भूमिका

बंदी नको, खुली चर्चा घेऊन दंभस्फोट करा : आंबेडकर

बंदी नको, खुली चर्चा घेऊन दंभस्फोट करा : आंबेडकर
मुलाखतकार

 संस्कृती व धर्माच्या नावाखाली काम करणाऱ्या संस्थांवर बंदी लादली तर त्या नव्या नावाने वावरू शकतात. खुल्या चर्चेतून त्यांना लोकांसमोर उघडे पाडणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे मत राज्यातील ज्येष्ठ नेते व भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी “दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले. या संस्थांच्या तत्वज्ञानातील हिंसा कशी समाजविरोधी आहे, याचा दंभस्फोट करणे आवश्यक आहे. असे केल्याने त्यांचा समाजात पाया विस्तारणार नाही. समाजापासून ते वेगळे पडतील. सरकारी बंदीपेक्षा हा उपाय अधिक जालीम आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अशा कारवाया रोखण्यासाठी काय पावले उचलावीत ?
उत्तर – राज्यातील सगळी मंदिरे सरकारने ताब्यात घ्यावीत. आजची मंदिरे हिंसक कारवाया करणाऱ्या संघटनांच्या निधीचे मुख्य स्त्रोत बनलेली आहेत. सर्व मंदिरांवरती सरकारी मंडळे नेमण्याची गरज आहे. फंडींग बंद झालं की सनातन सारख्या संस्थांनाच्या कारवायांना आपोआप अटकाव बसेल.

सनातन संस्था ही रा. स्व. संघ परिवारातील उपसंघटना असल्याचा अनेकांचा आरोप आहे.
उत्तर- तो खरा आहे. काय आहे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन अशा ज्या हिंसेवर विश्वास ठेवणाऱ्या संघटना आहेत, त्या सर्वांचा पाठिराखा (साधक) एकच आहे. तो आपलं रुप अचानक बदलतो. तो कधी संघाचा कार्यकर्ता असतो, तर कधी सनातनचा साधकही असतो. हा कार्यकर्ता उद्या बेभान बनला, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सध्या हाच आपल्यासमोरचा मोठा धोका आहे.

राज्यातील हे खूनसत्र थांबेल की चालूच राहील?
उत्तर- हे खूनसत्र अजिबात थांबणार नाही, थोड्या थोड्या कालांतराने अशा घटना घडत राहतील. २०२३ मध्ये सनातनला देशात ईश्वरी राज्य (हिंदू राष्ट्र)आणायचे आहे. त्याच्या आड येतील, त्यांच्या प्रचाराला प्रत्युत्तर देतील त्यांच्या विरोधात कृती होणारच.

आता या मंडळींचे पुढचे टार्गेट कोण असेल?
उत्तर –  हिंसक कारवाया करणाऱ्या या संघटनांचे पुढचे टार्गेट वारकरी मंडळी असतील. काय आहे, गावोगावी बहुजन समाजातले मंडळी आज कीर्तन करत आहेत. ही मंडळी विद्रोही तुकाराम मांडत असतात. सनातनला संतांचे पुरोगामित्व नको आहे. त्यांना वेदप्रामाण्य हवे आहे. त्यामुळे उद्या कीर्तनकारांच्या विरोधात हे उभे राहिले तर आर्श्चय वाटायला नको.

राज्यातील या हिंसक कारवायांचा शेवट तुम्हाला कुठे दिसतो ?
उत्तर- याचा फायदा पाकिस्तान घेईल. तुम्ही पाण्याचा हौद भरुन ठेवत आहात. त्यात सहज उडी मारता येत असेल तर ही संधी कोण कशाला सोडेल. असुरक्षित, भयग्रस्त, धर्मांध, असहिष्णु असे वातावरण तुम्ही निर्माण केलंय. त्याचा लाभ तुमचे शत्रू उचलणारच. पाकिस्तानसारख्या आपल्या शत्रू राष्ट्राला आपल्या कारवाया करण्यास असे वातावरण पोषकच आहे.

नक्षलवाद्यांशी संघर्ष उद्भवेल असे का वाटते ?
उत्तर- काॅ. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकात उभा केलेला शिवाजी सनातनच्या गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजीपेक्षा वरचढ ठरत होता. म्हणून पानसरेंना मारले. दाभोलकर अंधश्रद्धा सोडा म्हणत होते. म्हणून त्यांना संपवले. म्हणजे या संघटनांनी सध्या साॅफ्ट टार्गेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. उद्या ते डाव्यांकडे वळतील. आता नक्षलवाद्यांचा  खास बेल्ट आहे. आपल्यापर्यंत येण्यापूर्वी आपणच त्यांच्यापर्यंत पोचायचं, असं नक्षलवाद्यांचं गुरिला तंत्र असतं. त्यामुळे उद्या  संघ परिवारातील  संस्थांवर माओवाद्यांनी हल्ले केले तर नवल नको.

 राज्यात भाजपचे सरकार असल्याने सनातनला  पाठीशी घातलं जातंय असं तुम्हाला वाटतं का ?
उत्तर- अजिबात नाही वाटत. सरकार हे सरकार असते. ते काँग्रेसचे असू दे नाही तर भाजपचं. सरकारला कायदा, सुव्यस्था सांभाळायची असते. फडणवीस सरकार सनातनवर योग्य ती कारवाई करेल, यात मला अजिबात शंका नाही.

मुलाखत  : डॉ.प्रकाश आंबेडकर

मुलाखतकार : अशोक अडसूळ

स्त्रोत  : दिव्य मराठी 

Comments

More in भूमिका