त्यात तो भीतीने थरथरत बसला होता. आणि त्याने आम्हाला बिनशर्त असं लिहून दिलं कि, माफ करा पण मी काय भूत वगैरे काही दाखवू शकत नाही. मी बाहेर आलो तो कागद घेऊन नि लोकांना म्हटलं कि, हे बघा आपला विजय झाला, माधू मोरेने लिहून दिलं कि आपण आता भूत दाखवू शकत नाही. लोक म्हणाले शहाणे आहात आम्ही हे ऐकायला नाही आलो, आम्ही भूत बघायला आलोय. आता पंचाईत झाली, आता काय करायचं काय. ते १०-१२ हजार लोक पार रत्नागिरीपासणं-कोल्हापूरपासनं आलेले. पोलिसांना बोलावलं, पोलिस त्यावेळी कुठल्यातरी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बंदोबस्ताला गेलेले. त्यातल्या एका माणसाला एक कार्यक्रम सुचला, कि आपली फसवणूक झालेली आहे म्हणून त्याने त्या माळरानावरचा एक दगड उचलला आणि भिर्ऱर्ऱर्ऱ करून त्या माधू मोरेच्या छप्परावर मारला. आता सगळ्यांना कार्यक्रमच मिळाला, माळरानावर पाहिजे तेवढे दगड होते नि २०००० रिकामे हात होते, धडाधडा धडाधडा त्या माधू मोरेचं सगळं कौलारू छप्पर तुटलं. आणि माधू मोरेचीच भूत होण्याची वेळ आली आणि त्याला वाचवणं ही आमची जबाबदारी झाली आणि आम्ही प्रॅकटिकली डोक्यावर बादल्या घेऊन उभे होतो, नि त्यावर टानटान् दगडं पडत होते. म्हणजे जर पोलिस एका अर्थी हिंदी सिनेमाप्रमाणेच उशीरा का होईना पण वेळेत आले आणि त्याच्या घरापर्यंत रस्ता नसताना जीप आणली आणि मधू मोरेला कसातरी त्या गाडीत घातला आणि हलवलं, नाहीतर त्या ठिकाणी काय झालं असतं माहीत नाही. म्हणजे भूत आहे कि नाही याचं आव्हान घेणं हा एक भाग आणि त्याच्याशी जोडलेल्या माणसांच्या ज्या इतक्या अशा असतात आपण ज्याला म्हणू कुठल्या ना कुठल्या भावना असतात हा दुसरा भाग असं खूप काही सतत वेगवेगळं की जे कितीही अनुभव मी सांगू शकेन.
राजू परूळेकर : पण असं कधी सोपिस्टिकेडेट बाबाशी कधी मुकाबला झाला आहे का ? 
नरेंद्र दाभोळकर : हा म्हणजे आता असे आहे कि, बरं का कि, सोपिस्टिकेडेट बाबा म्हणजे आपण ज्याला म्हणू निर्मला माता. निर्माला माता म्हणजे ही एक बुवाबाजी न म्हणता ही एक बाईबाजी आणि इंटरनॅशनल बाईबाजी ती बाई करते. कारण ती भारतात एक महिना असते नि ती म्हणते की जगात ५० देशात माझे भक्त आहेत. आणि ती अशी गौरवर्णिय भक्त घेऊन सगळीकडे फिरत असते. ती ज्यावेळेला पुण्याला आली, नंतर सातारला आली, ततर तिचं असं म्हणणं आहे कि प्रत्येकाच्या माकड हाडामध्ये कुंडलीनी असते. ती कुंडलिनी जागृत करता येते ती जागृत केल्यानंतर ती तुमच्या शटचक्रामधणं वर येते तुमच्या ब्रम्हरंद्रामधणं बाहेर जाते नि त्याच्यामुळे तुम्हाला सर्वज्ञान प्राप्त होतं. जी कुंडलिनी जागृत करायला आपल्या सर्व ऋषीमुनींना देखील वर्षानुवर्षे तप करावे लागलचे ती कुंडलिनी जागृती निर्मला माता १०मिनिटांत करते.
राजू परूळेकर : पण आहे का अशी कुंडलिनी ?
नरेंद्र दाभोळकर : अजिबात नाही. आम्ही निर्मला माताला आव्हान दिलं कि, तू हे जे म्हणतेस त्याविषयी आम्हाला काही शास्त्रीय पुरावा दाखव नाहीतर तू एक साध्या होकारात्मक सूचना वा संमोहनाद्वारे हे करतेस. हे झाल्यानंतर हे आम्ही पुण्याला सांगितलं सातारला निदर्शनं केली, गांडगापूरला निदर्शनं करायला गेलो. त्याच्यानंतर तिचे भक्त आमच्यावर तुटून पडले. त्यांनी आम्हाला मजबूत मारलं. पुन्हा आमच्यावरच खटले घातले. ते खटले आम्ही ८ वर्ष चालवले आणि कोर्टामधनं निर्दोष सुटलो. म्हणजे हे झालं सॉफिस्टिकेटेड कथित म्हणणा-या बुवाची कथा. जी व्यक्ती कुंडलिनी जागृतीच्याद्वारे अध्यात्मिक वागते त्यांनी निदान एवढं तरी आपल्याकडे बाळगायला पाहिजे की जी माणसं सनदशीर मार्गाने आपल्याला पुरावा मागतात त्यांच्यावर हल्ला करू नये.
राजू परूळेकर : पण आता मला एक सांगा दाभोळकरसाहेब कि इतका काळ आता तुम्ही हा अंधश्रध्दा निर्मूलनाचा लढा लढताहेत. काळ जसा गेला तसं आता आपण बघतोय म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्यानंतरचा ५०वर्षाचा काळ आपण धरू. कि आज सर्वसामान्य माणसाला असुरक्षित असल्यासारखं वाटंत आणि तो रोज नवीन बाबा-बुवाच्या शरण जातो, अशा झुंडीच्या झुंडी लोटणं घालत असतात. ह्या अशा प्रकराच्या घटना म्हणजे अशा उपक्रमाला दारूण अपयश आलं असा लावला तर तो चुकीचा वाटतो ?
नरेंद्र दाभोळकर : आपण दोन गोष्ट बघू. त्यापैकी पहिली गोष्ट सांगितली कि बुवाबाजीचा तुम्ही व्यापका असा परिपेक्ष मांडला. कि या सा-या कारणांनी असं असं घडतं. जी मला नेहमी पाडगावकरांची कविता आठवते कि तुम्ही जे बुवाबाजीविषयी म्हटलं ते अतिशय चपखलपणे त्यात म्हटलं आहे. दुस-या बाजूला ती मानसिकता का निर्माण होते हे ही म्हटलं आहे.
माणसे खपाट खंगलेली
आतून आतून भंगलेली
अदृश्य दहशतीने तंगलेली
आधार पाहिजे
प्रत्येकास येथे हवा कोणीतरी जबरी बुवा
जो काढेल सा-या उवा
मनातल्या चिंतेच्या
आधी म्हणे जयसाई
मगच अधिकारी लाच खाई
अजून पकडला गेला नाही
कृपा म्हणे बाबांची
आपण शोधायचे नाही
आपण भिडायचे नाही
आपण लढायचे नाही
आय़ुष्याला
कणा झिजून गेला फार
शिरजोरी पुढे सर्व लाचार
बुवा नाम जपाचा उच्चार
नशा देई
म्हणजे मी इथल्या परिस्थितीचा सामना करू शकत नाही, मग तो सामना करण्याऐवजी ती कुठली तरी नशा मी त्या बाबाच्या-बुवाच्या-तंत्राच्या-मंत्राच्या सहाय्याने मी स्विकारीन. आणि माझ्या जीवनातील प्रश्न भ्रामकपणे सुटले असं मानीन. अशा स्वरूपाची एक वस्तुस्थिती या देशात आहे. मला असं वाटत नाही, १२ वर्षा पू्र्वी अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीची जी स्थिती होती त्याच्यापेक्षा आता जरा बरीये, असं मी सांगेन पण तो तुमच्या प्रश्नाचा आता भाग नाही. मी तु्म्हाला असं सांगतोय कि जर ही चळवळ ईष्ट आहे, योग्य आहे, रास्त आहे, ती य़शस्वी व्हायला पाहिजे. तर निदान तीन भुमिका तरी घेण्याची गरज आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या देशातल्या शिक्षण क्षेत्राने हा विचार पोहचवला पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या प्रसार माध्यमांनी याबद्दल आग्रही भुमिका घेतली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या राज्यकर्त्यांनी काही इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. तसं जर दाखवलं तर आजच्यापेक्षा अधिक परिणामकारकरित्या आम्ही लोकांपर्यंत पोहचू शकू.
राजू परूळेकर : दाभोळकरसाहेब तुम्ही इथे आलात आणि हा आशावाद व्यक्त केलात त्याबद्दल ईटीव्हीच्या दर्शकांतर्फे मी तुमचे आभार मानतो.

पहिला भाग https://www.youtube.com/watch?v=PKn4MEYNFNg

दुसरा भाग https://www.youtube.com/watch?v=OvHw5bjip5E

मुलाखत : नरेंद्र दाभोळकर
मुलाखतकार : राजू परूळेकर
स्त्रोत : ईटीव्ही
शब्दांकन : सुजाता शिरसाठ

Comments

More in भूमिका