इतर मुलाखत

कॅमेऱ्याच्या लेन्स मधून कथा सांगणारा छायाचित्रकार

कॅमेऱ्याच्या लेन्स मधून कथा सांगणारा छायाचित्रकार
वैभव छाया

आजचं वातावरण पाहिलं तर सेल्फीमय झालेलं आढळून येतं.  उठसूठ फोटो काढले जातात. ज्यांना खरं तर काहीच सेन्स नसतो.केवळ लाईक मिळवण्यासाठी फोटो काढले जातात, ज्यात बरेच चांगले फोटोग्राफर भरकटतात.  त्यामूळे फोटो आणि फोटोग्राफरचा ग्राफ मांडणारी प्रसिध्द छायाचित्रकार इंद्रजीत खांबे यांची ही मुलाखत.

छायाचित्रणाची सुरवात कशी झाली ?
:-  मी  २००२ पासून थिएटर मध्ये ऍक्टिव्ह होतो ते अगदी २०१२ पर्यंत. २०१२ साली मी पहिल्यांदा सुधाकर ओलवे आणि संदेश भंडारे यांचे फोटो पाहिले आणि त्यात इतका बुडालो कि थिएटर सोडून फोटोग्राफी करण्याचं ठरवलं. तेव्हा पासून माझ्या फोटोग्राफीची सुरूवात झाली. यात एक गोष्ट मला  आवर्जून नमुद करावीशी वाटते ती म्हणजे मी कधीच फोटोग्राफी करीयर करण्याच्या दृष्टीकोनातून केलेली नाही तर  एक छंद म्हणून अभ्यासू वृत्तीने जोपासली आहे.

छायाचित्रण हेच माध्यम का निवडलं ?
:-    हे माध्यम तसं पाहता इतर माध्यमांपेक्षा खूप  flexible आहे. याचा विशेष त्रास होत नाही. आपण केव्हाही- कुठेही- सहज फोटो काढू शकतो. इतर माध्यमांपेक्षा या माध्यमाचा खर्चही फार कमी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फोटोची भाषा ही समजायला फार सोपी आहे. जी एका सुशिक्षीत तरूणा पासून ते एका अडाणी माणसा पर्यंत  सर्वांनाच समजते. त्यामुळे एकाच वेळी आपण अनेकांपर्यंत आपल्या भावना किंवा आपल्याला काय म्हणायचंय ते अगदी सहज पोहचवू शकतो.

आत्तापर्यंत कोणकोणत्या विषयांवरती छायाचित्रण केलं ?
:-   मी छायाचित्रणासाठी फार खर्च तसा करत नाही. माझ्या राहत्या घरी वा त्याच्या आजूबाजूच्या परीसरात मी मला हवे तसे फोटो काढतो. मी कोकणात दशावताराचा कार्यक्रम खूप प्रसिध्द आहे, त्यामुळे ३ ते  ४ महीने दशावताराचे फोटो काढले होते. त्याच बरोबर कोल्हापूरची कुस्ती प्रसिध्द आहे,  तिथे एकदा जाणं झालं असताना  त्या आखाड्याचे, पहीलवानांचे फोटो काढले होते. २०१२ साली  आपल्याकडे दुष्काळ पडला होता, तेव्हा त्या विदारक परिस्थितीचे डॉक्युमेंटेशन केले होते. त्यामूळे अशा वेगवेगळ्या विषयांवर छायाचित्रण केलेलं आहे. हा… पण ते ठरवून  नक्कीच केलेलं  नाही.

तुमचं काम छायाचित्रण कलेच्या नेमक्या कोणत्या प्रकारात मोडतं ?
:-  मी आधीच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर छायाचित्रण केलेलं आहे पण ते ठरवून केलेलं  नाहीये. आणि त्या कामाचा विचार केलाच तर ते काम तीन प्रकारांमध्ये  मोडते. मी सहसा स्ट्रीट फोटोग्राफी करतो. जे मी रेग्युलर प्रॅक्टीस करताना काढतो.मी कोकणात असताना काढलेले दशावताराच्या कार्यक्रमाचे, कोल्हपूरच्या आखाड्याचे नि पहीलवानांचे फोटो हे डॉक्युमेंट्री फोटोग्राफीमध्ये येतात. दशावताराच्या कार्यक्रमाचे त्यातील नाट्यस्वरूपातील दृष्यांमुळे डोळ्यांना खूप आकर्षून घेतात. कोकणातील दशावताराचा कार्यक्रम, कोल्हपूरची कुस्ती ह्या भविष्यात नसणा-या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचे जतन करण्याच्या हेतूने केलेले हे डॉक्युमेंटेशन आहे. आणि मी जे दुष्काळ भागात जाऊन फोटो काढले ते जर्नालिझम फोटोग्राफीमध्ये मोडतात. कारण  त्यात पत्रकारितेच्या बेसवर दुष्काळी भागातील विदारक परिस्थिती, तेथील जनावरं-माणसं, दुष्काळा मागचं राजकारण या सर्वांचं छायाचित्रण मी केलं. त्यामुळे  मी ठरवून केलं नसलं तरी माझं आजवरचं काम हे या तीन प्रकारांमध्ये  मोडतं.

छायाचित्रणासाठी फार पैसे लागतात असं म्हणतात, तुमचं यावर काय मत आहे ?
:-   असं अजिबात नाहीये. पूर्वी छायाचित्रणासाठी जास्त पैसे लागायचे पण आता डिजीटलायजेशनमूळे खर्च फार कमी झाला आहे. फोटो काढण्यासाठी आपण कोणता कॅमेरा वापरतोय याही पेक्षा आपण त्यात काय स्टोरी मांडतोय हे जास्त महत्त्वाचं असतं.  कॅमे-याच्या क्वालिटी पेक्षा त्यातील सब्जेक्ट वर फोटो अवलंबून असतो. आणि असे फोटो आपण कुठेही फिरताना काढू शकतो, त्यासाठी विशेष ठिकाणी जाण्याचीही आवश्यकता नसते. त्यामूळे कॅमे-याच्या क्वालिटीवर खर्च करण्यापेक्षा सब्जेक्टच्या क्वालिटीवर जास्त लक्ष दिले तर फोटो नक्कीच सुंदर आणि अर्थपूर्ण येतील.

छायाचित्रकाराला राजकीय- सामाजिक भुमिका असावी का ?
:-    जरूर असावी. सध्याची परिस्थिती आपण पहाल तर आपल्याला दिसून येईल की जवळपास ९५ टक्के लोक हे केवळ हौस म्हणून फोटोग्राफी करतात. त्यात त्यांची कोणतीच भूमिका नसते. एवढंच काय आता नाशिकचंच उदाहरण घ्या. तिथे साधूंपेक्षा फोटोग्राफरच जास्त संख्येने पाहायला मिळतात. पण त्याचवेळी मराठवाड्यातील दुष्काळाचे फोटो काढायला कोणी धजावत नाही. त्यामूळे फोटोग्राफरला भूमिका ही असायलाच हवी, असं माझं ठाम मत आहे.

कॅमे-यात  आलेल्या डिजीटल टेक्नॉल़ॉजीमुळे कोणकोणते फायदे तोटे झाले?
:-   मी त्याच्या फायद्यांविषयीच जास्त बोलेल, कारण तेच जास्त आहेत. डिजीटल टेक्नॉलॉजीमूळे कॅमे-याचं डि-सेंट्रलायझेशन झालं. आज प्रत्येक घरात आपल्याला कॅमेरा पहायला मिळेल. त्यामुळे एखाद्या गरीब माणसाकडे साधा जरी कॅमेरा असेल तरी तो एक फोटोग्राफरच आहे. हा डिजीटल टेक्नॉलॉजीचा एक फायदाच आहे. आणि तोटे फारसे नसले तरी एक तोटा आहे तो म्हणजे फोटोंचा वाढता कचरा. आज प्रत्येकाकडे कॅमेरा आल्यामुळे लोक सर्रास कसेही फोटो काढत सुटतात. पूर्वी फोटो काढण्यासाठी जो रोल वापरला जायचा त्यात ३२ फोटोच आपण काढू शकायचो. त्यामूळे खूप विचार करून मगंच ते फोटो काढले जायचे,ज्यात फिजिकल टच असायचा. आणि आता तर बरेच जण पर्यटनासाठी गेले असतानाही निर्सगाचा आस्वाद घेण्याऐवजी फोटो काढण्यात वेळ वाया घालवतात. आणि त्यात भर म्हणून हा सेल्फींचा वाढता कचरा. उठ-सूठ कसेही फोटो काढले जातात. त्यात विषय नसतो, अर्थ नसतो, असा कुठलाच सेन्स त्या फोटोला नसतो. हा एकच तोटा डिजीटल टेक्नॉलॉजीचा मला तरी जाणवतो.

सोशल मिडीयाची छायाचित्रण कलेच्या प्रसारामध्ये काय भुमिका आहे ?
:-  खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज जो-तो केवळ लाईक मिळवण्यासाठी फोटो काढताना दिसतो. आणि  लाईक करणा-यांपैकीही फार कमी लोकांना फोटो कळतात. आणि त्यामूळे त्या लाईक वरून फोटो चांगला की वाईट ठरवला जातो. यामूळे ऑर्डिनरी फोटोंना जास्त प्रमोशन मिळतं आणि जे फोटो खरंच एक्सट्राऑर्डिनरी असतात ते बाजूला पडतात. अशात जे चांगले फोटोग्राफर असतात ते मात्र लाईकच्या घोळात भरकटतात.

कणकवलीसारख्या ग्रामीण भागात राहून छायाचित्रणाचा अभ्यास कसा केला?
:-  २०१३ साली मी ब्रॉडबॅंड इंटरनेट वापरू  लागलो. त्यामूळे कणकवलीत राहूनही मी जगाच्या संपर्कात आलो. मी दिग्गज फोटोग्राफरचे काम पाहीले. फ्रेंच मधील मॅगनम एजन्सीचे काम पाहीले. त्यांनाही मी आजवर केलेले काम पाठवले. बराच रिसर्च केला. अभ्यास केला. आणि यामूळे फोटोग्राफीतील समज वाढली. कणकवलीसारख्या ग्रामीण भागात राहण्याचा माझ्या अभ्यासावर काही परिणाम झाला नाही.

सध्याची देशातील व जगातील छायाचित्रणाची परिस्थिती काय आहे. ?
:-   आपली परिस्थिती इतरांपेक्षा खूप चांगली आहे असं मी म्हणेन. कारण बाहेर आपण पहाल तर तिथल्या सरकारने फोटो काढण्यावर खूप बंधने लादलेली आहेत. त्याविषयी अनेक नियम आहेत. पण आपल्याकडे सुदैवाने अजूनतरी असे काही नाही. पण असे असूनही आपल्या फोटोंमध्ये नावीन्य दिसून येत नाही. कुंभमेळा, आषाढीयात्रा हेच फोटो सतत काढले जातात, जे अजिबात रिफ्रेश नसतात. याउलट बाहेरच्या फोटोंमध्ये खूप नावीन्य असते. तिथे पर्सनल स्टोरीजचा ट्रेंड पहायला मिळतो. प्रत्येक चार भिंतीत निदान एक गोष्ट तरी असतेच असते. त्यामुळे आपल्याकडेही पर्सनल स्टोरीजचा विचार करायला हवा आता.

तुमची पत्नी गरोदरपणात झालेल्या कॉम्प्लीकेशन्समुळे ३५ दिवस हॉस्पीटलमध्ये होती. त्यावेळी तुम्ही त्यांचे फोटो काढले त्यामागे नेमकी भुमिका काय होती ?
:-   प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतातच. फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हवा असतो. मी 2015 ला एका वर्कशॉपच्या निमित्ताने या सोहराब हुरा या फोटोग्राफरला भेटलो. तेव्हा त्यांनी त्यांच्या आईच्या केलेल्या डॉक्युमेंटेशन विषयी कळलं. त्यांची आई 8 वर्ष फिजोफ्रेनियामुळे ग्रस्त होती. त्यामूळे हा प्रकार नव्यानेच कळला होता. माझी पत्नी जेव्हा गरोदर होती, तेव्हा मी तिला हया कल्पनेविषयी सांगितलं. तिही तिच्या डॉक्युमेंटेशनसाठी तयार झाली आणि ते पूर्ण झालं. कदाचित बायकोच्या गरोदरपणाचं  डॉक्युमेंटेशन करणारा देशातील मी एकमेव फोटोग्राफर असेल. आमच्या आयुष्यातील तो कठीण प्रसंग गेला. पण आज मागे वळून पाहताना डॉक्युमेंटेशनमूळे त्या आठवणी जाग्या होतात, आणि आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडलो हा आनंदही व्दिगुणीत होतो.

तुमच्या मते, छायाचित्रणाचं करिअर म्हणुन भविष्य काय असेल. ?
:-   करिअर म्हणून छायाचित्रणाचं भविष्य खूप कठीण आहे. कारण आता प्रत्येकाकडे कॅमेरा आहे. त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा दहा पावलं पुढे असाल तरचं मार्केट मध्ये तुम्ही टिकू शकाल. त्यामुळे एक छंद म्हणून छायाचित्रण चांगलचं आहे, पण एक इनकम सोर्स म्हणून खूप कठीण.

तुमच्या मते, छायाचित्रण कलेच भविष्य काय असेल. ?
:-   कला म्हणून छायाचित्रणाचं भविष्य खूप चांगल आहे. आजची नवी पिढी पहाल तर तिला फोटोची भाषा जास्त कळते. आज गप्पा फोटोच्या भाषेत मारल्या जातात. काही दिवसांनीतर कादंबरीसारखे फोटोबूक येतील आणि ते वाचले जातील. अनेक स्टोरीज फोटोंच्या माध्यामातून बाहेर पडतील. त्यामूळे कला म्हणून छायाचित्रणाला भविष्यात नक्कीच खूप वाव आहे.

तुमचे आवडते छायाचित्रकार कोणते?
:-   मला आवडणारे बरेच फोटोग्राफर आहेत. त्यापैकी काही म्हणजे गॅरी विनोग्रॅंड, सुधारक ओलवे, संदेश भंडारे, सोहराब हुरा व रघुराय असे बरेच. सुधाकर ओलवे ज्यांनी १८ वर्ष कचरा कामगारांवर रिसर्च केला, त्यांच्या कामाने मी खूप प्रेरित झालो. खरं तर यांच्या कामापुढे माझं काम काहीच नाही, मी केवळ एक फोटोग्राफीचा अभ्यासक आहे, फोटोप्रेमी आहे आणि हीच माझी ओळख रहावी असं मला वाटतं.कारण मी फक्त काही सेकंदांसाठीचा फोटोग्राफर असतो, त्यानंतर मात्र मी एक सर्व सामान्य असतो.

तुमच्या आत्तापर्यंतच्या अचिव्हमेंटसं काय?
:-  इटली फोटो फेस्टीव्हलसाठी जगातील निवडक १९ फोटोग्राफरपैकी मी एक होतो, हैद्राबाद फोटो फेस्टीव्हलसाठी माझी निवड झाली होती, ऍडम मरांग परीक्षक समीक्षक  यांनी हॉलंड मधील मॅगझीन मध्ये माझं काम पब्लिश केलं होतं,  सोहराब हुरा तसेच कोलकत्त्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील फोटोग्राफीच्या वर्कशॉप साठी माझी निवड करण्यात आली होती.
इंद्रजीत खांबे यांच्याबद्दल अधिक माहीती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मुलाखत  :  इंद्रजीत खांबे
स्त्रोत  :  www.mulakhat.com

Comments

More in इतर मुलाखत

 • बातचीत मेघना गुलजारशी……..

  बॉलिवूड हंगामा तर्फे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तलवार चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

 • आशावादी आशा ………

  "बाईची जात" ह्या ग्रुपतर्फे "गाणं तुझं-माझं" या मुलाखतीच्या सदरातील आशा करंदीकरांची ही खास मुलाखत नक्की वाचा.

 • जात नक्की संपणार – डॉ.नरेंद्र जाधव

  माणसं इथून तिथुन सारखीच आसतात, कस्टम वेगळी आसतात

 • रंगरसिया

  आपल्या रंगभूषेची दखल घ्यायला लावून तिला पुरस्कार देण्यासाठी भाग पडणारे रंगभूषाकार म्हणजे कृष्णा बोरकर. आयुष्यभर रंगांशी...