कवी

कल्ला झाला…हल्ला झाला…..

कल्ला झाला…हल्ला झाला…..
मुलाखतकार

एकिकडे सहिष्णु-असहिष्णुतेच्या घे-यात अडकलेला आपला देश, परदेश दौ-यात व्यस्त असलेले आपले माननीय पंतप्रधान आणि शाकाहार-डाळीच्या कचाट्यात सापडलेला आपला सर्वसामान्य माणूस…. या सगळ्यात कुठेतरी आपला अन्नदाता बाजूला पडतोय. केवळ दौरे होताहेत, चर्चा होताहेत, वाद होताहेत पण निष्कर्ष शून्य. याच वास्तवावर आधारित शिनमा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट ज्यांच्या लेखणीतून साकारला, ते या चित्रपटाचे संवादलेखक दयासागर वानखेडे यांच्याशी साधलेला हा संवाद. 
shinma

हा तुमचा पहिलाच चित्रपट ?
उ-
नाही. याआधी मी आशियाना आणि वन टू थ्री फोर हे चित्रपट केले आहेत. आशियाना मध्ये मी पटकथा व संवाद लेखक म्हणून काम केले आणि वन टूथ्री फोर या चित्रपटात संवाद लेखक आणि प्रमुख सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे . वन टू थ्री फोर या चित्रपटाच्या लेखनाला उत्कृष्ट कथा-पटकथा आणि उत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. आणि शिनमा मध्ये मी गीतकार, लेखक आणि असोसिएट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

शिनमाची स्टोरी लाईन काय आहे?
उ-
बेसिकली हा विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आहे. सिनेमातला शिनमा आहे हा. एक अवॉर्ड विनिंग दिर्ग्दशक केवळ त्याच्या परिस्थितीमुळे एका निर्मात्याला गंडवतो नि एका दुष्काळग्रस्त भागात सिनेमा करण्यासाठी येतो. दुष्काळ ग्रस्त भागामध्ये या शिनेमा तील सिनेमा चे चित्रीकरण चालू होते . तिथल्या दुष्काळ ग्रस्त लोकांच जगणं जेंव्हा या दिग्दश्कासमोर येतं त्यातून पुढे बदलत जाणारा हा चित्रपट आहे .ही या चित्रपटाची स्टोरी लाईन आहे. सुरूवातीला विनोदी वाटणारा हा शिनमा हळूहळू तुम्हाला त्या कोरडया ठाक, जळजळीत वास्तवासमोर घेऊन जातो नि त्यावेळेस डोळ्यातून अश्रू आल्य़ाशिवाय राहत नाहीत, हीच या शिनमाची ताकद आहे.

या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा आहेत, त्यामुळे चित्रपटाच्या लिखाणासाठी तुमच्यासमोर मोठं आव्हानंच होतं, कसं पेललं हे आव्हान?
उ-
अॅक्च्युली मी या चित्रपटात असोसिएट दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलेले असल्यामुळे  कोणत्या व्यक्तिरेखेसाठी कोण कलाकार असू शकतो हे लक्षात ठेऊनच या चित्रपटाचे लिखाण झाले होते .आधी त्यातील ब-याचश्या कलाकारांसोबत काम केलेलं असल्यामुळे संवाद लिहिताना जास्त त्रास झाला नाही. प्रत्येक कलाकाराची बोलण्याची लय काय आहे, त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे, एखादं वाक्य कुठल्या कलाकाराला जास्त प्रभावी पणे मांडता येईल, याचा अंदाज लेखक म्हणून आम्हाला होता. सो आव्हान जरी मोठ असलं तरी ते अगदी सहज रीत्या पेललं गेलं.team

शिनमातील या व्यक्तिरेखांचं वैशिष्ट्य काय आहे ?
उ-
बापरे … प्रत्येक पात्रा विषयी सांगणे अवघड आहे कारण या चित्रपटात 16 प्रमुख व्यक्तिरेखा असून त्या प्रत्येकाची एक बॅक स्टोरी आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत अजिंक्य देव आहेत. ते या चित्रपटातील चित्रपटाचे दिर्ग्दशक आहेत. एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला दिग्दर्शक आणि अचानक त्याच्या आयुष्यात आलेला बदल त्याला डी ग्रेडचे चित्रपट बनवायला भाग पाडतो. त्यासाठी त्याच्या मित्र जी भूमिका विजय पाटकरांनी केली आहे तो त्याला सर्वोतपरी मदत करतो . विजय पाटकर ज्यांची स्वतःची असी हटके विनोदाची शैली आहे, त्या शैलीला छेद देत त्यांनी त्यांचे पात्र साकारले आहे. चित्रपट तुम्ही पहाल तर अंशुमन विचारे ज्याला आजवर तुम्ही केवळ विनोदी भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे, तो शिनमात महत्त्वाची भूमिका बजावतोय, या चित्रपटातील विनोद फक्त पोट धरून हसायला लावत नाही तर ह्या गंभीर समस्येवर विचार करायला भाग पाडतो. गणेश यादव यांनी साकारलेला सामाजिक भान असलेला कार्यकर्ता असो किंवा यतीन कार्येकर आणि किशोरी शहाणेनी साकारलेले गुजराती निर्माते असो , प्रत्येकाने त्याची भूमिका अगदी मनापासून वठवलेली आहे. यातील सौरभ गोखेलेने साकारलेला सहायक दिग्दर्शक हि सिनेमात तेवढाच महत्त्वाचा वाटतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचे निर्माते यांनी सुद्धा स्वतःचं अभिनय कौशल्य या चित्रपटात दाखवलं आहे. या चित्रपटात आणखीनही दिग्गज आहेत त्यापैकी अरुण कदम , अभिजित चव्हाण , आशिष पवार , दिगंबर नाईक , निशा परुळेकर , किशोर नांदलस्कर, संस्कृती बालगुडे , गुर्लीन चोप्रा या सगळ्यांचीच पात्र खूपच इंट्रेस्टिंग असून ती बघायला चित्रपट गृहातच जावं लागेल.

charecters

एक महत्त्वाचा सामाजिक संदेश विनोदाची झालर लावून तुमच्या लिखाणातून नि दिर्ग्दशकाच्या नजरेतून प्रेक्षकांच्यापर्यंत पोहचणार होता, याचा तोल कसा सांभाळला?
उ- थोडक्यात सांगायचं तर हा चित्रपट मास नि क्लास या दोघांसाठी आहे. या चित्रपटाविषयी बोलताना अनेकांकडून एक प्रश्न सतत उपस्थित होतोय, तो म्हणजे गंभीर विषयावरील या चित्रपटात, विनोद निर्मिती का करण्यात आलीये? खरं तर, दुष्काळ हा खूप गंभीर, चिंताजनक प्रश्न आपल्या समोर सध्या उभा ठाकलेला आहे. तो मांडत असताना सर्वांपर्यंत तो पोहचावा, चित्रपट हा विषय हाताळताना खूपच गंभीर वा रटाळ होऊ नये म्हणून त्याला विनोदाची जोड असणं देखील तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे हा विषय अधिकांपर्यंत अगदी सहज पोहचतो. विनोदामुळे प्रेक्षक चित्रपटाच्या अजून जवळ येतो, त्यामुळे चित्रपटातील विनोदही तितकाच गरजेचा आहे.

तुम्ही या चित्रपटातील एक गाणं देखील लिहिलं आहे, गीतकार म्हणून ही तुमची पहिलीच कलाकृती का?
उ-
हो, मी पहिल्यांदाच गीतकार म्हणून काम केलेलं आहे. मी मुळचा विदर्भातला आहे. त्यामुळे मी तिथला दुष्काळ फार जवळून पाहिला-अनुभवला आहे. त्यामुळे हे जे गाणं खरंतर गाण म्हणण्यापेक्षा ती शोकांतिका आहे असे म्हणणे जास्त योग्य होईल ती शोकांतिका ठरवून लिहिली गेली नाहीये ती आतून आलेली आहे, “ बंद चूल, रडतं मूल, भाकरीचा लिलाव झाला… कल्ला झाला…हल्ला झाला…..” असे या गाण्याचे बोल आहेत.

गीतकार म्हणून हा पहिलाच अनुभव कसा होता?
उ-
खरं तर खूप भयावह असा हा अनुभव होता. गीतकाराला जे ज्ञान असावं लागतं ते माझ्याकडे नाहीये, हो नक्कीच नाहीये त्यामुळे गीतकाराला  गाण्याचे जे मीटर्स कळणं गरजेचं असतं ते मला अजिबात कळत नाही. पण तरीही हे गाणं मी लिहिलं नि पूर्ण झालं याचं सर्व श्रेय जातं ते माझ्या सोबत गीतकार म्हणून काम केलेला राहुल साळवे आणि संगीतकार रोहन-मोहन यांना. गाण्याच्या शब्दात काहीही फेरफार न करता एक गीतकार म्हणून मला आणि राहुलला जे मांडायचं होतं त्याला व्यवस्थित मीटर मध्ये बसवून , खूपच छान चाल लावली,  आदर्श शिंदेने ते तेवढंच सुंदर गायलं सुद्धा आणि आता ते गाणं प्रेक्षकांच्या पसंतीसही पडलंय.

वेदांत एन्टरटेंमेंटच आणि आउट ऑफ द बॉक्स ची हि फिल्म आहे , तर शिनमा ही आउट ऑफ द बॉक्स आहे का ?
उ-
हो नक्कीच आहे. आपण इतर निर्मात्यांचा विचार केला तर नरेशनच्या अगोदर या चित्रपटातून पैसे वसूल होण्याची हमी निर्मात्याला हवी असते, पण आमचे निर्माते अनिल जोशी हे याला अपवाद आहेत. मिलिंद कवडेंनी या आधीही विनोदातून सामाजिक विषय लोकांपर्यंत आणला आहे. निर्माता आणि दिग्दर्शकाची जोडी जमली कि एक आउट ऑफ द बॉक्स कलाकृती बाहेर पडते.. अनिल जोशी यांनी या चित्रपटासाठी आम्हाला दिलेली मोकळीक फार महत्त्वाची ठरली. पैसे वसूल होण्यापेक्षा या चित्रपटातील सामाजिक संदेश समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्य़ंत पोहचावा, सर्वांनी कुटुंबासमवेत हा चित्रपट पाहावा अशी अनिल सरांची अपेक्षा होती. वरवर विनोदी वाटणारा हा चित्रपट दुष्काळासारख्या गंभीर विषयावर भाष्य करतो नि सर्व स्तरातील प्रेक्षकाला त्या विषयाशी जोडतो त्यामुळे हा चित्रपट नक्कीच आउट ऑफ दि बॉक्स आहे असं मी म्हणेन.आमच्या निर्मात्याची यात मोलाची भूमिका  आहे.shinma full team

शिनमाची कथा मिलिंद कवडे, प्रकाश भागवत, अशोक झगडेंची आहे , आणि पटकथे मध्ये तुमची चार जणांची टीम आहे आणि याच बरोबर संवाद लेखक म्हणून सुद्धा तुमच्या वर आणि दीपक ठुबे यांच्यावर मोठी जबाबदारी होती , कशी सांभाळली ही जबाबदारी?
उ-
या चित्रपटाची कथा खूप छान असल्यामुळे आम्ही चौघांनी म्हणजे मिलिंद कवडे , प्रकाश भागवत , दीपक व मी पटकथेची जबाबदारी स्वीकारली. सर्वांच्याच अनुभवातून , अभ्यासातून एक साचेबद्ध पटकथा तयार झाल्यानंतर मात्र संवाद लेखनाची खरी परीक्षा होती म्हणून यातही मी आणि दीपक जबाबदारी वाटून घेत संवाद लेखन केले. दीपक अतिशय उत्कृष्ट विनोदी लेखक आहे, तर माझे लिखाण गंभीर विषयांकडे जास्त वळणारे आहे. आणि या चित्रपटात विनोद आणि गंभीर असे दोन्ही असल्यामुळे फार काही अडचण आली नाही. खरं पाहता विनोद निर्मिती करत सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचवणे यात बरीच मोठी जोखीम होती ही, पण सर्वांनी मिळून पार पाडली.sagar nd milind

या चित्रपटानंतरचे पुढचे प्रोजेक्ट सुरू आहेत?
उ-
माझ्या वन टू थ्री फोर नि बाजार अशा दोन फिल्म लवकरच प्रेक्षकांसमोर येतील. दोन्ही चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. मी आणि राहुल साळवे यांची निर्मिती असलेले “ फिलिंग्स ऑफ द ट्वेंटी इयर्स हे नाटक येत्या महिन्यात प्रेक्षकांसमोर असेल. आणि त्या सोबतच एका चित्रपटाचे काम चालू आहे जो मी स्वतः दिग्दर्शित करत आहे. त्याविषयी मी आता फार काही बोलणार नाही. पण लवकरच तुमच्या पर्यंत त्या संदर्भात माहिती येईल.

मुलाखत :-  दयासागर वानखेडे

मुलाखतकार :-  सुजाता शिरसाठ  

Comments

More in कवी