इतर मुलाखत

आशावादी आशा ………

आशावादी आशा ………
मुलाखतकार

मैत्रिणींनो ‘आशा करंदीकर’ यांना मी मुलाखती दरम्यान भेटले, तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या….. तिच्याशी बोलताना मला स्वतःला प्रचंड उर्जा मिळत असल्याचा भास झाला. शून्यातून जग निर्माण करणं आपण म्हणतो तितके सोपं नाहीये. पण तिनं ते साध्य केलंय. आपण नेहमी ऐकतो कि फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा नव्याने जन्म घेतो पण मी हा फिनिक्स पक्षी प्रत्यक्ष पाहिला तो आशाच्या रूपाने…वाईट प्रसंगी रक्ताची नातीसुद्धा उपयोगी पडत नाहीत अशा वेळी आधार मिळतो तो जिवाभावाच्या मित्र मैत्रिणींचा…. तिला ह्या सगळ्याचा प्रत्यय आलाय…. सगळ्या अग्निदिव्यातून ती तावून सलाखून बाहेर पडली…. आजही काही प्रसंग सांगताना तिचे डोळे किंचितसे पाणावतात पण लगेच ती स्वतःला सावरून घेते…. कारण ती कमजोर नाहीये…. भविष्यात आर्थिकरित्या सक्षम झाल्यानंतर तिला तिच्यासारख्याच अनेक स्त्रिया, मुली यांच्याकरिता ट्रस्ट उभारायची आहे … अडचणीत सापडलेल्या महिलांना आर्थिक हातभार मिळवून द्यायला आणि कोणाला रडावंसं वाटलं तर हक्काचा खांदा मिळवून द्यायला तिला आवडेल…. देवाकडे ती आत्मबळ आणि शक्ती मागते… आशा नावाप्रमाणेच “आशावादी” आहे……
आपल्या ह्या लढाऊ आणि जिद्दी मैत्रिणीला भेटूया आणि तिच्याकडूनच तिच्याविषयी ऐकून घेऊया “बाईची जात” ह्या ग्रुपतर्फे “गाणं तुझं-माझं” या मुलाखतीच्या सदरात….

प्रश्न: तुझं शिक्षण कुठे झालेय? लग्न कधी झाले? लग्न संबंध कोणत्या माध्यमातून जुळले ?
आशा: माझा जन्म मुंबई, कुलाब्यामध्ये झाला व मी तिथेच लहानाची मोठी झाले. तसंच मी फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज मधून बी. कोंम केलं. कारण ते एकच असं सकाळचं कोलेज होतं जे करून मी नंतर अर्धा वेळ नोकरी करू शकत होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आणि मी चार भावंडात मोठी. वडील आर्मी मध्ये होते आता ते हयात नाहीत. आईने खूप त्रास काढून आम्हाला इंग्रजी माध्यमातून शिकवलं. शाळेत असतानाच मी शोर्टहेंड आणि टायपिंग शिकले होते व घरी येउन ४/५ मुलांची शिकवणीसुद्धा घ्यायचे. दहावी झाल्यानंतर एका रिसर्च कंसलटन्ट मध्ये मी असिस्टन्ट म्हणून पार्ट टाईम जॉब करायचे. माझं लग्न १९९२ साली पुण्याला झालं. आमचा प्रेमविवाह होता. आमची ओळख १९८९ ला झाली तेव्हा मी एका आर्कीटेक्टकडे फुलटाईम जॉब करत होते. तिथेच माझी आणि शिशिरची ओळख झाली. तो आर्कीटेक्चर पास झाल्यानंतर त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. त्याच्या घरून अर्थातच विरोध होता. कारण मी ब्राह्मण नव्हते आणि दिसायलाही गोरीपान नव्हते. त्यामुळे आम्ही ३ वर्ष थांबून पुण्यातील थेउर येथील श्री चिंतामणी मंदिरात वैदिक पद्धतीने लग्न केलं. माझ्या घरचे सगळे लग्नाला हजर होते पण त्याच्याकडून फक्त त्याचा बालमित्र सहकुटुंब आला होता.

प्रश्न: सासरी वातावरण कसं होतं? लग्नानंतरही तू नोकरी करत होतीस का ?
आशा: माझं वय त्यावेळी २३ होतं, सासरी पाऊल ठेवणं केवळ अशक्यच होतं. मला संसार, संसारातील जबाबदा-या, नाती-गोती हे सगळं खरंतर कळतही नव्हतं. शिशिर माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठा होता हे मला लग्नानंतर कळलं. त्याने माझ्यापासून हि गोष्ट लपवून ठेवली होती. मी शिक्षण आणि नोकरीमुळे सतत घराबाहेर असायचे त्यामुळे स्वयंपाक फारसा येत नव्हता तरीही मी हळूहळू सगळं शिकले. शिशिरला दोन बहिणी आणि एक मोठा भाऊ होता. सगळे जण उच्च शिक्षित आणि स्थिरावलेले होते त्या सगळ्यांमध्ये मी वयाने खूप लहान होते. त्यांच्यासारखी उच्चजातीची आणि उच्चशिक्षित नव्हते. आम्ही वेगळे राहत असलो तरी त्यांनी मला स्वीकारवं म्हणून तो मला त्यांच्याकडे नेहमी घेऊन जायचा. पण त्यांच्या नजरेत मी बावळट आणि तुच्छ होते हे मला सतत जाणवायचं. त्यांना मी मुळीच आवडत नसे. मला कधीच कोणी आदराने आणि प्रेमाने वागवलं नाही. तिथून परतल्यावर मला अपमानित झाल्यासारखं वाटायचं. पुढे पुढे जेव्हा शिशिर मला घरी जाण्यासाठी आग्रह करायचा तेव्हा मी त्याला नकार द्यायचे. त्यावरून आमच्यात भांडणं होऊ लागली. नंतर नंतर शिशिर मला डोमिनेट करू लागला. काही महत्वाचे निर्णयही मला न सांगता घेऊ लागला. मला खूप वाईट वाटायचं, ज्याच्यावर आपण एवढं प्रेम केलं तो आपल्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू लागला आहे. आता प्रेम कमी आणि भांडण जास्त व्हायला लागली होती.

शिशिर एकलकोंडा होता, संपूर्ण आयुष्यात मी त्याचा फक्त एकच मित्र पहिला. मला लग्नानंतर एम. बी. ए. करायचं होतं तू ते लग्नानंतर कर असं शिशिरने मला सांगितलं होतं. पण तसं काहीच झालं नाही. पुण्याला असतानाही मी नोकरी करायचे आणि संसाराला हातभार लावायचे. पुढे दुबई मध्ये गेल्यानंतरही मी एका ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये मार्केटिंग एक्सेक्युटिव्ह म्हणून आणि नंतर एका इटालियन एम एन सी मध्ये पर्चेस ऑफिसर म्हणून नोकरी करत होते.

प्रश्न: तुझ्या नोकरीला घरून पाठींबा होता का? ते तुला कितपत सहकार्य करत होते? विरोध झाला का? त्याला तू कसे तोंड दिलेस.. ?
आशा: मला नोकरी करणं भाग होतं, कारण कोणी पाठीशी नव्हतं.

प्रश्न: घरच्यांशी खटके कधी उडायला लागले ?
आशा: पुण्याला असताना सतत भांडणं व्हायची, तिथे मी एकटी पडले होते. मग मी मुलाला घेऊन आईकडे यायचे तो समजूत घालून परत न्यायचा, त्याला माझ्या माहेरची माणसं आवडत नव्हती. तो माझ्या आईशी भावंडांशीशी वाईट वागायचा, आता मला लग्न केल्याचा पश्चाताप होऊ लागला होता पण माझ्याकडे काहीच उपाय नव्हता. दुबईला गेल्यानंतर तर हा त्रास अजूनच वाढला. मी तिकडे गेल्यानंतर केस कापले व जीन्स घालू लागले त्यावरून संशय, ऑफिस मधल्या लोकांशी फोनवर बोलायला लागलं की संशय, त्याला रात्री शरीरसुख देऊ शकले नाही कि संशय…माझं बाहेर काहीतरी प्रकरण चालू आहे असा त्याला संशय येऊ लागला आणि मग अजूनच भांडणं होऊ लागली. आणि कहर म्हणजे माझा राग तो मुलांवर काढायचा त्यांना बेदम मारायचा. माझ्या मोठ्या मुलाच्या पाठीवर काळे-निळे वळ दिसू लागले होते, गालावर बोटांचे ठसे दिसायचे. दोन्ही मुलं त्याच्या भीतीने बेडरूम मध्ये लपून बसायची. पप्पाने दारावरची बेल मारली कि मुलं बेडरूम मध्ये पळून जायची आणि चिडून मोठा आवाज करून बोलला की माझा मुलगा चड्डी मध्ये सुसु करायचा इतकी भीती त्यांच्या मनात बसली होती.

प्रश्न: भारतात आल्यानंतर तुझ्या हक्काची लढाई लढताना तुला काय अनुभव आला? तुला त्यात कोणी साथ दिली… ?
आशा: चार वर्ष दुबईत राहून सुख शांती नाहीशी झाली होती, त्रास, मारपीटला मी वैतागले होते. भाऊ आता सिविल इंजिनिअर होता, चांगली नोकरी करू लागला होता. त्याच्या आणि आईच्या शब्दाच्या आधारावर मी १४ मे २००५ ला मुंबईलाला परत आले. मुंबईला परत आल्यावर माझ्यासमोर काय वाढून ठेवलं होतं ते मला माहित नव्हतं आता माझी दुसरी लढाई सुरु होणार होती . मी आईला दरमहा ५००० द्यायचे कबुल केले होते. शाळेचे अडमिशन मे मध्ये सुरु होणार होते आणि मी नोकरी शोधायला सुरुवात केली. माझ्या मुलाला सेंट मेरी, माजगाव आणि मुलीला Activity हायस्कूल, पेडर रोड इथे अडमिशन मिळाले. दुबई मध्ये मी नोकरी करून नव-याला आणि घरखर्चाला दरमहा १५००० (१५०० dirhams) देऊन २.५ लाख जमा केले होते. आईला आणि भावाला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी माझ्याकडून ते काढण्याचा प्रयत्न चालू केला. भावाला घराचे इंटेरिअर करायचे होते आणि मोटारसायकल घ्यायची होती. मला अजून नोकरी मिळाली नव्हती, मुलांच्या शाळेचा खर्च आणि आईला पैसे देऊन माझ्याकडे काही पैसे जमा असणं जरुरी होतं त्यामुळे मी नकार दिला, त्यावरून माझी सख्खी आई आणि भावाने मला रोज शिवीगाळ आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. मी रोज कुठे न कुठे इंटरव्यूहला  जात असे, मुलं शाळेतून आली कि आई त्यांना जेवायला देत नसे त्यामुळे ती घाबरून एक कोप-यात माझी वाट बघत बसत असायची. मला ह्या सगळ्याचा धक्का बसला होता. मी कोणत्या परिस्थितीत आहे आणि आई मला आणि माझ्या मुलांना अशा प्रकारे त्रास देतेय हे मला सहन होत नसे. तिने आणि बहिण भावांनी इतक्या प्रकारे त्रास दिला कि मी इथे सगळं सांगू पण शकत नाही. ह्या सगळ्याचा वाईट परिणाम माझ्या मुलावर होऊ लागला होता. आम्ही जेवायला गिरगावच्या आनंद भुवन मध्ये जात असू. २० रुपयांची राइस प्लेट घेऊन आम्ही तिघं जण ती खायचो आणि दिवस काढायचो. घरात त्यांना त्रास नको म्हणून दिवसभर रस्त्यावर उन्हातान्हात फिरत राहायचो नाहीतर जिन्यावर तासन तास बसून राहायचो. येणारी जाणारी माणसं आमच्याकडे पाहत राहायची. आईला आता आम्ही त्या घरात नको होतो. ती सतत आम्हाला अपशब्द वापरू लागली.
नव-याच्या त्रासाला कंटाळून मी इथे आले पण इथे आई आणि भावंड त्रास देऊ लागल्याने मी एकटी पडले होते. मुलांना घेऊन एकटी मी कुठे जाऊ असा मला प्रश्न पडत असे. मला आता डिप्रेशन आणि हायपरटेन्शन ने चक्कर येऊ लागली होती. सततची डोकेदुखी सुरु झाली होती. मग मी भाड्याने वेगळं घर घेऊन राहायचे ठरवले. मुंबई सेन्ट्रलला म्हाडा च्या चाळीत ४००० रुपये भाड्याने एक १० x १५ फुटाची रूम मिळाली. त्या घरात इतकी ढेकणं होती कि आम्ही रात्ररात्र ढेकणं मारत बसायचो. एकही दिवस शांत झोप लागली नाही.
मी चार भांडी, शेगडी असा संसार जमवला. एका एअरलाईन्स कंपनी च्या चेअरमनची एक्सेक्युटीव्ह असिस्टन्ट म्हणून मला नोकरी मिळाली. हळूहळू मी स्वतःला आणि मुलांना सावरलं. इतर कोणीही साथ द्यायला नव्हतं, मुलं मला आणि मी मुलांना धीर देत होतो, घाबरू नकोस… सगळं ठीक होईल….

प्रश्न: Breast Cancer चे निदान झाल्यानंतर पहिल्यांदा तुझ्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहिलं ? तू त्याला कसं तोंड दिलंस? उपचारा दरम्यान काय अनुभव आले ?
आशा: त्या वेळी मी टाईम्स ओफ इंडिया मध्ये नोकरीला लागले. म्हाडाची रूम सोडून मी लोन काढून तीन हाथ नाक्याला घर घेतलं, मुलांची शाळा कॉलेज परत बदलावं लागलं होतं. आता मला उजव्या स्तनात गाठ जाणवू लागली होती. माझ्या दोन ऑफिस कलीग्स शोभा आणि ललिता त्यांना मी हि गोष्ट सांगितली. त्या मला चेकअप साठी घेऊन गेल्या. गाठ Cancer ची निघाली. मग अजून तपासण्या झाल्यावर पौजिटीव्ह रिपोर्ट निघाला. मी सुन्न झाले, डोळ्यापुढे अंधार दिसू लागला, मेंदू काम करेनासा झाला. डॉक्टर काय बोलत होते ते मला कळतच नव्हते. मी ढसाढसा रडले. अवतीभवतीचे जग काही दिवसाचे असल्यासारखं वाटू लागलं. आता माझ्या मुलांचं काय होणार? कोण बघेल त्यांना? कुठे जातील ती ? मला तर काहीच सुचत नव्हतं.
त्याच दरम्यान मी होमलोन काढून आणि दागिने विकून ववृंदावन ठाणे येथे घर घेतलं होतं. त्याचं इंटेरिअरचं काम सुरु झालं होतं आणि मी हॉस्पीटलला भरती झाले होते. १४ एप्रिल २००९ ला माझी मैत्रीण शोभा आणि ललिता मला घेऊन LOK हॉस्पिटलला पोचल्या मी उपचारांसाठी भरती झाले होते. मग माझं उजवं स्तन काढून टाकण्यात आलं. आठ दिवसात मी घरी आले. मला आता एक स्तन नव्हतं. आरशात बघून मी खूप रडले. त्याचवेळी घरात बाथरूम मध्ये टाईल्सच्या फिटिंगचं काम चालू होतं. मी कडिया बरोबर मार्केट मध्ये जाऊन खरेदी केली. रस्त्यावरून माझ्याबरोबर जाताना त्या कडियाला माहित नव्हतं हि बाई अंगावर शाल घेऊन चालतेय आणि हिच्या अंगावर २० टाके आहेत.

आयुष्यात पहिल्यांदाच मी इतकी आजारी पडले होते. मला ६ किमो घ्यावे लागणार होते आणि उपचार ८ महिने चालणार होते. इतके दिवस सुट्टी घ्यावी लागणार ह्याच विचाराने मी घाबरले. माझी नोकरी गेली तर माझी मुलं काय खाणार? कसं होणार आमचं? तेव्हा मला ऑफिस मधून माझ्या CEO चा मेसेज आला कि तू सर्व उपचार नीट घे, आराम कर, व्यवस्थित बरी हो आणि मग कामावर ये. मी माझ्या ऑफिसच्या कलीग्सची माझ्या मित्र मैत्रिणींची ऋणी आहे, त्यांनी मला धीर दिला, सांभाळून घेतलं, काहींनी मला पैसे गोळा करून दिले जे मी अजूनपर्यंत एकेकाचे परत करत आहे.
मे २००९ पासून माझी केमोथेरपी सुरु झाली. पहिला केमो घेऊन मी व्हीटी ला ऑफिस मध्ये ट्रेन ने प्रवास करून गेले आणि दिवसभर काम केलं. उपचारादरम्यान माझे केस गळू लागले, दरवेळी केस विंचरताना कंगवयातून केसाचा झुपका यायचा मग मी वैतागून केस विंचरून विंचरून हळूहळू सगळे केस काढून टाकले. केमोची औषधं अंगभर पसरून जळजळ होत असे, नसा कडक होऊन बंद पडू लागल्या होत्या. मग दुसरी नस शोधावी लागायची, इथे टोच- तिथे टोच असं सर्व शरीरभर टोचणं चालू होतं. काढलेल्या स्तनाखालील चमडीच्या एका थराखाली ऑपरेशन करून एक पोर्ट बसवण्यात आला होता. नसा बंद पडल्या कि त्या पोर्ट मधून डायरेक्ट केमो घ्यायचे. ३ तास केमो घेताना खूप त्रास व्हायचा. माझ्या मुलांनी त्यावेळी मला खूप सांभाळले. मुलगी मला जेवायला भरवत असे. आणि मुलगा केमो घेताना मला पुस्तक वाचून दाखवत असे. नंतर पोर्टमध्ये इन्फेक्शन झालं आणि ऑपरेशन करून ते काढून टाकावं लागलं. एक मात्र…. केमो चालू असतानाही मी हॉस्पिटलमध्ये कधीच लिफ्ट ने गेले नाही, मी जिने चढून जायचे तेव्हा वाचमन म्हणत असे, Madam, लिफ्ट पेशंट साठीच आहे तेव्हा मी त्याला म्हणायचे मी पेशंट नाहीये……

प्रश्न: सध्या तुझे काय सुरु आहे..? कुटुंबाशी सध्या तुझे कितपत संबंध आहेत…? आजाराचे कळल्यानंतर कोणी तुला संपर्क केला का ?
आशा: मी आता नॉर्मल आयुष्य जगत आहे. ऑफिस आणि जिम मध्ये नियमित जाते, योगा करते. आयुष्याच्या शर्यतीत पुन्हा उतरले आहे. जीवनाची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. लोन फेडत आहे. मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या करीअर साठी कष्ट करत आहे. माझे एमबीए करायचं स्वप्न जे अपूर्ण होतं ते आता पूर्ण करत आहे. त्यानंतर मला PGDBA (मार्केटिंग) सिम्बोइसिस कॉलेज, पुणे इथून डिप्लोमा मिळेल. ड्रायविंग शिकायची इच्छा पूर्ण केली. आता लोन फिटलं मुलं आपआपल्या क्षेत्रात स्थिर झाली कि मी मोकळी……….

ऑपरेशन च्या आधी डॉक्टरांनी जवळच्या नातेवाईकांना कळवायला सांगितल्यामुळे माझ्या मैत्रिणींनी माझ्या माहेरी कळवलं. आई भाऊ आणि बहिणी हॉस्पिटल मध्ये बघायला आल्या होत्या, आई माझ्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती हे मला जाणवत होतं. नव-याला माझ्या बहिणीने कळवलं होतं पण तो मला बघायला आला नव्हता कारण त्याच्याकडे तेव्हढा वेळ नाहीये असं त्याने सांगितलं.

प्रश्न: फेसबुकवर तू केंव्हापासून आहेस.. ? स्त्रियांसाठी हे माध्यम कितपत योग्य आहे..?तुला सोशल नेटवर्किंगचा वाईट अनुभव आहे का..  ?
आशा: मी फेसबुक वर २००८ पासून आहे, ऑफिस मध्ये हि साईट ब्लोक असते आणि तसाही वेळ कमी मिळतो त्यामुळे मी क्वचितच फेसबुकवर असते. मला थोडेफार वाईट अनुभव आले आहेत, याचे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत. पण एकंदरीत फेसबुकवरील स्त्रियांविषयी काम करणा-या किंवा इतर सामाजिक काम करणा-या संघटना चांगल्या प्रकारे जनजागृती करत आहेत असं मला वाटतं. तू सुरु केलेला ह्या उपक्रमाचं मला विशेष कौतुक वाटतं. त्यामुळे आज आपण इतकं बोलू शकलो. मला इथे आपल्या सारख्या ब-याच स्त्रियांशी बोलायला आवडेल.

प्रश्न: भविष्यात तुझा काय संकल्प आहे..  ?
आशा: मला स्वतःचा बिजनेस करण्याची इच्छा आहे. कधीतरी मी आर्थिकरित्या सक्षम होईन तेव्हा माझ्यासारख्याच अनेक स्त्रिया आणि मुलींसाठी आर्थिक मदत उभी करण्यासाठी ट्रस्ट काढेन. मला वाईट परिस्थितीमध्ये जी मदत मिळू शकली नाही ती मदत आणि रडावंसं वाटलं तर हक्काचा खांदा मी त्यांना मिळवून देईन. देवाजवळ मी आत्मबळ आणि शक्ती मागेन…. धन्यवाद……

मुलाखत :  आशा करंदीकर

मुलाखतकार : सुष्या आर्या

स्त्रोत :  बाईची जात 

Comments
इतर मुलाखत

More in इतर मुलाखत