मराठी माणसं

मातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार

मातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार
मुलाखतकार

“सुख-दुःखाच्या अनेक क्रियांमधून आपण गेलेलो असतो. ते सगळं कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माईंड साचत जातं.  मग अचानक केव्हातरी एखादी क्रिया करताना ते फ्लॅश होतं. मी शिल्पकार असल्याने असेल पण तो विचार शिल्पाच्या फॉर्ममध्ये, अंतरपटलामध्ये  चक्क मला दिसत असतो. एवढंच नाही तर मार्बल, मेटल यापैकी विशिष्ट फॉर्ममध्ये तो मला दिसत असतो.”- भगवान रामपुरे

मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या प्रवेशद्वाराजवळील “बिग बुल’, मिर्झा गालीब, कवी गुलजार, नाटककार विजय तेंडुलकर, संगीतसम्राट मा. दीनानाथ मंगेशकर, ग्रेस अशी साहित्य, काव्य आणि कलाप्रांतातील दिग्गज मंडळी, ओशो,बुद्ध,गणपती ज्यांच्या शिल्पांमधून अनेकदा जिवंत भासमान झाली आहेत, ते म्हणजे भगवान रामपुरे.
त्यांनी साकारलेली शिल्प माणसाहूनही अधिक जिवंत वाटतात. एखादं शिल्प घडताना ती केवळ एक क्रिया असते की एखाद्या आईप्रमाणे त्या कलाकाराने देखील त्या गोळ्याला जन्म दिलेला असतो. एखाद्या विचारातून शिल्प कसे निर्माण होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील मुलाखतीत मिळतीलच. त्याचबरोबर रामपुरेंचा कलाप्रवास कुठून सुरू झाला, गुलजारांशी त्यांची झालेली पहिली भेट, त्यांचे पहिले शिल्प, या अनेक प्रश्नांचा उलगडा करणारी ही मुलाखत खास मुलाखत.कॉमच्या वाचकांसाठी.


12659714_1673532416269832_229765536_nतुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात. मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही अगदी सुरूवातीला नाट्यक्षेत्रात रमला होतात
, त्यानंतर चित्रकलेची गोडी तुम्हाला लागली. पण तुम्ही निवडलं शिल्पकलेला.. का ?
उ- कसं आहे, आपण जेव्हा आपल्या तारूण्यात पदार्पण करत असतो तेव्हा आपल्यात काहीतरी क्रिएटिव्ह करून दाखवण्याची ऊर्जा ही फार मोठ्या प्रमाणात असते. आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास आपल्यात ठासून भरलेला असतो  आणि यात कुठलीही गोष्ट ही ठरवून केली जात नाही वा घडतही नाही. आपण तेव्हा आजूबाजूच्या वातावरणानुसार घडत असतो. आता मी लहानपणी जिथे राहत होतो म्हणजे कामगार कल्याण केंद्रात सोलापूरला. माझे वडिल तिथेच लक्ष्मी विष्णू मिलमध्ये कामगार होते. त्याचबरोबर ते एक मूर्तिकारदेखील होते. आमच्या घरी गणपतीचा कारखाना होता. पूर्ण कुटुंब त्या कारखान्यात काम करायचे. त्यामुळे मी मातीला हात कधी लावला हे ही मला आठवत नाही. पण त्यावेळी मनात एक क्रेझ होती. आमच्या इथे तेव्हा कामगार कल्याण केंद्रात नाट्यस्पर्धा असायची. मोठ्या भावामुळे मला नाटकाचीही आवड लागली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी त्यावेळी काही नाटकं लिहिली देखील होती. ज्यांना पारितोषिकही मिळाली होती. तिथे स्त्रियांसाठी पुरूषविरहित नाटकं असायची आणि पुरूषांची नाटकं ही स्त्रीविरहित असायची. तेव्हा मी स्त्रियांसाठी ‘संस्कार’ म्हणून एक नाटक लिहिलं होतं. त्यामुळे मी नाटकांमध्ये फारच गुंतलो होतो. याचाच परिणाम म्हणून मी दहावीत नापास झालो. भावाने त्यावेळी मला खूप समजावलं.  माझी चित्रकलाही तेव्हा चांगली होती. त्यामुळे चित्रकला किंवा नाटक या दोघांपैकी काहीतरी एकच निवडावं लागेल असं त्याने मला सांगितल्यावर मी चित्रकलेची निवड केली. पण त्यासाठी पुढील शिक्षण मी जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये घ्यावं अशी माझी इच्छा होती. ज्यासाठी १० वी पास होणंही तितकच गरजेचं होतं. १० वी पास झालो . जे.जे ला अॅडमिशन मिळावं म्हणून सोलापूरला चित्रकला महाविद्यालयात मी फाऊंडेशनचा कोर्स करत होतो. ते करत असतानाच मी एक स्कल्पचरही केलं होतं. ते होतं नर्गिसचं.  त्याच्या सोबतच मी एक न्यूड स्कल्पचरदेखील केलं होतं. ते माझ्या सुदर्शन देवरखोंडस सरांनी पाहिलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझी चित्रकलाही चांगली आहे पण माझी शिल्पकलाही फारच अप्रतिम आहे. जर मी शिल्पकार होण्याचा निर्णय घेतला तर सोलापूर सारख्या शहराला, महाराष्ट्राला आपल्या देशाला एक उत्तम शिल्पकार मिळेल. माझ्या मोठ्या बंधूंचंही तेच म्हणणं होतं, मग मी शिल्पकार होण्याचं ठरवलं. पण तसं  असलं तरी मी आजही चित्र काढतो. मी लिहलेली नाटकही माझ्याकडे आहेत ज्याचा पुढे जाऊन चित्रपट करण्याचा माझा विचार देखील आहे.

तुम्ही आजवर ब-याच दिग्गजांची शिल्पं काढली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गुलजार. त्यांच्या घरीदेखील तुम्ही केलेल्या काही कलाकृती आहेत. गुलजार आणि तुमच्या या ऋणानुबंधाविषयी काय सांगाल ?

10376031_1382570932032650_7149072899960568915_nउ- केवळ नशीब. मी आधी सांगितल्याप्रमाणे मी सुरूवातीला खेड्यातच होतो. ८२ साली मी मुंबईत आलो. तेव्हा मी हॉस्टेलवर राहत होतो. आमच्या हॉस्टेलवर टी.व्ही होता. तेव्हा गुलजारांची ‘मिर्झा गालिब’ नावाची सिरिअल लागायची. त्यामुळे गुलजारांमुळे माझा गालिबशी परिचय झाला. मला तेव्हा चित्रपटांचं फार वेड होतं , आजंही आहे. इजाजत नावाचा चित्रपट तेव्हा आला होता. देवानंद, विजयानंद, गुरूदत्त, बिमल रॉय, अशी सर्वांग सुंदर चित्रपटांची सिरीज तेव्हा होती. फिल्मच क्रेझ तर होतंच. जेवढं शाळेने शिकवलं नाही त्याहून अधिक यांनी माझं जीवन संपन्न केलं. त्यातूनच रसग्रहण शक्ती उत्पन्न झाली. ८२ सालापासून माझ्या शिल्पकार म्हणून प्रवासाला सुरूवात झाली होती. आणि हे सगळ घडत होतं २००० साली. अरूण शेवते (ऋतूरंगचे संपादक) म्हणून माझे एक मित्र मला माझ्या गोरेगाव येथील स्टुडिओत भेटले. गप्पांमध्ये मी सोलापूरचा असल्याचं त्यांना कळलं. अरुण शेवतेंचे अमोल चाफळकर म्हणून एक आर्किटेक्ट मित्र आहेत, त्यांना गुलजारांना भेटायचं होतं. त्याने ‘गुलजार बोलतो आणि त्याची कविता होते’ असं एक पुस्तक लिहिलं होतं. त्यासंदर्भातच ही भेट होणार होती. तेव्हा मी गुलजारांना पहिल्यांदा भेटलो. पण तेव्हा मला कळलं की ते मला आधीपासूनच ओळखत होते. मी केलेली ‘फेमिना लूक ऑफ ईयरची ट्रॉफी’ त्यांनी पाहिली होती. या भेटीत मी त्यांना वेळ साधून हळूच विचारलं, तुमचं प्रोट्रेट मला करायचं आहे, त्यासाठी तुम्ही मला वेळ देऊ शकाल का? त्यांनी मला लगेच हो म्हणून टाकलं.  त्यांनी त्यासाठी तब्बल ३ दिवस मला दिले. या ३ दिवसात आमच्यात खूप आत्मियता निर्माण झाली. ते मला म्हणाले देखील की, हा वेळ मी त्यांचं प्रोट्रेट करतोय म्हणून तुला देत नाहीये तर मातीच्या कणांपासून माणूस कसा घडतो हे मला पहायचंय म्हणून हा वेळ मी तुला देतोय. आणि गुलजारांच्या बाबतीत मी एकच सांगेन की, ते सुरूवातीला नकारच देतात पण त्यांनी एकदा आपल्याला आपलं म्हटलं की मग ते शेवटचं असतं. ५ वर्षांपूर्वी त्यांनी माझ्याकडून गालिबचं शिल्प करून घेतलं. त्यानंतर दोन-तीन ट्रॉफी देखील करून घेतल्या. त्यामुळे जसजशी माझी ग्रोथ होत गेली तसतशी आमच्या नात्याला एक खुमारी येत गेली असं मी म्हणेन.

तुमच्या कलाकृतींपैकी  ओशो नि शुन्य हे एक विशेष शिल्प आहे, ओशोंचा तुमच्यावरील प्रभाव कसा आहे ?
उ- मी आधी ओशो आणि शून्य या माझ्या शिल्पाविषयी सांगेन. तुम्ही ओशोचे कुठलेही प्रवचन ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल की, त्यांच्या प्रत्येक विषयाचा शेवट हा ध्यानात असतो. त्यांचा विषय मीरा, कृष्णा, महावीर,12695952_1673781136244960_677757542_n आरोग्य असो वा सेक्स असो त्याच्या अखेरीस ध्यानाचे काय महत्त्व आहे हे ते आपल्याला सांगत असतात. ध्यान करणे म्हणजे निर्विचार होणे, शून्य अवस्थेत पोहचणे. शून्य ही एक अवस्था आहे. तुम्हीच विचार करा आपल्या शिक्षणाची सुरूवातीलाच आपल्याला विचार करा असं सतत सांगितलं जातं. पण सगळे संत-महात्मे आपल्याला निर्विचार व्हा, कसलाच विचार  करू नका असंच सांगतात. किती विरोधाभास आहे हा. खरंतर हा प्रश्नच खूप गहन आहे. पण जर आपण हे ध्यान केलं तर आपण रिकामे होतो, न्युट्रल होतो असं मला वाटतं. कारण आपण कितीही ठरवलं तरीही जाणूनबुजून आपल्या डोक्यात सतत विचार हे येतातच. पण जेव्हा आपण एकाग्र होतो, म्हणजेच आपलं चित्त-मन-शरीर हे एक अग्र होतं तेव्हा आपले सगळे विचार थांबतात. पाण्यात खडा टाकल्यावर कसे तरंग निर्माण होतात, तेच विचारांच्या बाबतीतही घडतं. आपल्या मनाच्या अनेक अवस्था असतात. आपण मनाच्या त्या तळापर्यंत म्हणजे अंर्तमनात शिरलो की, सगळंच कसं शांत होतं. तेव्हा तिथे वैश्विक एनर्जी काम करत असते.  त्यासाठी त्या शून्य अवस्थेत पोहचणं गरजेचं असतं. त्यासाठी मी ध्यानाकडून शून्याकडे नेणारी हातांची मुद्रा आणि ओशो आणि शून्य असे एक शिल्प केले होते. त्यात मी काचेचा वापर केलाय, कारण काच हे शून्याचं प्रतिक आहे. यावरून माझ्यावर ओशोचा किती प्रभाव आहे हे समजले असेलच.
प्रत्येक माणसाचा एक पिंड असतो. त्यामुळे समोर येणा-या व्यक्तींमधून आपण फक्त सकारात्मक गोष्टी घ्यायच्या असतात. ओशोमुळे माझं जगणं संपन्न होऊ शकलं वा माझ्या संपन्न जगण्याचा प्रवास सुरू झाला असं मी म्हणेन. बुद्ध मला ओशोमुळे कळला. बुद्धच नाही तर मीरा-कृष्णाचं नातं, काही विदेशी विचारवंतांचे विचार, वेगवेगळ्या विचारधारा मला ओशोमुळेच समजल्या.

तुमच्या एकंदर शिल्पांचा विचार केला तर बुद्ध तुमच्या फार जवळचे वाटतात, वेगवेगळ्या मुद्रेतील शिल्प तुमचे साकारले आहेत, बुद्धच का, यामागील कारण काय ?10376069_1382571248699285_4881608132769084932_n

उ- बुद्धच असं काही नाही. तसे खूप विषय आहेत. पण बुद्धांचे शिल्प जास्त पसंत केले जातात. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचतात. त्यापेक्षा मी असं म्हणेन की त्याचे विचार युनिव्हर्सल विचार आहेत. पण त्यातही तुम्ही पहाल तर वेगवेगळ्या ठिकाणचा बुदध हा वेगळा दिसतो. जॅपनीज मुर्तिकाराने घडवलेली बुद्धांची मूर्ती, भारतीय शिल्पकाराने केलेली बुद्धाची मूर्ती यात खूप फरक आढळून येतो. पण तो एक चेहरा नसून एक विचार आहे. आणि जो तो विचार समजू शकतो तोच बुद्धत्त्वाला पोहचतो. बुद्धाची मुर्ति म्हटलं की, लोंबकळते कान, लांब हात, कुरळे केस अशीच प्रतिमा तयार केली जाते पण कदाचित तसं नसेलही. बुद्ध हा एक विचार आहे, तो विचार समजणं फार महत्त्वाचं आहे.

तुमचे प्रत्येक शिल्प एक विचार मांडतो, त्यात विशेष संदेश दडलेला असतो.. असे एखादे शिल्प जन्माला येण्याच्या प्रक्रियेबद्दल काय सांगाल, प्रसुतीच्या वेदना होतात का त्यावेळेस
उ- कोणतंही शिल्प करताना प्रसुतीच्या वेदना होतात असं नाही म्हणता येणार तर एक निर्मिती होते, एखाद्या कलाकृतीला कलाकार जन्म देत असतो. त्याचं आऊटपुट जरी दोन दिवस वा काही तासांचं असलं तरी ती प्रकिया एखाद्या गरोदर बाईप्रमाणे ९ महिन्यांची असू शकते. तो विचार आत रुजू द्यावा लागतो. तो विचार तेव्हाच बाहेर पडतो जेव्हा तो पूर्णपणे आपल्यात रूजलेला असतो. मी कोणतेच शिल्प कधी ठरवून करत नाही, ती तंद्री एकदा लागली की ते आपोआप घडून जातं.
आता ह्या प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे सांगायचं झालं तर लहानपणापासून आपण सर्व काही पाहत आलेलो असतो. सुख-दुःखाच्या अनेक क्रियांमधून आपण गेलेलो असतो. ते सगळं कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माईंड साचत जातं.  मग अचानक केव्हातरी एखादी क्रिया करताना ते फ्लॅश होतं. मला मी शिल्पकार असल्याने असेन पण तो विचार शिल्पाच्या फॉर्ममध्ये दिसतो. तर अंतरपटलामध्ये तो चक्क मला दिसत असतो. एवढंच नाही तर मार्बल, मेटल यापैकी विशिष्ट फॉर्ममध्ये तो मला दिसत असतो. तेव्हा मग ते पुसलं जाऊ नये म्हणून मग मी लगेच त्याचं स्केच करून ठेवतो. मग मनातच ते शिल्प डेव्हलप होत असतं, त्याचं एडिटही तिथेच होतं. ही सर्व क्रिया इमॅजिनेशनचाच एक भाग असते. मनातला आकार हा केवळ एक भाग असतो, पण त्याचं शिल्प होताना मात्र त्यात पुढे खूप बदल होत जातात. उदाहरणार्थ मी केलेले मीराचे शिल्प.
त्याची माझ्याकडे एक सुंदर कथाच आहे. मी ओशोचे मीराच्या चरित्राविषयी प्रवचन ऐकत असताना ब-याच वेगवेगळ्या अवस्थेतील मीरा माझ्या नजरेसमोर आली.एक सिरीजंच माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेली. त्या प्रवचनात त्यांनी मीराच्या बालपणाची एक गोष्ट सांगितली होती.10302051_1420627211560355_5258366547897221334_n
मीरा एकदा एका संन्यासाकडून कृष्णाची मूर्ति खेळायला म्हणून घेते. भातुकलीच्या खेळात मीरा नवरी बनते आणि तिचा नवरा कोण म्हणून ती आईला विचारते तर तो कृष्णच तिचा नवरा असं आई तिला सागंते . ते कायमस्वरूपी तिच्या मनावर कोरलं जातं.  काही केल्या ती त्या कृष्णाची मूर्ती परत त्या संन्याश्याला द्यायला तयार नसते. मग त्या कृष्णालाच मिठीत घेऊन ती गाढ झोपते तेव्हा तिची आई हळूच ती मूर्ती तिच्या हातातून काढून घेउन त्याला परत करते. पण कृष्णच माझा नवरा, माझ्या शरीराचे पती जरी दुसरा कुणीही पुरूष असला तरी माझ्या मनावर अधिराज्य हे कृष्णाचेच असणार, मीरा फक्त कृष्णाचीच असू शकते असं मीराच्या तनामनात हाच विचार दृढ होत जातो. मीरा कृष्णाची भजने म्हणतच मोठी होते. आता ती तिशीतली झाली आहे. कृष्ण तिचा श्वास झाला आहे. तिच्याकडे लहानपणाची ती कृष्णाची मूर्ति आता नसली तरी तिच्या मनात कृष्णाची एक वेगळी मूर्ति नक्की असेल.
तर ह्याच प्रसंगावर आधारित एक शिल्प माझ्या डोक्यात आलं. कि मीरा त्या मूर्तिसमोर भजन करताना तल्लिन झालीये, तिने कृष्णाला स्वतःला सोपवून दिलंय. हातातला तानपुरादेखील गळून पडलाय, शरीरात त्राण उरला नाहीये, आता ती तिच्या कृष्णाशी पूर्णपणे एकरूप झालीये. अशी मूर्ति माझ्या डोक्यात होती. त्यासाठी मला तिशीतील स्त्री हवी होती जी मीराच्या गेटअपमध्ये एक मॉडेल म्हणून काम करू शकेल. पण कुणीच त्यासाठी तयार होत नव्हतं, काही जण त्यासाठी सूट होत नव्हते. मग माझ्या बायकोने माझ्या मित्राच्या बायकोविषयी मला सुचवलं. त्या या कॅरेक्टरसाठी एकदम सुट झाल्या. मग मी त्यांना मॉडेल म्हणून शिल्पासाठी निवडलं आणि हे शिल्प पूर्ण झालं. माझा अमूर्त शिल्पांचा प्रवास या शिल्पापासून सुरू झाला. मी ही मीरा केली तेव्हा मला कृष्ण ही दाखवायचा होता पण हा कृष्ण मीराच्या मनातला असावा असंही वाटत होतं. पण मीराच्या मनातला कृष्ण कसा असेल याचा अंदाज करणं फार कठीण गेलं, पण तो इतर कृष्णांसारखा नक्कीच नसेल, ते चित्र लगेच डोळ्यांसमोर उभं राहिलं आणि हे शिल्प ख-या अर्थाने मला हवं तसं पूर्ण झालं.
मग पुढे  जाऊन मी निराकार मूर्ती करायला सुरूवात केली. आकार म्हणजे शिल्प आपण म्हणतो, पण आकारातून निराकार कसं पकडणार. ते फारच कठिण होतं. पण ते ही करत मी निराकार बुदध, गणपती अशा ब-याच मूर्त्या केल्या. निराकार म्हणजेच फॉर्मलेस ज्याला आपण म्हणतो ते करणारा मी पहिलाच भारतीय शिल्पकार आहे.

असं कधी झालंय का की एखादे शिल्प सुचले पण ते अजूनही पूर्ण झाले नाहीये ? जसं तुम्ही म्हणालात की, त्याचं आऊटपुट जरी दोन दिवस वा काही तासांचं असलं तरी ती प्रकिया कितीही वेळ घेऊ शकते.
उ- हो, असं अनेकदा अनेक शिल्पांच्या बाबतीत होतं. त्यामुळे माझ्या प्रत्येक शिल्पामागे एक वेगळी कथा आहे. असंच एक शिल्प गेल्या १५ वर्षांपासून डोक्यात आहेत. गेली १५ वर्ष मी फक्त त्यावर विचार करत आहे. ते शिल्प आहे एका योगीचं जो वडाच्या पारंब्यांमध्ये जखडलेला आहे. गेली अनेक शतके तो ध्यानमग्न अवस्थेत आहे. त्याच्या जटा वाढल्या आहेत, शरीर अस्तिपंज झालं आहे. डोळे खोल ध्यानात गढून गेले आहेत. त्याचा आता ह्या जगाशी काहीच संबंध नाहीये. तो एका वेगळ्याच जगात गेला आहे. त्याचं स्केच मी करून ठेवलंय. पण त्याची ध्यान करणारी ती अवस्था पकडणं फार कठीण आहे. जोपर्यंत त्या अवस्थेला मी स्पर्श करणार नाही तोपर्यंत हे शिल्प मी करू शकणार नाही, कारण तो भाव त्या शिल्पात उतरणं अपेक्षित आहे. मी जेव्हा या स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीरापर्यंत पोहचेन तेव्हाच ते होणार. त्यासाठी देहभान हरपून त्या अवस्थेत जाणं गरजेचं आहे, तेव्हाच ते काम पूर्ण होईन. त्यामुळे आता त्याला किती वेळ लागेल हे मलाही ठाऊक नाही.

पण आजवर केलेल्या कामात तुम्ही समाधानी आहात की अजून खूप काही करायचं बाकी आहे ?
उ- खूप बाकी आहे. जे बाहेर पडलंय ते जे करायचंय त्याच्या फक्त ५ टक्के आहे. अजून तर ९५ टक्के करायचं बाकी आहे. मनाला विचारांचं बंधन नाहीये. आणि तसंही स्वप्न पहायला काय जातं. त्यामुळे जोपर्यंत विचार प्रक्रिया सुरू राहिल, नवनवीन सुचत जाईल तोपर्यंत हे काम सुरूच राहील. ते कधीच संपणार नाही.

तुम्ही आजवर अनेक लाईव्ह स्कल्पचर केलेले आहेत.लाईव्ह स्कल्पचर  करताना आव्हान काय असतं12661930_1672313109725096_9138861671767936038_n
उ- आव्हान हे कोणतंही स्कल्पचर करताना सारखंच असतं. माझ्यासाठी कोणत्याही प्रकारचे शिल्प करताना सारखेच आव्हान असते, वा कुठलेही स्कल्पचर करणं हे मला सारखंच सोय़ीचं वाटतं. लाईव्ह स्कल्पचर करताना फक्त त्या व्यक्तीने रिस्पॉन्स देणं गरजेचं असतं. ते जर स्तब्ध राहिले नाही तर मग काम करताना थोडं लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. आता काही दिवसांपूर्वी मी भोपाळमध्ये एका अपंग मुलीचं स्कल्पचर करायला घेतलं होतं. पण ती काय स्तब्ध राहत नव्हती, तिची आपली चुळबुळ चालूच होती. कधी इकडे बघ-कधी तिकडे काही कर. तर तिला स्थिर बसवण्यासाठी सगळेच काहीतरी खटपट करत होते. पण मी तिच्या कलाने घेऊन शेवटी ते स्कल्पचरही व्यवस्थित पूर्ण केलं. तर असं फार काही त्रास होत नाही. माझ्या अभिव्यक्तीसाठी दोन्हीही प्रकार हे सारखेच आहे. ते लाईव्ह स्कल्पचर असो वा नसो त्यात भाव ओतणं, विशिष्ट भाव निर्माण करणं हे माझं मुख्य काम असतं आणि ते माझ्यासाठी आव्हान असतं, जे मी आजतागायत नीट पेलू शकतोय.

आजवरचं सर्वात जवळची निर्मिती कोणती वाटते वा भविष्यात कोणते वा कोणाचे शिल्प करण्याची इच्छा आहे ?
उ- हा प्रश्न तुम्ही ज्या कोणत्या कलाकाराला विचाराल त्याचं उत्तर एकच असेल ते म्हणजे कुठल्याही आईला तिची सगळी लेकरं ही सारखीच असतात. मलाही माझी सगळी शिल्प सारखीचं जवळची आहेत. मी माझ्या आयुष्यात सर्वात पहिले केलेलं नर्गिसचे शिल्प, न्यूड शिल्प, मीराचं शिल्प, माझ्या बायकोचं आणि मुलाचं केलेलं शिल्पही माझ्या तितकंच जवळंचं आहे, गालिब, गुलझार यांची शिल्प, बुद्ध, ओशोचे शिल्पही मला तितकेच प्रिय आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्या योगींचं शिल्प मला भविष्यात करायचं आहे, जर ते मी करू शकलो नाही तरी दुस-या कुणीतरी ते पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे.
आणि भविष्यात मला आणखी एक गोष्ट करण्याची इच्छा आहे ती म्हणजे फिल्म. मी १७ वर्षांचा असताना ‘चित्रकार’ नावाचं एक नाटकं लिहिलं होतं त्याचा मला चित्रपट करायचा आहे.

तुमचा मुलगा सागर देखील शिल्प कलाकार आहे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत ?
उ- मला माझ्याकडूनच स्वतःच्या काही अपेक्षा नाही, तर त्याच्या कडून काय असणार. कलावंत म्हणून जगणं-रमणं हिच मोठी गोष्ट आहे.आणि प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या मुलांकडून काही अपेक्षा असतातच त्यामुळे आपल्या मुलाने आपल्यापेक्षाही पुढे जावं, खूप प्रगती करावी हिच माझी अपेक्षा आहे.

शिल्पकलेची सद्यस्थिती कशी आहे आणि भविष्य कसे असणार आहे ?
उ- कुठलीही कलाकृती कधीच चांगली वा वाईट आहे, या परिमाणात आपण मोजू शकत नाही. तसंच तिची परिस्थितीचा अंदाज आपण घेऊ शकत नाही. कलाकृती  नेहमीच लोकांना आपल्याकडे ओढत असते.  कोणतीच चांगली गोष्ट  कधीच मरत नाही. आणि तसंही बरेच तरूण मला नेहमी भेटत असतात जे शिल्पकार होण्यासाठी प्रयत्न करताहेत. एकदा तर एका नाट्यशाळेत माझा डेमो होता. त्या ठिकाणी एक वेल्डिंगचं काम करणारा तरूणही आला होता. त्याने माझं डेमो पाहिलं नि मला येऊन भेटला. त्याने मला विचारलं कि, हे मी देखील करू शकेन का, मी त्याला म्हटलं इच्छा असेल तर नक्की करशील. त्यानंतर त्याने गोट्या खेळणा-या मुलाच्या फक्त हातांचं स्कल्पचर केलं, नि त्याला अनेक पारितोषिकही मिळाली. नि आता तो एक उत्कृष्ट शिल्पकार म्हणून काम करत आहे. तर यावरून आपण सद्यस्थितीचा अंदाज लावू शकतो आणि भविष्य तर उज्ज्वल असणारच आहे, प्रत्येक कलेचं भविष्य हे उज्ज्वलच असतं.

शिल्प कला हे व्यावसायिक क्षेत्र असले तरी शिल्प हे भावनेतून निर्माण झालेले असते. भावनेचे मार्केटींग येथे केले जाते का ?
12045349_827621127352650_1701573575728222828_o
उ- भावना विकलीही जात नाही आणि घेतलीही जात नाही.  जर तसं होत असेल ती केवळ फसवणूक होत असते. आणि त्या फसवणूकीला आपणच जबाबदार असतो. त्यातला व्यावसायिक भाग आपण वेगळा करू शकतो. समोरच्याच्या फर्माइशीनुसार कधी स्कल्पचर करून द्यावे लागते. तेव्हा आपण आपल्याला हवं तसं नाही करू शकत, कारण त्याचे आपण पैसे घेत असतो. तसंच अगदी डेमो द्यायच्या वेळेसही असतं. कमिटमेंट केलेली असते, त्यामुळे त्यावेळी इच्छा असो वा नसो तो डेमो द्यावाच लागतो. पण एकदा माती हातात घेतली की ती तंद्री लागतेच आणि ते काम पूर्ण होतं.

मुलाखत : भगवान रामपुरे
मुलाखतकार : सुजाता शिरसाठ
स्त्रोत : मुलाखत.कॉम

Comments

More in मराठी माणसं